टंगळ-मंगळ: ‘पाठ’ 

विजय कापडी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

पोट ही सातत्याने रिकामी होणारी पिशवी असल्यामुळे आणि ती सारखी भरलेली असावी, असे वाटल्याने पाठीपेक्षा पोटाची आठवण होत राहणे साहजिकच म्‍हणायला हवे. पण, म्हणून काही पाठीचे महत्त्‍व कमी होत नाही.

पाठ’ या शब्दाचे अर्थ अनेक. ‘पाठ’ म्हणजे अभ्यासाच्या पुस्तकातला धडा. ‘पाठ’ म्हणजे वहिवाट. ‘पाठ’ म्हणजे पुनःपुन्‍हा म्हणून एखादी गोष्ट मुखोदगत होईल, अशी व्यवस्था करायला घेणे. पण, या विविध परिचित अर्थाबरोबरच पाठ म्हणजे तुमच्या  आमच्या शरीरातच दडून बसलेला कंबरेपासून ते थेट मानेपर्यंतचा भाग. पाठीचाच प्रमुख भाग म्हणजे त्यात दडलेली मणक्यांची अतूट माळ.

पोट आणि पाठ या दोन्ही महत्त्‍वाच्या अवयवांची जागा एकमेकांच्या मागे पुढे असली, तरी यातला महत्त्‍वाचा नेमका अवयव कोणता, याबद्दल संभ्रम निर्माण होण्याचे कारण काय? पण, पोट ही सातत्याने रिकामी होणारी पिशवी असल्यामुळे आणि ती सारखी भरलेली असावी, असे वाटल्याने पाठीपेक्षा पोटाची आठवण होत राहणे साहजिकच म्‍हणायला हवे. पण, म्हणून काही पाठीचे महत्त्‍व कमी होत नाही. अहो, ‘पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका’, या आर्जवी विनवणीत पोटासाठी मार खायला पाठ तत्पर असते. हा पाठीचा मोठेपणा नव्हे काय? एक मात्र खरे की, ‘कशासाठी पोटासाठी’ हा प्रश्न पाठीच्या बाबतीत अप्रस्तुत ठरावा. एखाद्या चांगल्या कामाबद्दल शाबासकी द्यायची असेल, तर पाठच थोपटायला घेतात. अर्थात स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेणारेही असतात. दुसऱ्याला खुश करण्यासाठी लक्षणीय अर्थात त्याची पाठ खाजवायला घेतली की झाले. शिवाय कलेच्या क्षेत्रात एकमेकांच्या तथाकथित कर्तबगारीबद्दल एकमेकांची पाठ खाजवणारेही असतात! प्रत्यक्षात खाज सुटलेल्या पाठीचे दमन करणे काहीसे अडचणीचेच म्हणावे लागेल. त्यासाठी घरातल्या दुसऱ्याला विनंती करावी लागते. नाखुषीने का होईना, पण तो तेवढ्यापुरती पाठ खाजवून देतोही. पण आजकाल ‘स्वतःची पाठ स्वतःच खाजवा’ या कृतीसाठी बाजारात प्लॅस्टिकचे हात विक्रीसाठी उपलब्ध असतात. घराघरातले सेवानिवृत्त या कृत्रिम हाताचा उपयोग स्वतःच करताना दिसतात.

‘पाठ’ या अवयवाचा एक विशेष म्हणजे स्वतःच्या पाठीचे स्वतःलाच दर्शन घेणे सहसा जमत नाही. 

त्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. पण, चेहऱ्याच्या दर्शनाइतके पाठीचे दर्शन सुखावह नसावे. कारण, दिवसातून कितीतरी वेळ आपला मुखडा आरशात पाहणारे कितीतरी असतील. पण, पाठ हा सारखा सारखा आरशात पाहायचा अवयवच नव्हे! पाठीचे अस्तित्त्व हे खूप काम करून दमून भागून आल्‍यावर जमिनीवर आरामासाठी अंग टाकताना मात्र जाणवतेच. आराम म्हणजे काय ते पाठ टेकल्यानंतरच कळते.

सर्व अवयवातला सगळ्यात शक्तिमान अवयव म्हणजे पाठच. उगाच नाही, शंभर शंभर किलोग्रॅम वजनाच्या धान्याची पोती पाठीवर तोलली जातात. भल्या मोठ्या आकाराच्या ट्रकमधली जडशील पोती लिलया आपल्या पाठीवर पेलून कमीत कमी वेळात संपूर्ण ट्रक रिकामा करण्याच्या मजुरांच्या किमयेत पाठीचाच तर सिंहाचा वाटा असतो. काही कारणाने पाठ नादुरुस्त झाली तर पाठ कोणतेही काम करण्याच्या बाबतीत असहकार नोंदवते आणि मग वेदनेचे ब्रह्मांड आठवल्यावाचून राहत नाही. उभ्याला आडवा करण्याचे सामर्थ्य पाठीत आहे, म्हणतात ते काय खोटे की काय? मोठ्या आजाराप्रमाणेच पाठीचे किरकोळ स्वरुपाचे आजारही असतात. कुणीही धरली नसताना ‘पाठ धरते’ आणि काहीही भरलेले नसताना ‘पाठ भरते’ पाठीचा एखादा तरी मणका जरा कुठं मूळ जागेपासून सरकला, तर योग्‍य उपायांनी तो मूळ पदावर येईपर्यंत जीवास चैन म्हणून लाभत नाही. कुस्तीच्या खेळात पाठीचे महत्त्‍व  अनन्यसाधारणच म्हणावे लागेल. आखाड्यात एकमेकांशी भिडणाऱ्या पैलवानांच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय असते आणि ते म्हणजे प्रतिस्पर्धाची पाठ जमिनीला टेकवणे. पाठ जमिनीला टेकली की आपसुकच असल्याचे दर्शन घडतेच पाठीचे अनेक प्रकार संभवतात. पाठ मऊ करता येते. पाठीचं धिरडे करता येते. पाठीमागे मागणीचा भुंगाही मागे लावता येतो. ज्ञानेश्वर माऊलींनी तर पाठीचा तव्यासारखा उपयोग करून मांडा तयार केला होता! आवडीच्या माणसाला सारे छळत असतील तर त्याला पाठीशी घालता येते. एखाद्या गोष्टीतून लक्ष काढून घ्यायचे असेल, तर पाठ फिरवली की झाले. कौतुकाच्या वेळी पाठीवरून हात फिरवला जातो. त्याचप्रमाणे सांत्‍वनाच्‍यावेळी काही कारणाने वेगाने पळ काढायचा असेल तर पाठीला पाय लावून धूम ठोकता येते. पाठीविषयी कितीही सांगितले, तरीही ते थोडेच!!

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या