भाष्य: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे काय?

संजय घुग्रेटकर
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

राज्यात कोरोनाची स्थिती भयावह आहे. कोरोनाबाधितांचा तसेच त्यात बळी जाणाऱ्यांचाही आकडा वाढतच आहे. त्यात कुठेही संख्या घटत नाही. कोरोना गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांनाच धरतो, तो कोणालाच सोडत नाही.

अनेक मंत्री, मुख्यमंत्र्यांसह अभिनेते, अभिनेत्रींनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा काळात शाळा सुरू करणे, विद्यार्थ्यांना बोलावणे म्हणजे कोरोनाला ‘आ बैल, मुझे मार’ म्हणण्यासारखी स्थिती आहे. कारण शाळा, महाविद्यालयात कोणत्याही प्रकारची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. कुठेही निर्जंतुकीकरण केलेले नाही. तसे करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नाही. तेथे नेहमीच अस्वच्छता असते. दररोज विद्यार्थीवर्ग अस्वच्छतेत भर घालत असतो. सामाजिक अंतराचे नियम पाळणे, मास्क वापरणे हे गरजेचे असले तरीसुद्धा याकडे विद्यार्थी वर्गाचे दुर्लक्ष होणारच. शिवाय कोण कोठून येतोय, कोणाला कोरोना झालाय हे कसे तपासणार? शरीराचे तापमान तपासणे किंवा ऑक्सिमीटरने ऑक्सिजनची पातळी तपासणेही शैक्षणिक संस्थांतून शक्य होणार नाही. तेव्हा सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये.

इंटरनेट सुविधा काही ठिकाणी मिळत नाही, रेंज उपलब्ध नाही. या समस्या आहेत. तरीसुद्धा त्यावर काही शाळांतून त्यावर मार्ग काढला आहे. त्या विद्यार्थ्यांना पीडीएफ, वर्ड स्वरुपात नोटस् पोचविले जातात. विद्यार्थ्यांच्या समस्याही काही प्रमाणात भ्रमणध्वनीद्वारे सोडविल्या जातात. हे शिक्षण शंभर टक्के होत नाही, परंतु ५० ते ६० टक्के तरी अध्यापनाचे कार्य व्यवस्थित चालले आहे. एरवी शाळा सुरू असतानाही शंभर टक्के शिक्षण सर्व शाळातून होतच नाही. काही शाळांतून शिक्षक नाही किंवा अन्य अडचणींमुळे काही धडे भराभर शिकवले जातात किंवा शिकवायचे शिल्लकही राहातात. तेव्हा यंदा शंभर टक्के शिकवण्याची अपेक्षा कशासाठी करायची? मुळातच ३० टक्के अभ्यासक्रम कमी केलेला आहे. त्यात आणखी दहा-वीस टक्के कमी होणारच आहे. त्यावर सध्यातरी काही उपाय नाही. तेव्हा सरकारने म्हणजे शिक्षण खात्याने अति घाई करण्यापेक्षा सध्या चाललेल्या ऑनलाईन शिक्षणावर भर द्यावा. महिनाभरात शक्य असेल तेथे रेंज मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत.

टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बंद पडले. त्यामुळे आर्थिक अचडण निर्माण झाली. त्यामुळे काही पालकांना मुलांसाठी मोबाईल विकत घेणे शक्य होत नाही. अशा मुलांना मोबाईल देण्याचा सरकारने प्रयत्न  करावा. सरकारने घोषणा केल्याप्रमाणे, आश्वासन दिल्याप्रमाणे ते आश्वासन पाळावे. आश्वासनाचे पालन केले तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षक घेता येईल. दिवाळीपर्यंत परिस्थितीत काय बदल होतो, ते पाहावे. त्यानंतर निर्णय घेता येईल. शाळा, महाविद्यालयात जोपर्यंत सुरक्षिततेची हमी मिळत नाही, तोपर्यंत कोणीही शाळेत येणार नाही. पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याची इच्छा नाही. मागील पाच महिन्यापासून कोरोनापासून बचाव केला आणि मुलगा शाळेत गेल्याने कोरोना घरी आला. असा प्रकार घडू नये, यासाठी अनेक जाणकार पालक मुलांना शाळेत पाठविण्याच्या विरोधात आहेत. जो काही असेल तो घरीच अभ्यास करावा, यासाठी आवश्यक साहित्यही पाल्यांना दिले जात आहे. तेव्हा सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घ्यायला हवा.

राज्यात वाढणाऱ्या रूग्णांमुळे इस्पितळातील खाटा कमी पडत आहेत. काहींना जमिनीवर झोपविण्यात आले. इतर सोयीही उपलब्ध नाहीत, हाल होतात, अशा तक्रारीही वाढत आहेत. अशा काळात रूग्णांची संख्या स्वतःहून वाढविणे योग्य नाही. सरकारने डोळसपणे याचा विचार करावी. शाळांचे अध्ययन, अध्यापनाचे वेळापत्रक लांबले, परीक्षा लांबल्या तरी काहीही बिघडणार नाही. पण कोरोनाचे रूग्ण वाढले तर परिस्थिती बिकट होईल. ग्रीन झोनचे स्वप्न सत्यात उतरणार नाही. उलट ‘डार्क रेड झोन’मध्येच राहावे लागले. त्यात किती बळी जातील, हे सांगणेही शक्य होणार नाही. आंतरराज्य सीमा खुल्या झाल्याने राज्यात ये-जा करणाऱ्याची संख्या वाढली आहे. पर्यटकही येऊ लागले असून त्यांच्यात कुठेच शिस्त दिसत नाही. त्यांनी सामाजिक अंतराचा नियमही पायदळी तुडवला असून त्यांच्याकडे मास्कही नाही. यात देशी-विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या प्रकाराकडे पोलिसांचे लक्ष नाही, ते फक्त रस्त्यावरून थांबून रिकव्हरी क्लार्कप्रमाणे पावत्या फाडत आहेत. या प्रकारामुळेसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

राज्यात पर्यटकांबरोबरच मजुरांची संख्या वाढत आहे. बसेस सुरू झाल्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्रातून अनेक कामाधंद्यानिमित्त येत आहेत. यातील अनेकजण रोज ये-जा करतात. गोव्यासारखीच स्थिती शेजारील सिंधुदुर्ग, कारवार, बेळगावात आहे. तेथे मास्क, सामाजिक अंतर पाळले जात नाही. त्यामुळे येथून येणाऱ्यांकडूनही राज्यात कोरोनाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शिवाय राज्यातील बसेसमधून ते प्रवास करतात. त्याच बसमधून विद्यार्थी, शिक्षकही प्रवास करतात. त्यामुळे यातील एक विद्यार्थी किंवा एका शिक्षकाला जरी कोरोनाची लागण झाली तर शाळेतील अन्य विद्यार्थी शिक्षकांनाही लागण होणे शक्य आहे. विद्यार्थ्यांना लागण होणे, ही खूपच भवायवह स्थिती राहाणार आहे. उदाहरण द्यायचे तर... एकदा नवोदय विद्यालयात कांजणी (चिकण फॉक्स), डोळ्यांची साथ आली होती. तेव्हा तीन-चार वर्गाच्या सर्वच विद्यार्थ्यांना उपचारासाठी घरी पाठविण्यात आले होते. त्यापेक्षा कोरोना महाभयानक आहे. त्याची लागण खूपच लवकर होते. तेव्हा डोळसपणे विचार करून सरकारने शाळा सुरू करायचा निर्णय घ्यावा. आंधळेपणाने स्थानिक परिस्थिती लक्षात न घेता शाळा सुरू केल्यास सरकारला निश्चितपणे ‘महागात’ पडणार असून भयावह संकटाला सामोरे जावे लागेल!

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या