प्रासंगिक: सुशांतची आत्महत्या आणि विरोधाभास

शंभू भाऊ बांदेकर
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

मुख्य म्हणजे सुशांतसिंहच्या नातेवाईकांनी या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपविल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या आत्महत्येस बॉलिवूडच्या लहान कलाकारांपासून नामवंत कलाकारांचा हात आहे, काही राजकीय नेत्यांचा हात आहे. अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत.

प्रसिध्द बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) यांच्या आत्महत्येस आता अडीच-तीन महिने होत आले. यावर सर्व थरांतून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि शेवटी मग या अभिनेत्याच्या चौकशीचा तपास राष्ट्रीय गुन्हा अन्वेषण म्हणजे सीबीआयकडे सोपवून सरकारने एक चांगले पाऊल उचलले आहे.

मुख्य म्हणजे सुशांतसिंहच्या नातेवाईकांनी या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपविल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या आत्महत्येस बॉलिवूडच्या लहान कलाकारांपासून नामवंत कलाकारांचा हात आहे, काही राजकीय नेत्यांचा हात आहे. अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात दाखल सर्व याचिका हायकोर्टाने निकालात काढल्या असून या संबंधी सुप्रिम कोर्टाच्या निकालाचा हवाला देऊन मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने तसे सूचित केले आहे.

वास्तविक, सुशांतसिंह राजपूतचे आत्महत्या प्रकरण राष्ट्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आल्यानंतर या प्रकरणास पूर्णविराम मिळाला पाहिजे होता, पण तसे झालेले दिसत नाही. कारण या आत्महत्येला एखाद्या रहस्यमय चित्रपटासारखे अनेक कंगोरे असल्याचे बोलले जात असून जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत हे सारे चालूच राहणार आहे, असे दिसते. यात एक समाधानाची गोष्ट म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी चौकशीस गती देण्याचे काम केले आहे. पथकाने स्वयंपाक्यापासून अभिनेता, अभिनेत्री, राजपूतचे आर्थिक व्यवहार सांभाळणारी मंडळी या साऱ्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच सुशांतचा मोबाईल, लॅपटॉप, ५ डायरी, फॉरेन्सिक अहवाल, सीसीटिव्ही फुटेज, गळफासासाठी वापरण्यात आलेला हिरवा कपडा आणि वस्तू ताब्यात घेतल्या असून, त्या अनुषंगाने तपासास गती देण्याचे काम चालू आहे. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांचीही चौकशी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरे यांना ‘लक्ष्य’ करण्यात येत आहे, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे, आधिच यात शिवसेना आघाडीचे महाराष्ट्रातील सरकार पाडायचे प्रयत्न विरोधकांकडून चालू असल्याची टिकाही शिवसेना गोटातून झाली असली, तरी तपास द्रुतगतीने चालू असल्यामुळे सध्या तरी ‘थांबा आणि पाहा’ एवढेच यावर भाष्य करता येईल. 

अभिनयाची चांगली समज असलेला व सुरुवातीला समंजसपणे सगळे व्यवहार करणारा सुशांत आत्महत्या करण्याइतका अशांत का बनला हा पोलिस पथकालाही अचंब्यात टाकणारा प्रश्‍न आहे. नाही म्हणायला पाच-सहा वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत स्टार, सुपरस्टार बनलेल्या जुन्या-जाणत्या अभिनेत्यांसारखी या सृष्टीत सुरूवातीला सुशांतसिंहलाही बरीच लटपट-खटपट करावी लागली. पण नंतर त्याच्याकडे अमाप पैसा आणि प्रसिध्दी येऊ लागली होती. या उभरत्या काळात त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांसह असंख्य चाहत्यांच्या नशीबी हे यावे, याचे वाईट वाटल्याशिवाय कसे राहील? 

सुशांतसिंहने हे आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी जवळ-जवळ पाच सहा महिने सुशांत अशांत होता, अस्वस्थ होता असे त्याच्या मित्रांचे म्हणणे. आपल्या मानसिक ताण-तणावावर तो उपचारही घेत होता. व त्याची फाईलही पोलिसांना सापडली आहे. म्हणजे त्याने आत्महत्येचे उचललेले पाऊल हे आकस्मिक नव्हते, तर मनाच्या दोलायमान परिस्थितीत त्याल योग्य तो उपदेश करायला कुणी सन्मित्र सापडला नव्हता आणि आत्महत्येला परावृत्त झालेल्या आपल्या मुलाला (अर्थात चित्रपटात) परावृत्त करणाऱ्या पित्याची भूमिका त्याने किती समजून उमजून केली होती बरे?

तुम्ही त्याचा ‘छिछोरे’ हा चित्रपट पाहिला आहे का? आत्महत्या करू पाहणाऱ्या आपल्या मुलाची समजूत घालणाऱ्या पित्याची भूमिका त्याने किती ताकदीने वठवलेली आहे, याचे प्रत्यंतर हा चित्रपट पाहताना आपल्या लक्षात येते.

अभ्यासाच्या तणावाखाली असलेला मुलगा परीक्षेत नापास झाल्यावर त्याच्या मनात आत्महत्येचे विचार थैमान घालू लागतात. तशा प्रयत्नास मग त्याला इस्पितळात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येते. यावेळी त्याचा पिता म्हणजे सुशांतसिंह आपली कर्मकहाणी सांगतो. आपण स्वतः महाविद्यालयीन अभ्यासात कसे मागे मागे होतो आणि मग प्रयत्न करून करून शेवटी आपण कसा ‘टॉपर’ झालो. याची हकीकत तो आपल्या मुलाला सांगतो. त्याल हिंमत देतो. यश मिळाले की त्याचे श्रेय सर्वांनाच घ्यावेसे वाटते, पण अपयशाने खचून गेलेल्याला कसा हात द्यायचा हा प्रश्‍न मध्यभागी ठेवून या चित्रपटाची निर्मिती झाली. चित्रपटात प्रभाविपणे काम करून टाळ्या घेतलेल्या या पित्याला मात्र स्वतःच्या नैराश्‍यातून बाहेर काढणारा कुणी भेटला नाही. म्हणूनच तर त्याचे पाऊल आत्महत्येपर्यंत पोहोचले. 

सुशांतसिंह राजपूतने आपल्या चित्रसृष्टीची सुरूवात ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेपासून केली. पण त्याची खरी ओळख ही एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्‍ता’ या मालिकेद्वारे सर्वांना झाली. त्यानंतर सुशांतसिंहने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ‘काय पो छे’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत तो सर्वतोमुखी खऱ्या अर्थाने झाला. तो नुकतेच क्रिकेट विश्‍वातून निवृत्त झालेले महेेंद्रसिंह धोनी यांचा बायोपिक ‘एम. एस. धोनी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने नवीन नट-नटींना घेवून काढलेल्या चित्रपटामुळे विशेष कमाई होत नाही, असे म्हटले जात. पण सुशांतसिंहच्या या चित्रपटाने शंभर कोटींहून अधिक कमाई केली हाेती. सध्या १०-१२ चित्रपट त्यांच्या नावावर होते. 

‘चंद्रावर जमीन खरेदी करणारा पहिला अभिनेता’ असा लौकिक मिळविणाऱ्या सुशांतसिंह राजपूतच्या अकाली जाण्याने त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व चाहत्यांचे स्वप्न अपुरे राहिले हे मात्र खरे!

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या