संकटातही ‘आयडियाची कल्‍पना’!

dainik gomantak
शनिवार, 13 जून 2020
नागपूरमधील डॉक्टरांनी ‘कोविड -१९’ रुग्णांना सुरक्षितरीत्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर इतर कुणालाही संसर्ग न होता नेता यावे म्हणून ‘कोविसेफ’चा शोध लावला. ‘कोविसेफ’ हे एक प्रकारचे बॉक्स असून ते मेडिकल स्ट्रेचर्सवर उत्तमरीत्या बसवले जाऊ शकते. हे बॉक्स पूर्णपणे हवाबंद आहे.

नवी दिशा : प्राची नाईक

संकटातही ‘आयडियाची कल्‍पना’!
अनेक प्रकारचे व्हेंटिलेटर, मास्क, संरक्षक स्मार्ट हेल्मेट, फोन बूथ, सॅनिटायझिंग तसेच एअरपोर्टवर स्वच्छता करणारे रोबोट्स, हात न लावता उघडू शकू असे ‘डोअर ओपनर’ अशा अनेक नवकल्पनांनी या महामारीच्या काळात देशाच्या आरोग्य तसेच अर्थव्यवस्थेला महत्त्‍वाचा आधार दिला आहेत. दिवसासरशी नवनवीन संकल्पना आकार घेत आहेत आणि येणाऱ्या पुढील काही महिन्यांत जलदगतीने यात भर पडणार आहे.
नागपूरमधील डॉक्टरांनी ‘कोविड -१९’ रुग्णांना सुरक्षितरीत्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर इतर कुणालाही संसर्ग न होता नेता यावे म्हणून ‘कोविसेफ’चा शोध लावला. ‘कोविसेफ’ हे एक प्रकारचे बॉक्स असून ते मेडिकल स्ट्रेचर्सवर उत्तमरीत्या बसवले जाऊ शकते. हे बॉक्स पूर्णपणे हवाबंद आहे. हे बॉक्स स्‍ट्रेचरवर बसवताना यात प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठ्यासाठी व्हेंटिलेटरसारख्या आपत्कालीन सुविधा सहज बसविल्या जाऊ शकतात. सर्वांत महत्त्‍वाचे म्हणजे जेव्हा ‘कोविड-१९’ रुग्ण यात श्वास घेतो तेव्हा बॉक्समधून बाहेर पडणारी हवा आपोआप फिल्टर होते. यामुळे डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होते.
तोंड, नाक, डोळ्यांना हात लावल्यावर किंवा काही खातेवेळी आपल्या हातांवरील संभाव्‍य कोरोना तसेच इतर विषाणू पोटात जाऊ शकतात. त्यामुळे आजच्या काळात परत परत साबण लाऊन हात धुणे एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. पण, असे करतेवेळी आपल्या हातांवर असलेले विषाणू आपण नळ किंवा त्याच्या जवळपासच्या जागेवर सोडू शकतो. तारांकित हॉटेलमध्ये किंवा इतर कुठल्या ठिकाणी स्वयंचलित नळ आपण पाहिलेच असेल. असे नळ महाग असतातच, पण यादरम्यान अशीच संकल्पना असलेले नळ आणि वॉश बेसिन अनेक ठिकाणी अगदी माफक किमतीत, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सामानातून अनेकांनी तयार केले आहेत.
जम्मू-कश्मीर येथील पोलिसांच्या एक पथकाने पायाने चालवू शकू, असे हात धुण्याचे वॉश बेसिन तयार केले असून ते हे बेसिन या प्रदेशातील इतर पोलिस ठाण्यांमध्ये बसवण्याचा विचार करीत आहेत.
तळेगाव - दाभाडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारचे एक वॉश बेसिन तयार केले. त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या आवारातील वॉश बेसिनात काही बदल केले. त्यांनी सुधारणा केलेल्या वॉश बेसिनात एखाद्याला साबणाला किंवा हॅण्डवॉशच्या बाटलीला किंवा नळाला स्पर्श करण्याची काहीच आवश्यकता नाही, त्याऐवजी एखाद्याने एक तरफ पायाने ओढले, तर पाणी तसेच साबण आपोआप नळातून येऊ शकतो. अशीच वॉश बेसिन भारतीय रेल्वेच्या धनबाद विभागातील केअर सेंटरने विकसित केली आहेत. अशा अनेक नाविन्यपूर्ण उपकरणांनी जगभरातील लोकांना एका नवीन सामान्य आयुष्याचा स्वीकार करण्यास तयार केले आहे, असेच म्हणावे लागेल.

संबंधित बातम्या