सत्संग: सद्‌गुरू भावाचा भुकेला

रमेश सप्रे, सत्संग
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

श्रीसंत गजानन महाराज असेच अधिकारी सत्पुरुष होते. म्हणूनच शेगावसारख्या विशेष माहीत नसलेल्या गावात राहून अनेक घडणाऱ्या घटना, व्यक्‍तींच्या मनातले विचार त्यांना अंर्तज्ञानानं कळत असत.

‘उपासनेला दृढ चालवावे । भूदेव संतांसी सदा लवावे ।
सत्कर्मयोगे वय घालवावे । सर्वांमुखी मंगल बोलवावे ।।

हा समर्थ रामदासांचा श्‍लोक उपासनेनंतर म्हणण्याचा प्रघात आहे. यात नमस्कार करायला (सदा लवावे) सांगितलाय तो ‘भूदेव संतांना.’ भूदेव म्हणजे पृथ्वीवरचे ज्ञानी. जे लोक देवासारखेच वंदनीय असतात. संत तर साक्षात् चालते-बोलते ईश्‍वर असतात. तुलसीदास तर त्यांना ‘जंगम प्रयाग’ म्हणजे हिंडत-फिरत लोकांकडे पोचणारं तीर्थक्षेत्र. सर्व मानवजातीवर त्यांचं प्रेम असल्यामुळे नि त्यांचं मन ‘विश्‍वमनासी’ एकरूप झाल्यामुळे त्यांना सर्व घटनांचंच नव्हे तर सर्वांच्या मनातील विचारांचंही ज्ञान असतं. इतरांना ती मोठी सिध्दी वाटते. पण प्रत्यक्षात तो संतांचा नित्य, सहज व्यवहार असतो.

श्रीसंत गजानन महाराज असेच अधिकारी सत्पुरुष होते. म्हणूनच शेगावसारख्या विशेष माहीत नसलेल्या गावात राहून अनेक घडणाऱ्या घटना, व्यक्‍तींच्या मनातले विचार त्यांना अंर्तज्ञानानं कळत असत. अगदी चंदू मुकीन नावाच्या भक्ताच्या घरात एका मडक्यात काही दिवसांपूर्वी ठेवलेल्या कानवल्याचं त्यांना स्मरण होतं. तशीच घटना एका भक्ताच्या बाबतीत घडली. डॉ. त्र्यंबक राजाराम ऊर्फ भाऊ कवर हा तो भक्त. डॉक्टरीचा (वैद्यकीय ज्ञानाचा) अभ्यास करण्यासाठी तो हैदराबादला शिकायला होता. अगदी लहानपणापासून भाऊला देवाची, श्रीगजानन महाराजांची भक्ती करण्याची मनापासून आवड होती. श्रीमहाराज भेटल्यापासून तर त्याला परब्रह्माचं दर्शन झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे श्रीमहाराजांच्या अखंड अनुसंधानात तो असायचा. त्याला जरी श्रीमहाराज  यावेळी प्रत्यक्ष काय करत असतील हे कळलं नाही तरी श्रीमहाराजांना मात्र त्याच्या प्रत्येक कृतीची पूर्ण कल्पना असे. हेच पहा ना. हा भाऊ कवर सुटीसाठी घरी आला होता. मनानं तो शेगावतच होता. त्यामुळे एकदा त्याच्या मनात श्रीमहाराजांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याचा विचार आला होता. त्यांचा विवाह झाला होता पण त्याकाळी पत्नीचं वय खूप लहान असायचं म्हणून ती ऋतुमती होईपर्यंत (वयात येईपर्यंत) आपल्या घरी म्हणजे माहेरीच असे. भाऊंची पत्नीही अशीच माहेरी होती. घरी मोठ्या भावाची बायको नानी होती. पण ती जरा जहाल स्वभावाची, फटकळ असल्यानं त्यानं आपला विचार मनातच दडपला. पण त्याच्या चेहऱ्यावर असलेली उदासी नानीच्या लक्षात आली. ती भाऊला म्हणाली -

नानी म्हणे त्यावर । सांगून  पहा एकवार ।
तू माझा धाकटा दीर । मशी (माझ्यापाशी) पडदा ठेवू नये ।।

हे ऐकून भाऊला धीर आला नि त्यानं आपल्या मनात आलेला विचार सांगितला. यावर नानीनं लगबगीनं आनंदान स्वयंपाक केला.

भाजी चून (झुणका) भाकर । हिरव्या मिरच्या ओंजळभर ।
ठेविल्या आणून समोर ।  आपुल्या त्या दिराच्या ।।
भाकरी तीन, कांदे तीन । हरभऱ्याचे चून जाण ।
लोणी ठेविले माखून । प्रत्‍येक त्या भाकरीला ।।

एवढं सारं करून झाल्यावर नानी भाऊला म्हणाली, ‘आता लवकर शेगावला जायला निघा. गाडीला (ट्रेनला) थोडाच वेळ उरला आहे. भाऊ तयार होताच. पण या साऱ्या गडबडीत तो स्टेशनवर पोचला तेव्हा नुकतीच दुपारी बाराची गाडी निघून गेली होती. पुढची गाडी होती दुपारी तीन वाजता. तिनं जाऊनही काय उपयोग? कारण श्रीमहाराजांचं भोजन त्यापूर्वीच झालं असणार.

या दरम्यान शेगावला काय घडत होतं? अनेक भक्तांनी श्रीमहाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपापल्या परीनं अनेक पक्वान्नं आणली होती. दासगणूंनी याचं फार बहारदार वर्णन केलंय.

नैवेद्याची अतोनात । ताटे होती मठात ।
पक्वान्नांनी परिप्लुप्त (भरलेली) । ती वर्णावी कोठवरी?। 
कोणाच्या जिलब्या, घीवर । कोणाचा तो मोतीचूर (लाडू) ।
कोणाची ती नुसती खीर । श्रीखंड-पुऱ्या कोणाच्या ।।

अशा गोडधोड पदार्थांनी भरलेली ताटं बाळाभाऊ श्रीमहाराजांसमोर आणून ठेवीत होते. पण त्याला श्रीमहाराजांनी स्पर्शही केला नाही. कारण ते वाट पाहत होते भाऊ कवराच्या प्रसादाची. इतरांनी हवे तर जेऊन घ्यावे. आज माझं भोजन चौथ्या प्रहरी होणार आहे. इकडे हे सारं घडत असताना भाऊ कवर तेथे पोचला. त्याच्या मनात अपराधी भावना होती. तो काहीसा निराशही झाला होता कारण खूप उशीर झाला होता. त्याला पाहून महाराज उद्गारले,

तुझ्या भाकेत (शपथेत) गुंतलो । मी उपोषित राहिलो ।
नाही अजून जेवलो । आण तुझी शिदोरी ।।

बाळाभाऊंनी त्वरीत भाऊ कवराचे कांदे, चून, भाकरी, मिरच्या हे पदार्थ श्रीमहाराजांसमोर ठेवले. त्यातील दोन भाकरी खाऊन बाकीचे पदार्थ नैवेद्याचा प्रसाद म्हणून सर्वांना वाटायला सांगितलं. भाऊनंही प्रसाद घेतला. श्रीमहाराज उत्स्फूर्तपणे म्हणाले,  

जा आता अकोल्यासी । पास होशील पुढचे वर्षी । तू डॉक्टरी परीक्षेत ।।

भाऊ कवराला आश्‍चर्य वाटलं. कारण त्यानं निष्काम भावानं श्रीमहाराजांसाठी नैवेद्य आणला होता. ही भविष्यवाणी अर्थातच खरी ठरली. एक मात्र खरं ‘देव (सद्‌गुरू) भावाचा भुकेला’ भाव म्हणजे अर्थातच भक्तिभाव!

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या