अर्थविश्‍व: आम्हा तो गणपती सुखकर हो!

डॉ. मनोज कामत
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

कमी उत्साही पण अतिशय भक्तीमय वातावरणात दीड दिवसांच्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. कोविड महामारीच्या छायेत यंदाच्या गणपती उत्सवाच्या थाटामाटात, बाजार रहाटीत, जनसामान्यांच्या वागण्या-मिसळण्यात जाणवत यंदाचा उत्सव सामान्य व उत्साहाच्या बाबतीत वंचितच राहिला ही बाब खटकली.

ऐन चतुर्थीच्या काळात जनसामान्यांच्या भितीत व अनिश्‍चितेत अधिकच भर पडली ती कोविडच्या महामारीची संख्या ३० लाखांनी ओलांडून. चतुर्थीच्या आदल्या दिवशी ता. २१ ऑगस्ट रोजी तर कोविड बाधितांची संख्या ८९००० च्या संख्येने वाढली. कोविड बाधितांची संख्या दुपटीने वाढण्याची वेळ मर्यादा तर दिवसेंदिवस घसरत असून देशावरील संकटाचे सावट अति गडद होत आहे. देशातील कोविड बाधितांची संख्या दर २१ दिवसांनी दुप्पट होत असून आज जगभरातील सरासरी ४३ दिवसांची आहे. यावरून भारतातील भीषण स्थिती लक्षात यावी.

देशात कोविड बाधितांची संख्या एक लाख पार होण्यासाठी सुरवातीला आपल्याला ६९ दिवस लागले होते. परंतू, त्यानंतर हा आकडा १० लाख पार व्हायला फक्त ५९ दिवस लागावेत. ही बाब भारतासारख्या विकसनशील देशाच्या केवळ आरोग्यास धोकाच नव्हे तर अर्थव्यवस्थेचाही ऱ्हास दर्शवितो.

कोविड बाधितांचा देशातील वाढीचा दर लक्षात घेता व अन्य देशांतील सरासरी ध्यानात घेतल्यास हा वाढता दर शिगेला पोचण्यासाठी आपल्याला अजून प्रतिक्षा करावी लागेल. असे स्टेट बँक ऑप इंडियाच्या एका अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. थोडक्यात, देशाने अजूनही कोविडची भिषणता अनुभवलेली नाही. हे या अभ्यासाचे तात्पर्य आहे. एव्हानाच आपल्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण आला असून देशाची अर्थव्यवस्था कधी नव्हे त्या वाईट स्थितीतून मार्गक्रमित होत असता ‘गेले ते दिवस बरे’ असे म्हणायची वेळ आपल्यावर येणार आहे असे या अभ्यासाचे भाकीत आहे.

राज्यांवर संकट
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कोविड महामारीमुळे राज्यांच्या आर्थिक उत्पन्नांवरील खर्चाचा दर दुहेरी आकड्यांत असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. आर्थिक उत्पन्न, राज्यातील रोजीरोटी व्यतिरिक्त सर्व भारतीय राज्यांमधील मृत्यूंच्या प्रमाणात प्रचंड वाढ होऊन आर्थिक उद्रेकाचा भीषण परिणाम जाणवेल अशीच स्थिती आहे.

सर्व राज्यांच्या एकूण सकल उत्पन्न वाढीतील सरासरी १६ टक्के तोटा जाणवेल. राज्य उत्पन्नाच्या तोट्याची पातळी आणि राज्यांतील आरोग्य खर्च वाढीची संख्या पाहता सर्व राज्यांच्या एकूण उत्पन्नातील सहावा भाग प्रभावीत होईल. स्टेट बँकेच्या अभ्यासानुसार, देशातील कोविड बाधीत रोग्यांचा रोगमुक्ती दर ७५ टक्के झाल्यानंतर भारतातील कोरोनाबाधितांचे प्रमाण शिखर गाठेल व त्यानंतर बाधितांची संख्या कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. भारतातील कोविडबाधित बरे होण्याचा सध्याचा दर ७४ टक्क्यांच्या आसपास आहे. याचा अर्थ साथीचा शेवट जवळ आहे असा होत नसून सर्व राज्यांना थोडा दिलासा मिळेल, अशी आशा आहे.

वरील भाकित खरे असल्यास दिल्ली व तमिळनाडूसारख्या राज्यांनी कोविड बाधित संख्येचे शिखर गाठले आहेच म्हणता येईल, तर महाराष्ट्र, तेलंगण, बिहार व पश्‍चिम बंगाल सारख्या राज्यांना बाधितांचे शिखर गाठण्यात अजून अवधी असावा असा अंदाज बांधता येईल. स्टेट बँकेच्या अभ्यासानुसार, देशातील २७ पैकी २२ राज्यांनी अजून कोविड बाधितांचे शिखर गाठले नसून या महामारीची भिषणता अजून जाणवायची आहे.

कोविड महामारीने सर्व राज्यांच्या उत्पन्नांचे स्त्रोत उद्धस्त केले असून विद्यमान आर्थिक दशकात प्रथमच त्यांची आर्थिक अवस्था अत्यंत दारुण होईल, असे रिझर्व्ह बँकेने मान्य केल्यामुळे संकटांचे सावट अधिकच गडद झाले आहे.

रोजगारीचा ऱ्हास
पगारधारी नागरिकांचे कोविड महामारीच्या सावटामध्ये सर्वात जास्त नुकसान झाल्याचे जाणवते. या काळात गमावलेल्या नोकऱ्या परत मिळण्याचे कसलेच संकेत जाणवत नाहीत. कोविड काळात देशातील १९० लक्ष पगारधाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, असा अंदाज सीएमआयई या सल्लागार संस्थेने व्यक्त केला असून एका जुलै महिन्यातच देशातील ५० लक्ष पगारधाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या.

मार्च, एप्रिल व मे महिन्यापर्यंत देशातील एकूण ४०३ लक्ष लोकांनी आपला रोजगार गमावला व त्यापैकी १२० लक्ष व्यक्ती पगारधारी होत्या. याचाच अर्थ औपचारीक क्षेत्रातील पगारधारी व्यक्तींपेक्षा बिगर पगारी अनौपचारीक रोजगार ऱ्हासाचे प्रमाण देशात अधिकच प्रमाणात जाणवले. यातील मोठा वाटा हातावर पोट असणाऱ्या व छोटामोठा व्यवसाय करणाऱ्या व रोजंदारीवर अनौपचारीक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तिंचा समावेश होता. देशात अजूनही कोविड बाधितांनी सर्वोच्च पातळी गाठलेली नाही म्हटल्यावर बेरोजगारीच्या प्रमाणात अधिकच वाढ होईल, हे आलेच.

सर्वात वाईट बातमी म्हणजे महामारीचा परिणाम कमी शिक्षीत कामगारांमधील बहुसंख्य कामगार वांशिक अल्पसंख्याकांचे प्रतिनिधीत्व केलेल्या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात केंद्रीत होण्याची संभावना वाढली आहे. जानेवारी २०२० पासूनच्या काळात देशातील रोजगार गमावलेल्यांच्या प्रमाणात अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तींची संख्या २० टक्क्यांनी तर उच्च जातीतील व्यक्तींची संख्या ७ टक्क्यांनी घटली. या संदर्भातून येणाऱ्या काळात देशातील उपेक्षीत वर्गाची अधिक उपेक्षा होईल, अशी अपेक्षा जाणवते.

लघू उद्योगांची परवड
देशातील एकूण औद्योगिक उत्पादनात ७२ टक्के वाटा असणाऱ्या राज्यांमधील कोरोना बाधितांची संख्या देशातील एकूण बाधितांपैकी ६० टक्के वाटा भरतो. महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू ही तीन राज्ये देशातील औद्योगिक उत्पादनातील ३५ टक्के वाटा उचलतात. पण या तीन राज्यांत सध्या देशातील ४५ टक्के कोरोनाबाधीतांची संख्या भरली आहे. पुढील एक-दोन महिन्यांत महामारीचा दर या राज्यांत वाढल्यास औद्योगिक उत्पादनात अधिकच घट होईल.

आजपर्यंत देशभरातील ६३० लक्ष लघुउद्योगातील आस्थापनांपैकी ९० टक्के आस्थापनांनी पुन्हा उद्योग सुरू केला असून फक्त ४० टक्के आस्थापने आपल्या उत्पादनाची ५० टक्के क्षमता वापरू शकले आहेत. देशातील एकूण लघुउद्योग आस्थापनांपैकी अवघ्या अर्ध्या आस्थापनांनाच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचा फायदा झाल्याचे जाणवते.

देशातील जवळपास पन्नास टक्के लघुउद्योग क्षेत्रातील आस्थापने अजूनही औपचारीक बँकिंग क्षेत्राच्या परिघाच्या बाहेर असल्यामुळे त्यांना अजूनही केंद्रीय पॅकेजचा फायदा मिळू शकला नाही. यापैकी कित्येक आस्थापनांना दिवाळखोरी घोषित करावी लागली आहे. उरलेल्या व बँकिंग क्षेत्राकडून कर्ज घेतलेल्या आस्थापनांनी आपली देय फेडली नसल्यामुळे बँकिंग उद्योगाच्या थकीत कर्जांवर मोठा परिणाम झाला आहे. थकीत कर्जांचे प्रमाण सद्यस्थित ८.५ टक्यांवरुन १२.५ टक्क्यांपर्यंत पोचण्याची दाट शक्यता असून पुढील दोन-तीन महिन्यांत बँकांच्या आर्थिक परिस्थितीवर अधिकच ताण येईल.

कोविड महामारीची भीती, शेजारी-पाजारी कोविड बाधितांची जाणीव, बिकट आर्थिक परिस्थिती व पुढ्यात उभी टाकलेली अपेक्षीत भयाण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गणपती उत्सवाचे दीड दिवस तसे बरेच गेले असे म्हणावे लागेल.

देशभरातील घराघरांतून आपल्या आर्थिक व आरोग्य विषयक वृद्धीसाठी गणपतीकडे साकडे घालण्याबरोबरच या विश्‍वभर प्रसारीत होणाऱ्या महामारीचे विघ्न दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याकडे कळकळीचे मागणे सगळ्यांनी मागितले आहे.

येणाऱ्या दिवसांत श्री गणपतीने आम्हा सगळ्यांना आर्थिक, आरोग्य विषयक व मानसिक स्थैर्य देवो व यासाठी गणपती सगळ्यांना सुखकर होवो, हीच मागणी.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या