भाष्य: पेडण्यातील कोविड उपचार केंद्राकडे दुर्लक्ष का?

यशवंत पाटील
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने ११ लाखांच टप्पा ओलांडला आहे. ऑक्सिजनवर ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. दिवसेंदिवस कोरोना महामारी रौद्ररूप धारण करीत असल्याने सर्वांच्याच मनात भीतीने काहूर उठले आहे.

देशाबरोबरच राज्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. कोरोना महामारीमुळे राज्यात भयानक स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील बळींची संख्या साडेतीनशेवर (३६०) गेली आहे! घरगुती अलगीकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या १२ हजारांवर पोहोचली आहे. देशात बळींची संख्या ८६,७५२ झाली आहे. रुग्णांची एकूण संख्या ५४ लाखांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने ११ लाखांच टप्पा ओलांडला आहे. ऑक्सिजनवर ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. दिवसेंदिवस कोरोना महामारी रौद्ररूप धारण करीत असल्याने सर्वांच्याच मनात भीतीने काहूर उठले आहे.

रुग्णांची संख्या वाढल्याने कोविड इस्पितळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा कमी पडत आहेत. त्यामुळे राज्यात आणखी कोविड उपचार केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने मडगाव येथील नवीन जिल्हा इस्पितळात सरकारने कोविड विभाग सुरू करून चांगलेच केले. या इस्पितळात सध्या १०० खाटांची सोय आहे आणि पुढील काही दिवसांत ती संख्या ३५० पर्यंत वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. मडगाव येथील नवीन जिल्हा इस्पितळात कोविड उपचार विभाग सुरू करून सरकारने एक चांगले पाऊल उचलले, परंतु पेडण्यातील कोविड उपचार केंद्र सर्व सोयीसुविधांनी सज्ज असूनही ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. एकीकडे सध्या असलेल्या कोविड उपचार केंद्रात रुग्णांना खाटा कमी पडत आहेत आणि दुसरीकडे १५० खाटांची सोय असलेले पेडण्यातील कोविड उपचार केंद्र विनावापर आहे. सरकारने हे उपचार केंद्र त्वरित सुरू करण्याची गरज आहे. काहीजण आपल्या भागात कोविड उपचार केंद्र नको म्हणून विरोध करतात, परंतु पेडण्यातील नागरिक कोविड उपचार केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी करत आहेत. कोविडवर मात करण्यासाठीच त्यांची ही रास्त मागणी आहे. सरकारने त्याकडे दुर्लक्ष करणे आश्‍चर्यच म्हणावे लागेल. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि आमदार दयानंद सोपटे यांनी अलीकडे हे कोविड उपचार केंद्र दोन दिवसांत खुले करण्यात येईल, असे सांगितले होते, परंतु अजूनपर्यंत याची कार्यवाही झालेली नाही. पेडणे तालुक्यात आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित आहेत, तर दहाजणांचा बळी गेलेला आहे. तरीही सरकार पेडण्यातील कोविड उपचार केंद्र सुरू करण्याबाबत उत्साही नाही. 

राज्यात सर्वत्रच कोरोनाच्या बळींची संख्या वाढत असल्याने लोक भयभीत झाले आहेत. कोविडमुळे मृत्यू होत आहेत. तसेच इतर रोगामुळेही मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा अधिक समावेश आहे. तसेच ज्यांना मधुमेह, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब असे विकार आहेत, त्यांचेही अधिक प्रमाणावर बळी जात आहेत. त्यामुळे कोविड उपचार केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांवर कोविडबरोबरच त्यांच्या इतर विकारांवरही उपचार होणे आवश्‍यक आहे. काही प्रमाणात रुग्णांच्या इतर विकारांवर उपचार होतात, पण ज्या तत्परतेने आणि परिणामकारकतेने व्हायला हवेत तसे ते होताना दिसत नाहीत. त्यामुळेच राज्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यावर सरकारने त्वरित उपाययोजना आखण्याची गरज आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या