सत्संग: गुरूः साक्षात् परब्रह्म

रमेश सप्रे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेत एक प्रश्‍न असतो - हे उद्‍गार कोणी, कोणासमोर, केव्हा काढले? आपल्या जीवनातही असे प्रसंग अनेकवेळा येतात. श्री गजानन महाराजांच्या चरित्रातील हे उद्‍गार पहा -

‘... पुन्हां ऐशा आग्रहासी । करशील का सांग मशी । निज फजिती करून घ्यावया?’ हे उद्‍गार शिष्य भास्कराला उद्देशून श्रीगजानन महाराजांनी काढले आहेत. प्रसंग किंवा संदर्भ आहे श्री महाराजांना ते सार्वजनिक ठिकाणी (उदा.रेल्वे स्टेशन, गाडीचा स्‍त्रियांचा डबा) नागवे फिरतात म्हणून त्यांच्यावर केलेल्या खटल्याचा. न्यायाधीश जठार यांनी विचारपूर्वक निर्णय देऊन भास्कराला पाच रुपये दंड ठोठावला. 

या भास्कराच्या फजितीला उद्देशून श्रीमहाराजांनी हे उद्‍गार काढले. 

त्या दिवसापासून सर्वांनी ठरवलं की श्रीगजानन महाराजांना इकडून तिकडे नेताना सार्वजनिक वाहनाऐवजी बंद बैलगाडी (दमणी) वापरायची. खरं आहे, माणूस स्वतःच्या आयुष्यातून, अनुभवातून जेवढा शिकतो तेवढा कुठंही शिकत नाही. श्री महाराजांचा प्रवास आजूबाजूच्या गावी सतत चालू असायचा. अकोला या शेगाव जवळच्या गावात श्रीमहाराजांचे अनेक शिष्य होते. त्यातले काही अगदी निकटचे होते. असेच एकदा अकोल्यात आल्यावर श्रीमहाराज बापूराव सावरगावकर या भक्ताच्या घरी उतरले. त्यावेळी श्रीमहाराज ‘जीवनमुक्त अवस्थेत’ असत या स्थितीला गीतेत ब्रह्मस्थिती, ब्रह्मनिर्वाण तसेच इतर ठिकाणी विदेहावस्था, उन्मनी अवस्था, अवधूत कृती असंही म्हटलंय. ही फार वरच्या पातळीवरची अवस्था आहे. ‘परमहंस’ अवस्था असंही हिचं वर्णन केलं जातं. या अवस्थेत असलेल्या व्यक्तीचा व्यवहार म्हणजे वेदातील महावाक्यांचा प्रत्यक्ष आचार असतो. 

अहं ब्रह्मस्मि - या भावात असताना त्यांची आत्मरंगी समाधी लागलेली असते. 
अयम् आत्मा ब्रह्म - या अवस्थेत अखंड आत्मचिंतन सुरू असतं.
सर्वं खलु इंद ब्रह्म - हा भाव त्यांना कणाकणांत, वस्तुंवस्तूत परमेश्‍वराचं दर्शन घडवतो. 

तत् त्वं असि - ही अवस्था त्यांना विश्‍वातील प्रत्येक गोष्टीशी तसेच विश्‍वनाथाशी एकरूप करून टाकते. श्रीगजानन महाराज अतिशय उच्च कोटीचे योगीराज होते. म्हणून ते सतत या चारही अवस्‍थेत असायचे. त्यांचा वरवर निरर्थक वाटणारा ‘गणी गणगणात बोते’ हा मंत्र या अखंड समाधी अवस्‍थेचा, परमहंस स्‍थितीचा निदर्शक होता. ते नुसते ध्वनीचे नि शब्दांचे बुडबुडे नव्हते. असो.

तर श्री महाराज अकोल्याला येऊन बापुरावांकडे उतरले होते. जवळच असलेल्या कुरूम या गावी महेताबशा नावाचा मूळ पंजाबमधील एक अधिकारी सत्पुरुष राहत होता. त्यांना एक दुरदर्शन (डिस्टंट व्‍हिजन) नावाची सिध्दी प्राप्त झाली होती. आपल्याविषयी दूर अंतरावर काय घडतंय याचं ज्ञान त्यांना बसल्या ठिकाणी होत असे. श्रीमहाराज अकोल्याला आले आहेत हे कळल्यावर महेताबशा तिकडे श्रीमहाराजांना भेटण्यासाठी निघाली. त्यांनीच पूर्वी सांगितल्यानुसार बापुरावांनी ‘श्रीमहाराज आलेयत’ हा निरोप देऊन पाठवलं. वाटेत त्याला बघताक्षणी महेताबशांनी थांबून त्याला आपल्या गाडीत बसायला सांगितलं. ‘आपण मिळून जाऊ या रेल्वेस्टेशनाला मीच आहे  महेताबशा’ असं ते म्हणाले. संत खरोखर त्रिकालज्ञ असतात. आपल्या यवन शिष्यांसह महेताबशा बापुरावांच्या घरीच उतरले. दुसऱ्या दिवशी श्रीमहाराजांनी त्याच्याकडे जाऊन एक अजबगजब प्रकार केला.

महेताबशाचे धरून केस । समर्थांनी ताडिले त्यास ।
त्या ताडण्याचा उद्देश । हाच तो दिबुध हो ।।
तुझे महेताब आहे नाव । त्याची काय आठवण ठेव ।
द्वेषरूपी तमा वाव ।  तुझ्यापुढे मिळू नये ।।

आपल्या गुरुंना महेताबशाला असं मारताना पाहून त्यांचे शिष्य अस्वस्थ झाले. त्यांना तसे पाहून महेताबशा म्हणाले, ‘तुम्ही परत कुरूम गावाला जा.’ शेख कडू नावाचा शिष्य सोडून बाकीचे परत गेले. हे घडत असताना तिथं बच्चूलाल नावाचा श्रीमहाराजांचा भक्त आला. त्यानं श्री महाराजांना आपल्या घरी भोजनासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी टांग्यात बसवून श्रीमहाराजांना थाटात मिरवत आणलं. पण श्रीमहाराज टांग्यातून उतरले नाहीत. त्यांनी टांगा परत नेला. असं का केले? यावर विचारमंथन चालू असताना एक विचार पुढे आला की आपण महेताबशाला आमंत्रण न दिल्यामुळे श्रीमहाराज परत गेले. 

बच्चूलाल दोघांनाही बोलवण्यासाठी आला. दोघांनाही एकाच टांग्यातून मिरवत नेले. महेताबशांना ते यवन असल्यानं मंदिराजवळील एका थेटरात (थिएटरात) नेलं. श्रीमहाराज श्रीराम मंदिरात उतरले खरे पण लगेच ते महेताबशाला भेटायला थेटरात गेले. सर्वांची भोजने झाल्यानंतर महेताबशा आपल्या मुळगावी पंजाबला जाण्यासाठी निघाले. कुरुमाला त्यांनी एका मशिदीचं बांधकाम सुरू केलं होतं. शेख कडूला त्या कामाकडे लक्ष देण्यासाठी पाठवलं. श्रीगजानन महाराजांच्या कृपेनं मशीद बांधून पुरी होईल, असं विश्‍वासपूर्वक सांगितलं. या प्रसंगी महेताबशाने काढलेले उद्‍गार आजही अत्यंत महत्त्वाचे आहेत.

सामान देऊळ मशिदीचे । एकची आहे साचे ।
आकाराने भिन्नत्व त्याचे । मानून भांडू नये हो ।।
यवन तेवढा खुदाचा । आणि हिंदू काय भुताचा ।।
पोक्त विचार करा याचा । मनुष्यपण टिकवावया ।।

या प्रसंगानंतर महेताबशा कायमचे निघून गेले. ‘परधर्माचा द्वेष सोड आणि महेताब (माहताब) म्हणजे चंद्र असं तुझं नाव आहे त्याप्रमाणे वाग.’ हा श्रीगजानन महाराजांचा आदेश त्यानं हृदयापासून मान्य केला. खरोखर आपले श्रीमहाराज हे परमेश्‍वराचे ‘गुरूः साक्षात् परब्रह्म’ असे अवतार होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या