‘अपू’च्या गोष्टीचा शेवट!

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

सत्यजित राय यांच्यासोबत पुढे तब्बल चौदा चित्रपट केले. राय यांच्याच प्रतिभेतून साकारलेला बुद्धिमान गुप्तचर प्रदोष मित्तर ऊर्फ फेलुदा पडद्यावर साकारण्याचा मान सौमित्रदांनाच मिळाला;

खादा समाज सामूहिकरीत्या कशासाठी तरी अश्रू ढाळतो, तेव्हा त्या समाजाची सांस्कृतिक पातळी ओळखू येते, असे एक पुराणे विलायती भाषेतले वचन आहे. संस्कृतीची लांबी-रुंदी नोंदवण्याची ही आसवांची मोजपट्टी काहीशी अघोरीच म्हणायला हवी; परंतु ख्यातनाम अभिनेते, कवी, चित्रकार आणि ‘विचारशील बंडखोर’ असलेले सौमित्र चटर्जी यांच्या निधनानंतर, गेल्या आठवड्याच्या अखेरीला सारे बंगाली कलाजगत दु:खात बुडाले, त्यावरून या वचनात दडलेले तथ्य ध्यानी यावे.

सध्या त्या प्रांतात सुरू असलेली राजकीय धुळवड, कोरोनाने केलेली दैना वगैरे सारे काही विसरून बंगाली रसिकांनी अश्रू ढाळले ते त्यांच्या लाडक्‍या ‘अपू’साठी. ‘अरण्येर दिनरात्री’मधल्या आशिमसाठी. मृणाल सेन यांच्या ‘आकाश कुसुम’मधल्या तोतयासाठी. तपन सिन्हा यांच्या ‘जिंदेर बंदी’मधल्या घोडेस्वार खलनायकासाठी. अशा त्यांच्या कितीतरी व्यक्तिरेखा आजही बंगाली रसिकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. जगन्मान्य अभिनेता, कवी, लेखक, चित्रकार अशा अनेक अपूर्व गुणांनी मंडित असलेले सौमित्र चटर्जी हे बंगाली साहित्यकलाविश्वाचा एक चेहरा बनून गेले होते. आपली मते फट्टदिशी व्यक्त करून मोकळा होणारा हा विचारशील ज्येष्ठ कलावंत फक्त बंगाली कलाविश्वाशीच बांधील नव्हता. वंचित, पीडितांच्या वेदनेचा भाष्यकारदेखील होता. राजकीय मखलाशीच्या खेळाचा भेदक टीकाकार होता. निव्वळ लेखणीने नव्हे, तर कुंचल्यांच्या फटकाऱ्यांनीही आपल्या मनातील स्पंदने गडदपणे मांडणारा चित्रकार होता.
साठोत्तरी कालखंडात भारतातील साहित्य आणि कलाविश्वात प्रचंड उलथापालथ होऊ लागली. जाणिवांचे नवे वारे वाहू लागले.

केवळ भद्रसमाजालाच पचनी पडेल, असे मध्यमवर्गीय साहित्य काहीसे मागे पडले आणि जणू सारे कलाविश्व वास्तवाला भिडण्यासाठी धडपडू लागले होते. त्याच काळात ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक आणि आघाडीचे कथालेखक सत्यजित राय यांच्या प्रतिभेने भराऱ्या मारायला सुरुवात केली. रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली साहित्य व कलेला जागतिक मंचावर नेऊन सोडले, तर सत्यजित राय यांच्यासारख्यांनी त्याला नवे पंख दिले. त्या पंखांचा भार पेलणारे अभिनेते म्हणजे सौमित्र चटर्जी होत. सत्यजित राय यांनी १९५५ च्या आसपास ‘पथेर पांचाली’ रसिकांना पेश केला, आणि सारे कलाजगत जणू स्तंभित झाले. पुढे आणखी दोनेक वर्षांत त्याच्या पुढला भाग ‘अपराजितो’ आला. आणि नंतर १९५९ मध्ये ‘अपूर संसार’ या अखेरच्या, तिसऱ्या पुष्पाने या त्रिधारेची सांगता झाली. ही त्रिधारा अनेक कारणांनी भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मानाचे पान धरून बसली आहे. या चित्रपट त्रिधारेने भारतीय चित्रपटांना थेट सातासमुद्रापल्याड नेले. या तीन कलाकृतींपैकी ‘अपूर संसार’ या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा म्हणजेच अपू ऊर्फ अपूर्वकुमार रॉय! ती सौमित्र चटर्जी यांनी साकारली होती. आता ‘अपू’ ही हाडामांसाची व्यक्ती नव्हे. बंगालातल्या कुग्रामात जन्मून बनारस-कोलकात्यात स्थिरावण्यासाठी धडपडणाऱ्या युवकाची ही गोष्ट. ती राय यांनी पडद्यावर आणली. सौमित्र यांनी यातील ‘अपू’ असा काही साकारला की तीच त्यांची ओळख बनली. याच अपूसाठी गेल्या आठवड्यात बंगाली कलारसिक इतके हळहळले.

पिढ्यान्‌ पिढ्यांना रिझवणारा, दमदार आणि लाडका कलावंत हरपला की दु:ख हे होणारच. कारण असे कलावंत त्या त्या समाजाचा स्वाभिमानबिंदू बनून गेलेले असतात. त्या त्या संस्कृतीचा ठेवा बनून गेलेले असतात. तब्बल सहा दशके बंगाली रसिकांना तृप्त करणाऱ्या या कलावंताचे देहावसान फारसे अनपेक्षितही म्हणता येणार नाही. कोरोनाने केलेला आघात अखेरचा ठरला; तरीही बंगालचा रसिकवर्ग मनापासून खंतावला, हे खरे. कारण बंगाली कलाप्रांताच्या पुनरुत्थानाच्या काळाचा सौमित्रदा हे महत्त्वाचे आणि कदाचित अखेरचे शिलेदार होते. आताच्या पिढीला त्याचा महिमा आवर्जून सांगायला हवा, कारण अभावातही या थोर कलावंतांनी जे काही निर्माण करून ठेवले आहे, त्याच्याच जोरावर ‘पुढीलां’ची पिढी आगेकूच करते आहे.

त्याची नोंद घेणे इष्टच. सत्यजित राय यांच्यासोबत पुढे तब्बल चौदा चित्रपट केले. राय यांच्याच प्रतिभेतून साकारलेला बुद्धिमान गुप्तचर प्रदोष मित्तर ऊर्फ फेलुदा पडद्यावर साकारण्याचा मान सौमित्रदांनाच मिळाला; पण सत्यजित राय यांनी पैलू पाडलेल्या या अभिनेत्याने केवळ तेवढ्याच पुंजीवर समाधानी न राहता तपन सिन्हा, मृणाल सेन आदी तालेवार दिग्दर्शकांकडेही अप्रतिम भूमिका वठवून प्रतिभेचा झरा मूळचाचि खरा असल्याचे सिद्ध केले. सौमित्रदांनी बंगाली रंगभूमीवरही भरपूर काम करून ठेवले आहे. विशेषत: इब्सेनच्या नाटकांना बंगाली साज चढवून त्यांनी आवर्जून रसिकांसमोर आणली. सौमित्र चटर्जींना देश-विदेशातील अनेक मानसन्मान मिळाले.

किंबहुना भारत सरकारने त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, दादासाहेब फाळके सन्मान किंवा पद्मभूषण देण्याआधी फ्रान्स सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान देऊन गौरवित केले होते. ‘वय झालंय, आता असले पुरस्कार निरर्थक वाटतात’, असे ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात फट्टदिशी बोलून गेले, तेही त्यांच्या स्वभावाला धरूनच झाले. सौमित्र चटर्जींच्या जाण्याने भूतकाळातील जडणघडणीच्या काळाचा शेवटचा दुवा निखळला. कोण्या एका ‘अपू’ची गोष्ट खऱ्या अर्थाने संपली.

संबंधित बातम्या