प्रासंगिक: मानसिक स्वास्थ्य जपा!

प्राची नाईक
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

आपल्याला मानसिक त्रासाची काही लक्षणे आढळल्यास आपण आपल्या स्मार्ट फोन (अँड्रॉइड आणि आईओएस प्लेस्टोर) वर उपलब्ध असलेल्या अनेक ॲपकडे एक पर्याय म्हणून पाहू शकतो.

महामारीच्या दिवसांत आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यात अधिकच सतर्क झालो आहोत. पण अशावेळी आपल्या मानसिक आरोग्याच्या सक्षमीकरणाबाबत आपल्या मनात विचार तरी आला असेल का? मागील सहा महिन्यांत हजारो युवकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेक उद्योग बंद पडले आहेत. अनेक विद्यार्थी, बेरोजगार युवकांना घरी बसून आता पुढे काय या विचाराने घेरलेले आहे. ज्यांच्या नोकऱ्या अजूनही आहेत त्यांना काही महिन्यांचा पगार मिळालेला नाही किंवा त्यांचा पगार कापला गेला आहे. अशा हजारो गोष्टी या काही महिन्यांच्या कालावधीत घडलेल्या आहेत. त्यामुळे महामारीने नाही तर उपासमारीने मरू अशी काही लोकांची परिस्थिती झालेली आहे. अशा कठीण प्रसंगी आपले मानसिक आरोग्य आपल्या शारीरिक स्वस्थते सोबत महत्त्वाचे ठरते. 

आपल्याला मानसिक त्रासाची काही लक्षणे आढळल्यास आपण आपल्या स्मार्ट फोन (अँड्रॉइड आणि आईओएस प्लेस्टोर) वर उपलब्ध असलेल्या अनेक ॲपकडे एक पर्याय म्हणून पाहू शकतो. ''हॅपीफाई''(happify) हे ॲप अश्याच लोकांना मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तणाव आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी यात अनेक प्रोग्राम आणि गेम असतात. जे आपल्या आयुष्यात बदल आणण्यात सहाय्य करते. यात सकारात्मक मानसशास्त्र (पॉजिटिव्ह सायकॉलॉजी), सीबीटी सारखी अनेक मान्यताप्राप्त मानसशास्त्र तंत्रे वापरून तयार केलेले गेम्स आहेत. 

हे ॲप प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असून ''हॅपीफाई प्लस'' म्हणून श्रेणी सुधारणा करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. 

हप्पीफायच्या वापरकर्त्यांना  वैयक्तिक “हॅपीनेस ट्रॅक” मिळतो. ज्यात ध्यान, योग तसेच आपल्या विश्रांती या सारख्या अनेक क्रियांवर मार्गदर्शन केले जाते आणि त्यासोबत वेळोवेळी आपल्या प्रगतीची नोंद ठेवली जाते.

ध्यान कसे करावे हे प्रारंभी समजणे कठीण वाटू शकते. अशा वेळेस अनेक योग शिक्षक आणि प्रशिक्षक मदतीला आहेतच पण महामारीमुळे त्यांची मदत घेणे कठीण होत आहे. अशा वेळेस अनेक ॲप आपली मदत करतात. यात हेडस्पेस (Headspace) सारखे ॲप फारच प्रचलित असून या ॲपमध्ये अगदी नवशिक्यांसाठीसुद्धा सोपी वाटावी अशी ध्यान आणि साधना तंत्रे समाविष्ट केलेली आहेत. आपल्या प्रगतीनुसार यात अधिक प्रगत सत्रे देखील उपलब्ध आहेत.

या ॲपमध्ये चिंतन आणि ध्यान करण्याचे अनेक पद्धती उपलब्ध असून अगदी काही वेळात आपले मन शांत करण्यासाठी २-३ मिनिटाचे “मिनी चिंतन”  देखील उपलब्ध आहे. यात भीती, चिंता, तणाव सारख्या काही क्षणांसाठी “एसओएस” सत्रांचा समावेश आहे. मुलांसाठी देखील शांतता आणि एकाग्रतेसाठी अनेक सत्रे उपलब्ध असून हे ॲप वापरल्याने अनेक फायदे होऊ शकतात.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या