चित्रकृती अनुभवण्याचे आनंदक्षण

गायत्री देशपांडे
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

आज भारतीय कलेला विश्‍वात चांगली मान्यता मिळाली आहे. भारतीय समकालीन दृश्‍यकलेलाही विश्‍वात चांगले स्थान प्राप्त झाले आहे. पण आम्हा चित्रकारांना सोडून आपल्यापैकी किती जणांना याची माहिती किंवा कल्पना असेल? अगदी मोजकी नावं सोडली तर भारतीय चित्रकार किंवा शिल्पकारांची फारशी नावं आपल्याला माहीत नसतात.

आज भारतीय कलेला विश्‍वात चांगली मान्यता मिळाली आहे. भारतीय समकालीन दृश्‍यकलेलाही विश्‍वात चांगले स्थान प्राप्त झाले आहे. पण आम्हा चित्रकारांना सोडून आपल्यापैकी किती जणांना याची माहिती किंवा कल्पना असेल? अगदी मोजकी नावं सोडली तर भारतीय चित्रकार किंवा शिल्पकारांची फारशी नावं आपल्याला माहीत नसतात. त्यात मग आपण राजा रविवर्मा, अमृता शेरगिल, हळदणकर, एम. एफ. हुसेन, गायतोंडे ही नावं ऐकून असतो. भारतात अनेक उत्तम कलाकार होऊन गेले आणि आहेतही. पटकन गुगल केलं तर सगळी माहिती काही क्षणात आपल्याला मिळेल. पण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपण प्रत्यक्ष या कलाकृतीचा अनुभव घेतो.

कधीकधी आपण आपल्याभोवती असलेल्या कलाकृतीही बघत नाही किंवा बघितलंच तर त्याचे निरीक्षण करत नाही किंवा त्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही. अशी कित्येक थोर व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, जी उत्तम चित्रकारही होती, हे आपल्याला कधीकधी माहितच नसतं. उदा. रवींद्रनाथ टागोर हे असेच एक व्यक्तिमत्त्व होऊन गेले.

आजही अनेक समकालीन चित्रकार व शिल्पकार त्यांच्या क्षेत्रात आणि माध्यमात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवत आहेत. मग त्यात ज्येष्ठ आणि नवोदित अशा सर्व कलाकारांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार काळानुरूप विविध शैली व माध्यमात काम करत असतात. त्यांचे काम आपल्याला विविध प्रदर्शनात किंवा बिनाले, फेस्टिव्हल अशा कार्यक्रमांमध्ये बघायला मिळते. अशा ठिकाणी जाऊन कलाकृती बघण्याची संधी चुकवू नये, असे मला वाटते. अगदी घरातील लहान मुलांही घेऊन जायला हवे. मी कलाशिक्षिका असताना लहान मुलांकडून खूप काही शिकले. त्यांची मुक्त अभिव्यक्ती, त्यांच्यातली ऊर्जा, कुतूहल हे सर्व अनुभवण्यात एक वेगळेच सुख आहे.

आम्ही एक उपक्रम राबविला होता शाळेत. ज्यात मुलांनी विविध कलादालनांना भेट द्यावी, प्रदर्शन बघावे आणि कलाकारांशी संवाद साधावा हा हेतू होता. कलाकारांशी बोलताना मुलांनी बरीच माहिती मिळविली. त्या कलाकारांचा प्रवास, त्यांची कामाची शैली, माध्यम, त्यांनी निवडलेले विषय, त्यांचे भावविश्‍व हे सर्व जाणून घेताना मुलांमध्ये उत्साह आणि कुतूहल साहजिकच वाढले. मुलांना एक गाइडलाइन दिली गेली, ज्याच्या मदतीने त्यांना या उपक्रमातून शिकायला तर मिळालेच, पण त्याचा आनंदही घेता आला. मी तर म्हणते लहान मुलांना, अगदी पहिली दुसरीपासून जरी चित्र प्रदर्शनांना नेले तर त्यांच्या व्यक्तिमत्त्तवाला आणि विचारांना आपोआपच एक प्रगल्भता येईल, तेही नकळत. तिथे त्यांना मुक्तपणे अनुभव घेऊ द्यावा. कुठलेही शिक्षण नको. 

गंमत म्हणजे लहान मुलं जितकी सहजपणे चित्रांचा आनंद घेऊ शकतात, तितका आपण त्याला उगीच खूप गहन विचार करून गमावून बसतो. त्यांच्यासाठी चित्रं हे चित्रं असतं. मग त्यात चांगलं- वाईट, वास्तववादी- अवास्तववादी असा फरक नसतो. कारण लहान मुलं आपल्या स्वाभाविक प्रेरणांना महत्त्व देतात. या उपक्रमात अनेक कलाकारांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य लोक अभिव्यक्ती जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहेत, हा अनुभव त्यांना सुखावणारा 
होता.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या