प्रासंगिक: काळजी घ्या, मास्ककडे दुर्लक्ष नको!

सुहासिनी प्रभुगावकर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

प्रत्येकाने मास्कचे महत्त्व एकमेकांना सांगण्याची वेळ आली आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरत असल्याचा आनंद घेत सर्व व्यवहार, व्यापार, मद्यालये खुली करण्याच्या धांदलीत जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्या लाटेचे इशारे केंद्र व राज्य सरकार विसरूनच गेले नसावे ना? हा प्रश्‍न विचारण्याची वेळ का यावी अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

दोन अडिच महिने बिनधास्तपणे कोरोनाच्या कालावधीत मास्कविना सकाळच्या प्रहरी शारीरिक तंदुरुस्तीसाठी तिला विशेष गजबजाट नसलेल्या रस्त्यावर धावताना मी पाहिले. निवासी प्रकल्पातील वाहन पार्किंगची मोकळी जागा तिच्यासाठीच राखून ठेवली आहे अशी तिची वागणूक होती. तिची मुलगीही मास्कविना सायकल चालवायची. मास्क घाल, तू चूक करतेस असे तिला सांगण्याचे, समाजवण्याचे प्रयत्न करून थकल्यानंतर तिच्याकडे मी पाठ करायची ठरवले. अचानक चतुर्थीला दहा-बारा दिवस असताना ती कोरोनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाली. ज्या संकटाची चाहूल मी तिला देत होते त्या संकटाने तिला घेरले होते, तिच्या मुलींनाही कोरोनाची बाधा झाली. महिनाभराहून अधिक काळ तिचे तोंडही पहायला मिळाले नाही. परंतु नंतर ज्यावेळी अलीकडेच ती समोर आली त्यावेळीही तिने मास्क घातलेला नव्हता. मास्क हातात घेऊन हसत-हसत चालताना दिसल्यामुळे. दुरुनच तिला मी पुनश्च इशारा दिला. मास्कचा उपयोग कर अन्यथा पुन्हा आजारी होशील. गेले तीन-चार महिने सवयच जडली आहे घरातून बाहेर पाऊल टाकताना नाक, तोंड मास्कने झाकायची. जास्त वेळ मास्क घातल्यास मला सुरवातीला गुदमरल्यासारखे व्हायचे परंतु हळुहळू मास्कआडून बोलायला शिकले. इतरांनाही तसे करावे, अगदी लोकप्रतिनिधी, भाजीवाले, फुलवाल्यांपासून आलिशान वाहन चालवणाऱ्यांपर्यंत सर्वांनीच मास्क नाका, तोंडावर कसा वापरावा, मास्क घालूनच कसे बोलावे हे माझ्या संपर्कात येणाऱ्यांना मी सांगतेय.

प्रत्येकाने मास्कचे महत्त्व एकमेकांना सांगण्याची वेळ आली आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरत असल्याचा आनंद घेत सर्व व्यवहार, व्यापार, मद्यालये खुली करण्याच्या धांदलीत जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्या लाटेचे इशारे केंद्र व राज्य सरकार विसरूनच गेले नसावे ना? हा प्रश्‍न विचारण्याची वेळ का यावी अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. पहिल्या लाटेतून वाचलेले कदाचित आता आपण सुरक्षित आहोत या भ्रमात असावे किंवा त्यांना कोरोनतून मुक्त झाल्यानंतर काय, कशी काळजी घ्यायची ते डोस उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी दिले नसावे का अशा शंका उपस्थित होत आहेत. कोरोनामुक्ती मिळाल्यानंतर मागील आठवड्यात केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी घरी परतताना पत्रकारांकडे बोलण्यासाठी, मंदिरात गेल्यानंतर मास्क नाकावरून तोंडापर्यंत उतरवला तो व्हिडिओ व्हायरल झाला. कोरोनासंगे लढत काम करणाऱ्यांनी काय हे, सरकारची लाज काढली अशा प्रश्‍नांच्या फैरी झाडल्या. लोकप्रतिनिधीच जर असे करतात तर मग सर्वसामान्यांत जागृती काय उपयोगाची? श्रीपादभाऊंच्या नाकावरून घसरलेल्या मास्कचे दर्शन केंद्रालाही घ़डले असावे. कारण दुसऱ्याच दिवशी कोरोनामुक्तीनंतर काय काळजी घ्यायची त्यासंदर्भात लांबलचक संहिता जारी करणारी अधिसूचना निघाली. प्रारंभी शेकडो, हजारो आणि आता लाखो कोविड १९ मधून बाहेर पडताना त्यांनी मुक्तीनंतरही दक्षता कशी घ्यायची तो उपदेश करणारी संहिता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने उशीरा का जारी केली? कदाचित, चतुर्थीनंतर दिवसाला जवळजवळ लाखभर कोविडग्रस्तांची नोंद होऊ लागल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय जागे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय आयुषमंत्री, आमदार सुदिन ढवळीकर, आमदार क्लाफास डायस, आमदार चर्चिल आलेमाव आणि मुख्यमंत्र्यांनी त्या संहितेचे बारकाईने वाचन करून पालनही करावे. कारण एकच त्यांच्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले आपत्तीग्रस्त झाले आहेत. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी दिनचर्या, ऋतुचर्या, प्राणायामच नव्हे तर आहाराबद्दल जनतेला मार्गदर्शन करावे, आपला अनुभवही सांगावा म्हणजे लोकांत असलेले भीतीचे सावट दूर नसले तरी कमी होईल. कोरोनाची प्रारंभीची लक्षणे दिल्यास लवकर चाचण्या करा, मास्क घालण्यात दिरंगाई करू नका, मास्क घालूनच बोला, ज्येष्ठांनी आवश्‍यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असा सल्ला त्यांनी द्यायला हवा.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवे रुग्ण असतीलच परंतु पहिल्या लाटेवरील रुग्णांनी हयगय केल्यास जबरदस्त फटका बसणारच हे लक्षात ठेवावे. कोरोनाच्या आकडेवारीकडे पाहायचे नाही, कोठे कोरोनाग्रस्त आढळतात ते जाणून घ्यायचे नाही, कोरोनाच्या वृत्ताकडे डोळेझाक करायची म्हणजे मनातले भय कमी होईल अशातला भाग नाही. वास्तवाकडे बघायलाच पाहिजे, वास्तव समजून घ्यायलाच हवे तसे केल्यास वास्तवाला सामोरे जाण्याची, भिडण्याची वाट दिसेल, बळही मिळेल.

कोरोनासंगे जगायला हवे हा संदेश घेऊनच व्यवहाराला हात घातला गेला, विद्यालयात घंटा वाजवण्यासाठी सुसज्जता होत आहे परंतु तत्पूर्वी पूर्वतयारी झाली का? विद्यालयातील, माॅल्सचे दरवाजे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांच्या पालनांसाठी उपयुक्त आहेत का? प्रत्येक शाळेत किंवा परिसरातील दोन शाळा, विद्यालयांत मिळून एक डाॅक्टर असायलाच हवा, विद्यार्थ्यांना, ग्राहकांना मुक्तपणे दरवाजातून ये-जा करता यावी, गर्दीचा सामना करावा लागू नये असे रुंद दरवाजे हवे असे राज्य सरकारच्या संहितेत असावे व त्याचे पालन कठोरपणे केले जाईल, याची जबाबदारी घ्यायला हवी. दुर्दैवाने ज्या वेगाने सरकारी यंत्रणेत कोरोनाचा शिरकाव होतोय ते पाहिल्यास प्राथमिक ज्ञान, जागृतीच्या ध़ड्यांत सरकारच कमी पडले असावे असा निष्कर्ष काढला जाईल. सार्वजनिक संपर्कात येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुरक्षा कवच हवे, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांऐवजी तळागाळाशी जोडलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना मोफत मास्कचा, मुख कवच (फेस शिल्डस) वेळोवेळी पुरवठा व्हायलाच हवा. मास्क दिले म्हणजे जबाबदारी संपणार नाही. त्यांचा योग्य वापर करण्यापासून ते कसे स्वच्छ ठेवावे? कधी धुवावे? घरातही मास्कचा उपयोग कधी करावा? नवीन मास्क कधी घ्यावे? या मुद्यांवर मार्गदर्शन मिळायला हवे. प्रामुख्याने कनिष्ठ श्रेणीतील स्वच्छता, साफसफाईच्या कामकाजात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क वापराविषयी प्रशिक्षण योग्यरित्या दिल्यास कोरोनापासून त्यांचा बचाव होऊ शकतो. कचरा व्यवस्थापन खात्याने जबाबदारीने काम हाताळल्यास, नगरपालिका, पंचायतींना जागे केल्यास परिसर स्वच्छ राहील. मास्क, सोशल डिस्टन्सिंगबरोबरीने आहारशास्त्र, परिसराची स्वच्छता, घर, कार्यालयीन साफसफाई, कचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा निचरा कोरोना व्यवस्थापनात महत्त्वाचा भाग आहे. एका आरोग्य खात्याला दोषी धरून कसे चालेल? नगरपालिका, पंचायतीपासून स्थानिक स्वराज यंत्रणा आणि वैयक्तिक पातळीवरही शिस्त हवी. 

सरकारने सुशोभिकरण, स्मारके, पुतळ्यांऐवजी हा पैसा कचरा, गटारबांधणी, सांडपाणी निचरा व्यवस्थापनावर खर्च करावा. कचरा व्यवस्थापनाची समस्या सुटल्यास भविष्यात येणाऱ्या महामारीवर नियंत्रण येऊ शकते हे साधे सोपे गणित आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या