रात्र आणि दिवसही ‘कोरोना’वैऱ्याचे

शंभू भाऊ बांदेकर
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

मागील ७ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अवघे जगच चिंताग्रस्त बनले असून दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या बाधितांची व मृत्यूची संख्या पाहता या महामारीचे हे अनपेक्षित महासंकट आणि किती काळ, ‘काळ’ बनून घिरट्या घालीत याचा कुणालाच अंदाज बांधता आलेला नाही.

मागील ७ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अवघे जगच चिंताग्रस्त बनले असून दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या बाधितांची व मृत्यूची संख्या पाहता या महामारीचे हे अनपेक्षित महासंकट आणि किती काळ, ‘काळ’ बनून घिरट्या घालीत याचा कुणालाच अंदाज बांधता आलेला नाही. जगातील अनेक राष्ट्रांचे नामांकित संशोधक या विषाणूचा नायनाट करण्यासाठी रात्रंदिवस संशोधनात दंग असले, तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०२१ च्या म्हणजे पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत कोरोनावरील लस जगभरात पोचविली जाऊ शकते. इस्त्रायल, ब्रिटन, रशिया ही राष्ट्रे ही लस पुढील वर्षीच्या जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध करील असे भाकित वर्तविले जात आहे.

आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूबांधितांचा आकडा २ कोटी ७० लाखांवर पोचला आहे व त्यातील १ कोटी ९० लाख बरे झाले आहेत तर ८ लाख ८० हजार बाधीत दगावले आहेत.

आपल्या देशाची परिस्थितीही भयानक बनू लागली आहे. उपलब्ध माहितीनुसार, मागील तीन दिवसांत दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या ८० ते ८५ हजारांचा टप्पा पार करून गेली आहे. मागील तीन दिवसांत रोज विक्रमी म्हणजे किमान ८० हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. केवळ १० ते १२ दिवसांत तब्बल १० लाखांनी रुग्ण संख्या वाढणे हा वाढत्या चिंतेचा विषय बनला असताना मात्र मृत्यूदर घटून ८१.७३  झाल्याचे केंद्रीय आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. गोव्याबाबत बोलायचे तर अंधःकारच अंधःकार आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केलेल्या भाकिताप्रमाणे, राज्यातील रुग्णांची संख्या या महिन्यात आणखी वाढणार असून ती २५ ते ३० हजारांच्या टप्पा गाठेल. दिवसागणिक वाढती बाधितांची संख्या, वाढती बळींची संख्या वाचून प्रत्येकजण जीव मुठीत धरून तोंडावर मास्क अन् कोरडा घसा साफ करण्यासाठी सोबत पाण्याचा किंवा चहाचा फ्लास्क घेऊनच चिंतनशील चेहऱ्याने बाहेर पडतो. ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’, हा मंत्र उपाशीपोटी कसा म्हणता (किंवा पाळता) येईल या विवंचनेत प्रत्येकजण आहे. सध्या बाधितांनी २० हजारांचा आकडा पार केला असून रुग्णांची संख्या ५ हजारांवर तर बळींच्या संख्येने २३० चा आकडा गाठला आहे. याच्यात भर पडली आहे ती राज्याच्या सीमा खुल्या केल्यामुळे. गोव्यात, केरी, पत्रादेवी, दोडामार्ग, पालये, नयबाग पोळे येथील सीमा खुल्या करण्यासाठी दबाव वाढत होता. त्यातच देशभरात राज्यांनी आपल्या सीमा केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर खुल्या केल्या असताना गोवा सरकार आमची अडवणूक का करते? हा लोकांचा सवाल होता. अर्थात, काही राज्यांनी आपल्या राज्यात कोविडची परिस्थिती गंभीर असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयास कळवले. गोवा हे भाजप आघाडीचे सरकार असल्यामुळे हे शक्य झाले नसावे. पण याहून एक धोका संभवतो तो म्हणजे देशभरातून पर्यटक, कामगारांचा लोंढा गोव्यात येणार आहे. त्यामुळे परमेश्वरा तूच आता गोव्याचे व गोवेकरांचे रक्षण कर, अशी प्रार्थना करणेच आपल्या हाती आहे. सीमा खुल्या झाल्या तरी गोवेकर मात्र अत्यावश्यक कामाशिवाय सीमा ओलांडणार नाही, हे निराळे सांगायला नको. सरकारने नुकताच कोरोनावर उपाय म्हणून प्लाझ्मा दात्यांना आवाहन केले आहे व अशा दात्यांच्या कुटुंबाला आरोग्यकवच देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे जी व्यक्ती प्लाझ्मा दान करेल त्याच्या कुटुंबातील सदस्याची वर्षभर आरोग्य तपासणी करण्याची सुविधा आरोग्यखात्यातर्फे दिली जाईल. ही योजना चांगली आहे. पण प्लाझ्मादान हे नेत्रदानासारखेच महान कार्य आहे, हे मान्य केले तरीही त्यातील मूलभूत फरक म्हणजे नेत्रदान हे मरणोत्तर करावयाचे आहे तर प्लाझ्मादान हा जिवंतपणी पीडितला संजीवनी देण्यासाठी करायचे आहे. यासाठी प्लाझ्मा दान करणाऱ्याच्या जीवाला धोका नाही. त्याच्यावर योग्य ते उपचार विनामूल्य केले जातील. यातून इतरांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. हे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी लोकसंपर्क साधून सांगितले पाहिजे. कारण सर्व गोष्टी सगळ्यांना एका पत्रकार परिषदेमुळे कळतातच असे नाही. याबाबत पंधरा वर्षांपूर्वी आमच्या समाजोन्नती संघटनेच्या तत्कालीन दलित संघटना कार्यक्रमात घडलेली गोष्ट सांगण्यासारखी आहे. आम्ही संघटनेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमास आमचे सन्मित्र स्वांतत्र्यसैनिक भैय्या ऊर्फ विश्वास देसाई खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्या आठवड्यात वृत्तपत्रांतून ‘नेत्रदान’ किती पवित्र कार्य आहे, तुम्ही तुमच्या चक्षुतून - इतरांना कशी दृष्टी देता वगैरे छापून आले होते. आपल्या भाषणात आपण नेत्रदान करणार असल्याचे भैय्यासाहेबांनी जाहीर केले. सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट केला त्यात भैय्यांच्या पत्नी सौ. आशा वहिनीही सामील झाल्यानंतर चहापानावेळी एक कार्यकर्ता पुढे आला व म्हणाला, पण हे नेत्रदान मरणानंतर करावयाचे असते ना? मी म्हणालो, हो का तुला भैय्याचे डोळे आताच काढायचे आहेत का? सर्वत्र हशा पिकला. मग मी म्हटले, त्याबाबतचा फॉर्म मात्र जिवंतपणीच भरावा लागतो. जवळचा ज्येष्ठ नागरीक म्हणाला, तर मग माझाही फॉर्म आता भरायला हरकत नाही. मला वाटले अशा गोष्टी अज्ञानातून घडतात व ज्यांची खरोखरीच त्यागाची भावना असते तिला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. येथे कोरोनाबाबत हिवाळ्यात मोठी रुग्णवाढ शक्य म्हणून जो जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे, त्याकडे लक्ष वेधावेसे वाटते. संघटनेच्या संकेतस्थळावरील संदेशात म्हटले आहे. हिवाळ्यात कोविड १९ ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाणे वाढण्याची शक्यता आहे. भारतासह अनेक देशांमध्ये हिवाळ्यात कोरोनाचा कहर आणखी वाढणारा आहे, म्हणजेच या विषाणूच्या विषवल्लीच्या महामारीच्या महासंकटाच्या कहराचे जहर आता अधिक प्राशन करावे लागणार आहे. अशी रास्त भीती निर्माण होणे रास्तच नव्हे काय?

अर्थात, ही परिस्थिती अनन्य अन् भयजन्य असली तरी या महामारीच्या महायुध्दातून पळून जाऊन कसे चालेल आणि पळालो तरी पळून पळून पळणार कुठे? कारण या विषाणूचा विळखा जगालाच आपल्या विळख्यात घेऊ पहात आहे. यासाठी योग्य ती खबरदारी घेत सावध रहाणे व इतरांना सावध करणे, जे जे होईल ते ते पहात केवळ रात्रच नव्हे तर दिवसही कोरोनाचे असेल तरी कोरोनाला डरो ना म्हणून मन घट्ट करून ईश्वराला शरण जाणे योग्य ठरणार आहे, असे म्हणावेसे वाटते.

संबंधित बातम्या