सर्च-रिसर्च: लघुग्रहांनी आणले पाणी

सम्राट कदम
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

खगोलशास्रातील आजवरच्या संशोधनानुसार तरी अजून दुसरी जीवसृष्टी सापडलेली नाही. त्यामुळे जीवसृष्टीला आश्रय देणारे हे पाणी पृथ्वीवरच का आढळते? ते नक्की तयार कसे झाले? ते आधीपासूनच पृथ्वीवर होते, की परग्रहांवरून उल्कापातातून आले? असे अनेक प्रश्न पडणे साहजिक आहे.

पृथ्वीवर जीवसृष्टी फळण्या-फुलण्याचे मुख्य कारण म्हणजे पाणी! म्हणूनच त्याला जीवन असेही संबोधले जाते. परग्रहावर जीवसृष्टीच्या पाऊलखुणा तपासण्यासाठी प्रथम तिथे पाणी आहे का नाही हे तपासले जाते. हायड्रोजनचे दोन आणि ऑक्‍सिजनचा एक अणू एकत्र येऊन तयार झालेले हे संयुग म्हणजे जीवनाचे द्योतक आहे. खगोलशास्रातील आजवरच्या संशोधनानुसार तरी अजून दुसरी जीवसृष्टी सापडलेली नाही. त्यामुळे जीवसृष्टीला आश्रय देणारे हे पाणी पृथ्वीवरच का आढळते? ते नक्की तयार कसे झाले? ते आधीपासूनच पृथ्वीवर होते, की परग्रहांवरून उल्कापातातून आले? असे अनेक प्रश्न पडणे साहजिक आहे.

माणसाच्या मनात जीवसृष्टीसंबंधीचे कुतूहल जागृत झाले तेव्हापासून पाण्याच्या अस्तित्वासंबंधी त्याला विशेष आकर्षण आहे. पृथ्वीवर पहिला जीव अवतरला तो महासागरात. तेव्हा या महासागरांची निर्मिती कशी झाली. याचा शोध घेण्यास शास्रज्ञांनी सुरुवात केली. आपल्या सूर्यमालेत पृथ्वीवरच द्रव स्वरूपात पाण्याचे अस्तित्व आहे. गुरु आणि शनीच्या निवडक उपग्रहांवर बर्फाच्या स्वरूपात पाणी आहे. एवढेच काय तर आपल्या चंद्रावरही पाण्याचे कण असल्याचे ‘इस्रो’च्या ‘चांद्रयान-१’ मोहिमेने सिद्ध केले आहे. सूर्यमालेत पाण्याचे एवढे दुर्भिक्ष बघता पृथ्वीवरील हे अनमोल पाणी दूर अंतराळातून लघुग्रहांच्या माध्यमातून आले असावे, असा अंदाज शास्रज्ञ व्यक्त करत आहेत. तसेच हे पाणी पृथ्वीवर सुरुवातीपासूनच असल्याच शास्रज्ञांचा एक गट मानतो. पण आता या चर्चेला पूर्णविराम मिळेल अशी दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिक ‘सायन्स’मध्ये यासंबंधीचा एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये आपल्या सूर्यमालेतच आढळणाऱ्या लघुग्रहांमुळे पृथ्वीवर पाण्याची निर्मिती झाल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. म्हणजे दूर अंतराळातून किंवा दुसऱ्या सूर्यमालेतून आलेल्या लघुग्रहांमुळे पृथ्वीवर पाणी निर्माण झाल्याचा सिद्धांत हे संशोधन खोडून काढत आहे.

लघुग्रहांच्या धडकेतून पृथ्वीवर पाणी 
पृथ्वीवर आजपर्यंत झालेल्या तेरा अनपेक्षित उल्कापातांचा किंवा लघुग्रहांच्या धडकांचा अभ्यास शास्रज्ञांनी केला. ज्यामध्ये पाणी किंवा पाण्यातील महत्त्वपूर्ण मूलद्रव्य असलेल्या हायड्रोजनचे किंवा त्याचा मोठा भाऊ असलेल्या ड्युटेरॉनचे अस्तित्व असलेल्या लघुग्रहांच्या धडकांचा या अभ्यासात समावेश होता. त्यातून लक्षात आले, की दुसऱ्या सूर्यमालेतून किंवा दूर अंतराळातूनही आलेल्या लघुग्रहांमध्ये इतके पाणी नव्हते की ते पृथ्वीला इतके पाणीदार करतील. शास्रज्ञांनी मग आसपासच्या ग्रहांवर लक्ष देण्यास सुरुवात केली. 

पृथ्वीसह सूर्यमालेत २३ ठिकाणी पाण्याचे अस्तित्व आढळले. गुरुचा उपग्रह युरोपावर, तसेच इन्सेलएड्‌स, गेनीमेड, तसेच शनीच्या उपग्रहांवरही पाण्याचे अस्तित्व आढळले. पाण्याची ही ठिकाणे बघता सूर्यमालेचा बाह्यग्रहांतून म्हणजे गुरु ग्रहापासून पुढच्या ग्रहांमध्ये पाण्याचे ठळक अस्तित्व आढळले. तुलनेने मंगळापासून आतल्या म्हणजे सूर्याकडेच्या ग्रहांमध्ये पृथ्वी वगळता पाण्याचे अस्तित्व तुलनेने कमी दिसते. त्यामुळे पृथ्वीवर आढळणारे हे पाणी निश्‍चितपणे या बाह्यग्रहांपासून आले असावे असे शास्रज्ञ म्हणतात. म्हणजेच पृथ्वीची निर्मिती होत असताना ‘कूपर बेल्ट’ ( मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये आढळणारा लघुग्रहांचा पट्टा.) मधून किंवा त्या पलीकडून आलेल्या बर्फाच्या लघुग्रहांच्या धडकेतून पृथ्वीवर पाणी आले, यावर शिक्कामोर्तब होत आहे. त्यामुळे निर्मितीच्या काळात तप्त असलेल्या पृथ्वीवर सूर्यमालेतच निर्माण झालेल्या लघुग्रहांच्या धडकेतून पाणी आले आणि त्यातूनच पुढे जीवसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्याप्रमाणे हिमालयातील उंच शिखरांतून वाहणाऱ्या गंगेचा भूतलावरील मार्ग भगिरथाने सुकर केला, त्याप्रमाणे सूर्यमालेतील जलगंगेला पृथ्वीवर अवतरण्यासाठी लघुग्रहरूपी भगीरथ उपयोगी पडले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या