सावधान! गोव्यात कोरोना वाढतोय

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरू लागली आहे. सरकारने शिमगोत्सव मिरवणुका रद्द केल्या, पण पर्यटक बिनधास्तपणे गर्दी करत आहेत, इतर कार्यक्रमही सुरूच आहेत, त्यावर निर्बंध घालायला हवेत.

गोवा कोविड लाटेपासून सुरक्षित राहणार असल्याची शक्यता आता कमी आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या ज्या गतीने वाढत आहे ते पाहता सर्वांनीच आता काळजी घ्यायला हवी. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हेही कोरोनाबाधित झाले आहेत. यामुळे कोरोनाचा विषय आता गंभीर होत आहे, असे वाटत आहे. एका बाजूने कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूने काही भागात रुग्णसंख्या ही कमालीची वाढू लागल्याने चिंता अधिकच वाढली आहे. राज्य सरकारने गेले काही महिने सगळ्यांनाच  मोकळीक दिली.

यावरून जणू कोरोना संपला असेच वाटत होते. कोणीही सामाजिक अंतर पाळत नव्हते, मास्क न वापरता फिरणारेही काही कमी नव्हते. उत्सव, लग्न समारंभ, वाढदिवस असे कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पडत होते. संगीत रजनी तर अफाट गर्दीत सुरू असायच्या, आताही आहेत. पण त्यावर नियंत्रण नाही. आधी इफ्फी आणि नंतर कार्निव्हलला मोठी गर्दी झाली. कोरोनामुळे सगळे नियम पाळून कार्यक्रम साजरे केले जाणार असे सांगितले जात असतानाही सामाजिक अंतराचा फज्जा उडाला होता. तरीही सरकार मात्र बिनधास्त होते. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, अनेकदा चिंता व्यक्त करीत होते, परंतु त्याकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेच नाही. दिवसाला शंभराच्यावर नवे कोरोना संसर्गित रुग्ण गेले काही दिवस सापडत आहेत.

गोवा विधानसभेतून: ‘भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी’ 

शुक्रवारी 2123 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 113 कोरोना संसर्गित रुग्ण सापडले. आतापर्यंत राज्यात 824 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. १२७९ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गित व्यक्ती बरे होण्याची राज्यातील टक्केवारी 96.33 टक्के एवढी झालेली आहे. ही टक्केवारी चांगली असली तरी गाफील राहून अजिबात चालणार नाही. रुग्ण हजारच्या वर पोचले आणि मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने सरकार खडबडून जागे झाले. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिमगोत्सव मिरवणुकांवर बंदी आणली गेली. पण इतर कार्यक्रमांचे काय? महिनाभर नगरपालिका, महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू होता. कोणत्याही राजकीय पक्षाने कोरोनाचा विचार केला नाही. लोकांमध्ये सगळेच मिसळले.

दिवंगत मनोहर पर्रिकरांनी दाखवलेला विश्वास, त्यांनी दिलेले आशीर्वाद आणि त्यांचे संस्कार यामुळेच हे शक्य झाल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले

निवडणुकीदिवशीही मतदान केंद्रावर गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. विजेत्या उमेदवारांच्या मिरवणुकाही खुलेआम गर्दीत पार पडल्या. परिणामी आता कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात सापडू लागले. पर्यटनासाठी गोव्याची दारे सताड उघडी ठेवली गेली. पर्यटकांवर कोणाचेच नियंत्रण नाही. कसिनोंही खुले. तिथेही कोरोना शिरला. कसिनोंवर येणारे आणि पर्यटक यामुळे कोरोना अधिक फोफावला, असे आमजनतेला वाटते. हे एक कारण आहेच, पण आपण किती दक्षता बाळगली, हेही लोकांनी पाहायला हवे. कोरोना आता पसार झाला, या बेताने सगळेच सारे काही विसरले होते.

आरोग्य यंत्रणेवर गेल्या वर्षभरात किती ताण आला, किती जणांचे प्राण गेले, कितीजणांनी कोरोनावर मात केली, याचा सगळ्यांनाच विसर पडला. आपण सर्व काही लवकर विसरतो, या सवयीप्रमाणेच हे सारे झाले. परिणामी आता काळजी करण्याची वेळ आली. कवळेत एकदम 18 विद्यार्थिनी कोरोनाबाधीत सापडल्या आणि नंतर पर्वरीत, त्यामुळे तिथे मायक्रो कन्टेंन्मेट झोन जाहीर केले गेले. यावरून वास्कोत कोरोना कसा शिरला होता याची आठवण अनेकांना झाल्याशिवाय राहिली नाही. त्यानंतर मग कोरोनाने सारा गोवा व्यापला होता. या गोष्टीला काही वर्षही उलटले नाही, तरीही लोक, सरकारी यंत्रणा बेफिकीरीने वागते, हे दुर्दैव आहे.

महाराष्ट्र. कर्नाटक ही आपल्या शेजारील राज्ये गोव्यातील लोकांना त्यांच्या राज्यात प्रवेश करण्यास निर्बंध लादतात, तपासणी अहवाल अनिवार्य करतात आणि आपण मात्र सगळ्याच लोकांना पायघड्या घालतो. कोणावरही बंधने लादत नाही. पर्यटकांचा पुळका केवळ महसूल मिळावा म्हणून आहे काय? गोमंतकीयांच्या लाखमोलाच्या जिवापेक्षा सरकारला पैसा महत्त्वाचा वाटावा, हे आश्‍चर्य. आपल्या लोकांचे जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने खरेतर प्रयत्न करायला हवेत. लोकांनी मागणी करूनही दुर्लक्ष केले गेले. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने त्वरित पावले उचलून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यक ते सर्व उपाय योजायला हवेत. या विषयावर कोणीही राजकारण न करता लोकांची सुरक्षा हा विषयच प्राधान्यक्रमाने घ्यायला हवा. तसे झाले तर राज्य सुरक्षित राहील. अन्यथा पुन्हा एकदा भयानक परिणामांना सामोरे जावे लागेल. लोकांनी आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करायला हवे. स्वत:च्या घरापासून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसे झाले तरच घराघरांत शिरण्यापासून कोरोनाला रोखले जाईल.

संबंधित बातम्या