आत्मपरीक्षण हवे: अन्यथा पत्ता कट झालाच म्हणून समजा

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

गेले काही महिने कोविडच्या सावटामुळे लोक त्रस्त आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांना विरोध होत असल्याने भाजप सरकारची विश्‍वासार्हता कमी झाली,

गेले काही महिने कोविडच्या सावटामुळे लोक त्रस्त आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांना विरोध होत असल्याने भाजप सरकारची विश्‍वासार्हता कमी झाली, असा गैरसमज विरोधी पक्षांनी करून घेतला आहे. मात्र शनिवारी पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपवरच विश्‍वास दाखवला आहे. उत्तरेत १९ व दक्षिणेत १४ जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये भाजप आरामात सत्ता स्थापन करेल. या निवडणुकीत विरोधी पक्षांचा धुव्वा उडाला आहे. राज्यात पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाला ग्रामीण भागातील जनतेने झिडकारले आहे. जि. पं.च्या सत्ता स्थापनेत आपण महत्त्वाची भूमिका बजावू, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या मगो पक्षालाही मतदारांनी फोंड्यापुरतेच मर्यादित ठेवले आहे. राष्ट्रवादी पक्षालाही एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. गोव्यात जम बसवू पाहणाऱ्या आम आदमी पक्षाला मात्र या निवडणुकीत एक जागा मिळाल्याने त्या पक्षाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षातील काही मंत्री, आमदारांना जोर का झटका बसला आहे. त्यांचे समर्थक पराभूत झाल्याने किंवा अगदीच कमी फरकाने जिंकल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर काय वाढून ठेवले असेल, याचा त्यांनी नीट विचार करून आतापासून कार्यरत राहायला हवे. अन्यथा मतदारांनी दिलेला इशारा हा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतो. पण पुन्हा उमेदवारी मिळेल काय, यावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण करू शकतो.

जि. पं. निवडणुकीत आपल्याच पक्षाची सत्ता येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व्यक्त करीत होते. त्यांना अपेक्षित निकाल लागला असला तरी काही हक्काच्या जागा त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. काँग्रेसने तळागाळात काम करून लोकांचा विश्‍वास संपादन करायला हवा, तरच भविष्यात कुठेतरी निभाव लागेल, हे या निकालाने स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये असलेली दुफळी आणि हेवेदावे पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीवर परिणाम करतात. या उलट जोमाने कामाला लागलेल्या ‘आप’सारख्या पक्षाला भले एक जागा मिळाली असली तरी त्यांच्या उमेदवारांनी मिळवलेली मते ही ‘आप’ला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरणा देणारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही स्वतंत्रपणे निवडणूक झेपणारी नाही, हे एव्हाना समजायला हवे. मगो पक्ष गेल्या काही निवडणुकांमध्ये हातचे राखत काही प्रयोग करीत आहे. परंतु पक्षनेतृत्व जोवर आक्रमकपणे पक्ष वाढीसाठी पुढे पावले टाकत नाही, तोवर या पक्षाचे यश हे मर्यादित राहणार आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला अशा यशातच समाधान मानायचे असेल तर मग पक्षाची वाढ आणखी खुंटणार आहे, हे ठरलेलेच आहे.

भाजप सरकारविरोधात कोळसा विरोधी आंदोलन, रेल्वेमार्ग दुपदरीकरण, मोलेतील वीज प्रकल्प अशी आंदोलने सुरू होती. लोकांची गर्दीही जमत होती. परंतु त्याचा भाजपच्या मतांवर काहीच परिणाम होणार नाही, याची दक्षता भाजपने घेतली. निवडणुकीच्या प्रचारात सर्व यंत्रणा जुंपली आणि त्या कष्टाचे फळ भाजपला मिळाले. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बऱ्याच आमदारांना आपापल्या समर्थकांना निवडून आणता आले. पण काही आमदारांना अपयश आले. पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी अशा आयारामांच्या उमेदवारांना मनापासून साथ दिली नाही. काही माजी आमदार, माजी मंत्र्यांनीही निवडणुकीपासून चार हात लांब राहणे पसंत केले आणि आपले तटस्थ राहणे पक्षांतर्गत हितशत्रूंना कसे महागात पडू शकते, हे पाहिले. त्याचा परिणाम काही जागा गमावण्यात झाला. निवडणुकीत जे यश मिळाले ते अस्सल भाजपचे किती आणि भाजपमध्ये आलेल्या आमदारांना मिळालेले किती, याचा हिशेब करताना काहीजण आकडेमोड करीत आहेत. परंतु त्याला काही अर्थ नाही. भाजपबरोबर सध्या जे कोणी आहेत आणि असतील ते भाजपचे असे जमेस धरले जाते. आज तरी भाजपला त्यावर विचार करण्याची आवश्‍यकता नाही. जिल्हा पंचायतींमध्ये मिळालेले यश पाहता सरकारच्या कामगिरीवर लोक खुश आहेत,

समाधानी आहेत, असे भाजप म्हणू शकेल. मात्र या यशाला अनेक कंगोरे आहेत. विस्कटलेले विरोधक आणि मजबूत संघटना असलेला भाजप अशी ही लढत होती. ही लढत भाजपने गांभीर्याने घेत घराघरांत उमेदवाराचा प्रचार करण्यावर भर दिला. केवळ आरोप करून आणि सरकारचे वाभाडे काढून मते मिळवता येत नाहीत, हे विरोधक लक्षातच घेत नाहीत. शिवाय भाजप विरोधात सगळे, असे चित्र असूनही भाजप ही शर्यत जिंकू शकला, यावरून विरोधकांना आगामी विधानसभेतही भाजपला रोखण्यासाठी फारच अंगमेहनत घ्यावी लागणार आहे. केवळ लोक नाराज आहेत, असे म्हणत आपण सत्तेत येऊ, असा विाचर करणे चुकीचे आहे. लोकांसमोर कोणता पर्याय ठेवणार आणि तो कितपत विश्‍वासार्ह असणार, यावर गोमंतकीय मतदार सांगोपांग विचार करतात आणि मतदान करतात. भाजपला पर्याय ठरू शकणारा एकही पक्ष समोर दिसला नाही तर भाजपच बरा, असे म्हणून पुन्हा भाजपचाच फायदा होणार आहे. जिल्हा पंचायत निवडणूक निकालाने भाजपला आनंद झाला आहे. गेले काही महिने भाजप सरकारला धारेवर धरत विरोधकांनी देशभर गोव्यात बदलाचे वारे वाहते, असा आभास निर्माण केला होता. पण मतदारांनी विरोधकांचा हा अतिआत्मविश्‍वासाचा फुगा फोडला आहे. नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यातही वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपला या निकालाने अधिकचा बुस्टर डोस दिला आहे. विधानसभा निवडणुकांकडे वाटचाल करताना असे सुखद अनुभव हे पक्षाला आणि कार्यकर्त्यांना अधिक प्रोत्साहित करणार आहेत. विरोधी पक्षांनी आपण लोकांच्या मनात कसे पोचू हे प्रथम पाहायला हवे. केवळ वारेमाप प्रसिध्दी मिळवून लोकप्रिय होता येत नाही. निवडणुकीत लोकांचा कौल महत्त्वाचा असतो. नंतर मग चांगले प्रशासन देऊन लोकांचा विश्‍वास प्राप्त करावा लागतो. विरोधकांना नेमकी हीच संधी साधायची आहे. पण त्यासाठी झोकून देऊन काम करावे लागते.

आपल्याच पक्षाचे वर्चस्व असल्याने तरी जिल्हा पंचायतींना ज्यादा अधिकार देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. अधिक निधी दिला म्हणून या पंचायती निर्माण करण्याचा हेतू साध्य होणार नाही. जे अधिकार आहेत ते बहाल केले तरच या पंचायतींना अर्थ राहील. जिल्हा पंचायत निवडणुका या आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीसाठी प्रत्येक पक्षाला महत्त्वाच्या वाटत होत्या. आपण किती जागा जिंकल्या यापेक्षा त्या कशा जिंकल्या, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. ही परीक्षा किती कठीण होती हे लक्षात आल्यावर आता तरी व्यवस्थित अभ्यास करण्याची तयारी प्रत्येक पक्षाने ठेवायला हवी. अन्यथा पत्ता कट झालाच म्हणून समजा.

संबंधित बातम्या