पर्यावरण: सौर वृक्षाची संजीवनी

योगिराज प्रभुणे
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा ग्राहक देश म्हणून गणला जातो. ऊर्जेची ही मागणी दरवर्षी पाच टक्‍क्‍यांनी वाढत असून, पुढील वीस वर्षांमध्ये ऊर्जेची मागणी दुप्पट होण्याची शक्‍यता आहे.

ऊर्जा ही देशाच्या आर्थिक-सामाजिक विकासाची किल्ली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी स्वस्त, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा पुरवठा अत्यंत आवश्‍यक ठरतो. भारतासह जगभरात ऊर्जेची मागणी प्रचंड वाढत आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा ग्राहक देश म्हणून गणला जातो. ऊर्जेची ही मागणी दरवर्षी पाच टक्‍क्‍यांनी वाढत असून, पुढील वीस वर्षांमध्ये ऊर्जेची मागणी दुप्पट होण्याची शक्‍यता आहे. खनिजांपासून निर्माण केलेल्या उर्जेला मर्यादा आहेत. खनिज पदार्थ भविष्यात कधी न कधी संपणार आहेत. तेव्हा अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा प्रभावी वापर ही आधुनिक काळाची गरज आहे. त्यातही पर्यावरण संवर्धनासाठी हरित ऊर्जेला प्राधान्य देणाऱ्या आधुनिक युगात आपण आहोत. या पार्श्वभूमीवर उर्जेची भविष्यातील निर्मिती आणि प्रत्यक्ष गरज याकडे डोळसपणे पाहण्याची ही वेळ आहे. त्यासाठी सौर ऊर्जेचे झाड यासारखे प्रकल्प दिशादर्शक ठरतात.

वर्षभरात १२ हजार युनिट हरित ऊर्जा
‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद’ (सीएसआयआर) आणि ‘केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिक संशोधन संस्था’ (सीएमईआरआय) यांनी जगातील सर्वात मोठा सौर वृक्ष विकसित केला आहे. तो दुर्गापूर येथील ‘सीएसआयआर-सीएमईआरआय’ निवासी कॉलनी येथे उभारण्यात आला आहे. पृथ्वीच्या उर्जेचा सूर्य हा मुख्य स्त्रोत. या मूलभूत तत्त्वाच्या आधारावर ‘सीएमईआरआय’चे संचालक प्रा. डॉ. हरीश हिरानी यांनी सौर वृक्षाचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाची क्षमता ११.५ किलोवॉटपेक्षा जास्त ऊर्जा निर्माण करण्याची आहे. वर्षभरात या झाडापासून १२ ते १४ हजार युनिट स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्माण करता येईल. प्रत्येक सौर पॅनेलला सूर्याचा जास्तीत जास्त प्रकाश मिळेल, अशा पद्धतीने सौर वृक्षाची रचना करण्यात आली आहे. त्याच्या प्रत्येक पॅनेलवर ३०० वॉट पिक क्षमतेचे ३५ पीव्ही पॅनेल बसविण्यात आले आहेत. ते गरजेनुसार वर-खाली करता येतात. इमारतीच्या छतावर बसविलेल्या सौर पॅनेलला अशी सुविधा नसते. सौर वृक्षापासून किती ऊर्जा मिळत आहे, त्याची प्रत्येक क्षणाची माहिती मिळते, तसेच, दिवसभराचीही माहिती मिळण्याची सुविधा यात आहे.  जगातील सर्वात मोठा सौर वृक्ष हे याचे एकमेव वैशिष्ट्य नाही, तर तो एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज घेऊन जाता येतो, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य. तो वेगवेगळ्या ठिकाणी लावता येईल, अशा पद्धतीने त्याची रचना केली आहे. कृषी क्षेत्रात याचा सर्वाधिक प्रभावी वापर करणे शक्‍य आहे. उच्च क्षमतेचे कृषी पंप, ई-ट्रॅक्‍टर, ई-पॉवर टिलर्स अशी कृषी अवजारे यावर चालविता येतात. अशा एका सौर वृक्षापासून १० ते १२ टन कार्बन डायऑक्‍साईडचे उत्सर्जन कमी करता येईल. त्याचा थेट उपयोग पर्यावरण संवर्धनासाठी होईल. तसेच, या झाडापासून निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा ग्रिडमध्ये साठवता येऊ शकते.

देशातील बहुतांश भागात शेतीच्या कामांसाठी खनिज इंधनाचा वापर करतात. या सौर वृक्षामुळे या इंधनावरचा खर्च कमी होईल. त्यातून पैशाची बचत होऊन कृषी क्षेत्रातील अनिश्‍चितता कमी करता येईल. त्यामुळे शेती व्यावसाय हा आर्थिकदृष्ट्याच नाही, तर पर्यावरणीयदृष्ट्याही फायदेशीर ठरेल. या सौर वृक्षापासून फक्त ऊर्जा मिळणार नाही, तर शेतकऱ्यांना उपयुक्त अशा अनेक सुविधा त्यात आहेत.  दिवस-रात्र उपयुक्त ठरेल असा सीसीटीव्ही कॅमेरा त्यात बसवता येईल. तसेच, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कळेल. वाऱ्याचा वेग समजेल. पावसाचा अंदाज आणि मृदापरीक्षणही यातून करता येईल. एका सौर वृक्षासाठी सुमारे साडेसात लाख रुपये खर्च येतो. सौर वृक्षामुळे होणारे हे फायदे लक्षात घेतले, तर जवळजवळ बाराही महिने लख्ख सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या आपल्या देशासाठी तो वरदान ठरेल.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या