संयमाची कसोटी, सरत्या वर्षाने दिले अनेक धडे

दैनिक गोमन्तक
बुधवार, 30 डिसेंबर 2020

वर्षाच्या अखेरीस आपल्यासाठी एक सुखद वर्तमान आले आहे. या सरत्या वर्षाने आपल्याला अनेक धडे दिले आणि आपली जीवनशैली आरपार बदलून टाकली; पण ज्या ‘कोरोना’ने आपल्या दिनक्रमावर गेल्या दहा-अकरा महिन्यांत मोठे आघात केले,

वर्षाच्या अखेरीस आपल्यासाठी एक सुखद वर्तमान आले आहे. या सरत्या वर्षाने आपल्याला अनेक धडे दिले आणि आपली जीवनशैली आरपार बदलून टाकली; पण ज्या ‘कोरोना’ने आपल्या दिनक्रमावर गेल्या दहा-अकरा महिन्यांत मोठे आघात केले, तोच कोरोना आता काहीशा माघारीच्या पवित्र्यात असल्याचे वृत्त दिलासादायक आहे. मात्र, याच बातमीला एक नको असलेली किनारही आहे आणि ती आहे कोविड-१९ विषाणूच्या नव्या अवताराची. त्यामुळेच आता पुनश्‍च एकवार आपल्या संयमाची कसोटी लागणार आहे. गेल्या मार्चमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या जीवघेण्या विषाणूच्या भयावह आक्रमणामुळे देशभरात ठाणबंदीचा अघटित निर्णय घेणे आपल्याला भाग पाडले होते. आता हे वर्ष संपायला अवघे काही तास उरले असताना देशाच्या सर्वच्या सर्व राज्यांत या विषाणूबाधितांच्या आठवडेभराच्या सरासरीने नीचांक गाठला आहे.

एवढेच नव्हे, तर सोमवारी जी काही नव्या बाधितांची नोंद झाली, ती गेल्या १८८ दिवसांतील सर्वांत कमी आहे. अर्थात, ही जी आकडेवारी आहे, त्यास या विषाणूने भारतीय अवकाशात प्रवेश केल्यानंतर आपण योजलेले कठोर उपाय आणि त्याचबरोबर समाजाच्या सर्व स्तरातील जनतेने पाळलेल्या संयमाचेच फलित आहे. गणेशोत्सव असो की दसरा आणि रमजान ईद असो की वांद्र्याच्या मतमाऊलीची जत्रा; या वेळी आपण होता होईल तेवढ्या कसोशीने मास्क आणि शारीरिक दुरस्थता या नियमांचे पालन केले होते. तरीही, गणेशोत्सव तसेच दिवाळीत दाखवलेल्या अनाठायी उत्साहामुळे काही प्रमाणात तरी बाधितांची संख्या वाढीस लागलीच होती. त्यामुळेच, आत्ताची ही सुखद आकडेवारी आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढवणारी आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असताना केला जाणारा जल्लोष आणि नववर्षाची देवदर्शनाने करावयाची सुरुवात, अशा प्रथाही अलीकडच्या काळात तयार झाल्या आहेत; पण यंदा आपल्याला वास्तवाचे कठोर भान ठेवून घराघरांतूनच त्या साजऱ्या करावयाच्या आहेत. गेले जवळपास दहा महिने आपण अनेक पथ्ये पाळली. कोविडच्या घटत्या आकडेवारीमुळे आता आपण कोविडमुक्त झालो, असा समज करून घेणे धोक्‍याचे आहे. त्यामुळे आणखी काही काळ संयम पाळायला हवा. लोकांनी स्वयंस्फूर्तीने पाळलेले नियमच चांगला परिणाम घडवितात. 

सरकारने सरसकट बंदीचा बडगा उगारू नये, हे तर खरेच; पण लोकांनी स्वयंशिस्त पाळली तर ती वेळ येत नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री जगभरात होणाऱ्या पार्ट्या तसेच सहभोजने काय पुन्हा कधीही होऊ शकतात आणि प्रियजनांना द्यावीशी वाटणारी ‘जादू की झप्पी’ही दोन आठवडे उशिराने दिली तरी बिघडत नाही. याबद्दल लगेच प्रेम आटले का, असा सवाल यंदा तरी कोणी विचारू नये! त्याचबरोबर प्रार्थनास्थळे खुली केल्यापासून तेथील गर्दी ही साऱ्या निर्बंधांना पायदळी तुडवत वाढते आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तिरुपती बालाजी असो की दगडूशेठ हलवाईचा श्रीगणपती असो; शिर्डीचे साईबाबा असोत की वैष्णोदेवी असो; तेथे भाविकांची गर्दी असतेच. मात्र, यंदा ‘शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी’ या भावनेने देवाची प्रार्थना ही मनोमन करावयाची आहे. सोमवारी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी १३ हजारांहून अधिक भाविकांची मांदियाळी जमा झाली होती आणि कालच्या मंगळवारी दत्तजयंतीच्या निमित्ताने शिर्डीचे साईमंदिर भक्तगणांनी फुलून गेले होते. हे प्रकार या वर्षी तरी टाळायला हवेत आणि साईंच्याच ‘श्रद्धा और सबुरी’ मंत्राचा जप करायला हवा, तरच आपण विषाणू नवा असो की जुना, त्याला ठामपणाने तोंड देऊ शकू.

भारतात गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या झपाट्याने घटली आणि त्यातही बाजी मारली ती पश्‍चिम बंगालने. खरे तर तेथे सध्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर तापतो आहे. सर्वपक्षीय मेळावे, प्रचार फेऱ्या रंगू लागल्या आहेत. तरीही, त्या राज्यातील घट लक्षणीय आहे. त्यापाठोपाठ दिल्ली आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. नववर्षात आपले राज्य या क्रमवारीत पहिले स्थान पटकावील, या जिद्दीने संयमाचे दर्शन घडवायला हवे. अन्यथा, ब्रिटन तसेच आफ्रिकेतून येणाऱ्या विषाणूचे नवे रूप पुन्हा आपल्याला काही महिने घरी बसावयास लावेल. हा धोका मोठा आहे; कारण या विषाणूचे नवे रूपडे आधीच्यापेक्षा अधिक भयावह असल्याचे तज्ज्ञ सांगताहेत. आताच कोठे आठ-दहा महिन्यांच्या सुस्तीनंतर शेअर बाजार एकवार उसळी घेतो आहे. विविध कंपन्यांनीही २०१९ या वर्षाच्या तुलनेत ‘आयपीओ’ विक्रीत आघाडी घेतली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा गती घेण्याच्या मार्गावर असताना, आपण जर केवळ नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली झुंबड उडवून दिली, तर तो जल्लोष नसून झुंडशाही ठरेल आणि त्यातूनच आपण नव्या सावटाला आमंत्रण देऊ. या पार्श्वभूमीवर तुम्ही-आम्ही सर्वांनीच आज निर्णय घ्यायचा आहे आणि तो ‘आपण सारे मिळून!’ या पद्धतीने घ्यायचा आहे; कारण या विषाणूवर मात करण्याचा तोच एकमेव उपाय आहे.

संबंधित बातम्या