सत्संग: विचित्र खटला, सुयोग्य न्याय

रमेश सप्रे
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

कोणत्या संदर्भात हे अग्नीचं उदाहरण दिलं गेलंय? पू. गजानन महाराजांच्या जीवनात अनेक अद्भुत, चित्रविचित्र प्रसंग घडले आहेत. पण ज्या प्रसंगी हे शब्द दासगणू महाराजांनी लिहिला आहे तो तो प्रसंग मात्र विलक्षण आहे.

‘जेवी अग्नीचा अग्नीपणा। अग्नी सोडीत तसे जाणा।
परी अग्निहोत्र्यांना । कुंडात ठेवणे भाग त्यासी।।
अग्निदेव म्हणोन । ठेविल्या कुंडावाचून ।
तो करील दग्ध सदन । हा दोष त्याचा नसे।

कोणत्या संदर्भात हे अग्नीचं उदाहरण दिलं गेलंय? पू. गजानन महाराजांच्या जीवनात अनेक अद्भुत, चित्रविचित्र प्रसंग घडले आहेत. पण ज्या प्रसंगी हे शब्द दासगणू महाराजांनी लिहिला आहे तो तो प्रसंग मात्र विलक्षण आहे. त्याचं असं झालं. एक गोष्ट कोणत्याही सद्गुरुंच्या शिष्यांनी सदैव लक्षात ठेवायला हवी की त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. एका मर्यादेनंतर त्यांना आग्रह करायचा नाही. आपल्या मनाप्रमाणे सद्गुरुंनी वागावं अशी इच्छा मनात धरून तशी कृती केली की त्याचा परिणाम कसाही घडू शकतो.

मागे श्रीमहाराज झोपलेले असताना दर्शनाला आलेल्या लोकांचा आग्रह मानून आपलं श्रीमहाराज सगळं ऐकतात. या अहंकारानं त्यांना झोपेतून उठवण्यासाठी गेलेला विठोबा घाटोळाची परिस्थिती कशी झाली याची आपल्याला कल्पना आहेच. भरपूर बडवून श्रीमहाराजांनी त्याला हाकलून दिला तो कायमचाच. यावेळी श्रीगजानन महाराजांचा अंतरंगीचा शिष्य भास्कर याच्या बाबतीत हा प्रसंग घडला. 

शेगावजवळील अकोला गावात श्रीमहाराजांचे अनेक जवळचे शिष्य होते. त्यामुळे ते अनेकदा अकोल्यास येत. लो. टिळकांच्या इथंच झालेल्या व्याख्यानाच्या प्रसंगीही श्रीमहाराज येथे आले होते. येथील अनेक भक्तमंडळी सधन असूनही श्री महाराजांची निःस्सीम भक्त होती. श्री महाराजांनी महासमाधी घेतल्यानंतर झालेले शतचंडी सारखे यज्ञ, समाधी नि मठाचं बांधकाम यातही या मंडळींचा महत्त्वाचा वाटा होता.

यावेळी श्रीमहाराज खटाऊच्या गिरणीत राहिले होते. यापूर्वी बच्चूलाल अग्रवाल यांच्या घरी श्री महाराजांची झालेली सर्वोपचारी पूजा. त्यांनी श्री महाराजांना अर्पण केलेले हजारो रुपये आणि श्रीराम मंदिर बांधणीचा व्यक्त केलेला मानस याचं वर्णन आपण पाहिलंय. श्रींच्या आशीर्वादानं पुढं १९०३ साली श्रीराम मंदिर बांधलंही गेलं यावेळी ती घटना घडली ती मात्र अकोल्याजवळील मलकापूरला जाताना. घडलं काय की मलकापूरच्या वैभवसंपन्न घराण्यातील विष्णुसा बाळकृष्णसा सावजी यांनी पूर्वी अनेकदा आपल्याकडे येण्याचं आमंत्रण दिलं होतं. श्री महाराजांना आणण्याची जबाबदारीही पट्टशिष्य भास्कर पाटील यांच्यावर सोपवली होती. अनेकदा विनंती, प्रार्थना करूनही मलकापूरला जाणं घडलं नव्हतं. भास्करानं व्यावहारिक विचार केला की अकोल्यापर्यंत आलोच आहोत तर श्री महाराजांना मलकापूरला न्यावं. तेथील भक्तांचे समाधान होईल. भास्कराला त्याचा आग्रह पाहून श्रीमहाराज म्हणाले.

दोरीसी दिधल्या फार ताण । ती मधेच तुटतसे जाण ।
मी न हलणार येथून । तू या फंदात पडू नको ।।

तरीही भास्करानं आग्रह केला. त्याला अशी बुध्दी झाली कारण प्रारब्धाची गतीच तशी होती. तो उद्गारला, 

मी तुमचा लाडका । मसी (मला) धक्का देऊ नका ।
मी भरंवसा दिला देखा । तुम्हा घेऊनी येण्याचा ।।

शेवटी हो ना करता करता श्रीमहाराज रेल्वे स्टेशनवर आले. ते आणि काही भक्त यांच्यासाठी भास्करानं विनंती करून एक बारा जणांचा छोटा डबा रिकामा करून घेतला होता. कारण श्रीमहाराज जरी देहभान शून्य अशा उन्मती अवस्थेत असले तरी सामान्य माणसाच्या दृष्टीनं ते दिगंबरावस्थेतच होते.

श्रीमहाराज कोणाचंही लक्ष नाही हे पाहून आरक्षित केलेल्या डब्याऐवजी बायकांच्या डब्यात जाऊन बसले. त्या महिलांना श्री महाराजांची अवस्था नि अध्यात्मिक अधिकार माहीत नसल्यामुळे त्या खूप घाबरल्या. एका रमाबाई नावाच्या महिलेनं स्टेशन मास्तराकडे जाऊन वर्दी (तक्रार) दिली. त्याने पोलिस अधिकाऱ्यास श्री महाराजांविरुध्द कारवाई करण्यास सांगितलं. सारा प्रकार जाणल्यावर तो अधिकारी म्हणाला, ‘यांचा अधिकार खूप मोठा आहे. हा चालता बोलता ईश्वर आहे. त्याला याच डब्यातून जाऊ द्यावं’ पण स्टेशनमास्तरांनी वरिष्ठांकडे तक्रार पाठवली आहे. त्यांनी श्री महाराजांना टोपी काढून प्रणाम करून विनंती केल्यामुळे श्रीमहाराज  खाली उतरले. पुढे सर्व ठीक झालं तरी केलेल्या तक्रारीवरून श्री महाराजांविरुध्द खटला उभा राहिला. खूप गर्दी जमली खटल्याच्या दिवशी. 

स्वतः जठार साहेबांना (न्यायाधीशांना ) श्री महाराजांच्या विदेही स्थितीची कल्पना आली. कारण श्री महाराजांनी कोर्टात जाण्यापूर्वी त्यांना नेसवलेलं धोतर रस्त्यात सोडून टाकलं. विवस्त्र अवस्थेत कोर्टात गेले नि चिलीम भरून मागू लागले. त्यांना आजूबाजूच्या प्रसंगाची अजिबातही जाणीव नव्हती. या साऱ्याचा विचार करून जठरांनी योग्य काळजी न बाळगल्यामुळे शिष्य भास्कराला पाच रुपये दंड केला. यापुढे श्री महाराजांना दमणी(बंद बैलगाडी) सारख्या वाहनातून न्यायला सांगितलं. जठार म्हणाले,

‘यांचं नागवेपण अग्नीसारखं असल्याने ते वस्त्रात (अग्निकुंडात) ठेवणं हे शिष्यगणांचं काम आहे. म्हणून त्यांना दंड करण्यात येत आहे.’ खरोखर हा खटला विचित्र असला तरी दिलेला न्याय सुयोग्य होता हेच खरं!

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या