मोबाईलचे ऑनलाईन शिक्षण आणि पालक

Narendra Tari
मंगळवार, 9 जून 2020

ज्या मोबाईलच्या वापरावर वर्गात बंदी होती, आता तोच मोबाईल शाळा चालवायला पुढे सरसावला आहे. काळानुरूप आणि परिस्थितीनुरुप आपण बदलायला हवेच, पण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर आपल्याकडे होऊ शकतो का? शहरी भागातील लोकांचे सोडा, पण ग्रामीण भागाचे काय...!!

एक काळ होता, ज्यावेळेला मोबाईल नावाची चपटी वस्तू शाळा, विद्यालयात निषिद्ध मानली जायची. विद्यार्थी चोरून मोबाईल वापरायचे. वर्गात कुणी मोबाईल आणला असेल तर तो शिक्षकांकडून जप्त केला जायचा. वर्ग संपल्यानंतर मग हा मोबाईल परत मिळायचा. पण पालकांकडे तक्रार पोचती व्हायची. आज काळ बदलला आहे. आज मोबाईलच शाळा चालवू पाहतोय. जी वस्तू निषिद्ध मानली जायची, त्याच वस्तूचा वापर करून वर्ग चालवण्यासाठी शिक्षण खाते सज्ज झाले आहे. ऑनलाईन नावाच्या शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देण्याचे शिक्षण खात्याने ठरवले आहे, पण...!
कल्पना तशी वाईट नाही. कारण कोरोनामुळे धोका काही टळलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी बसायचे, आणि शिक्षकांनी मोबाईलवरून त्यांना धडे द्यायचे असा हा प्रकार आहे. एका खोलीत चाळीस, पन्नास विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक आता एकाच ठिकाणी थांबून साधारण वीस पंचवीस किलोमीटर परिघातील विद्यार्थ्यांना ही शिकवणी देणार आहे. पण ते शक्‍य आहे काय, यावरच आता खल सुरू झाला आहे. शिक्षण खात्याने आपल्यापरीने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी योजना आखली असली आणि शिक्षकांना त्यासाठी ऑनलाईन धड्याचे वर्ग भरवून मार्गदर्शन केले असले तरी प्रत्यक्षात या ऑनलाईनचा कितपत फायदा होऊ शकतो, हाही खरा प्रश्‍न आहे. गंमत म्हणजे ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ज्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले, त्यातील बहुतांश शिक्षकच अशा पद्धतीचा कोणताच फायदा होणार नसल्याचे सांगतात. शिक्षकच कशाला, पालक, संस्था चालक आणि शिक्षण तज्ज्ञांचेही तेच मत आहे.
राज्यात प्राथमिक ते माध्यमिक शाळांत गेल्या वर्षीच्या सरकारी आकडेवारीनुसार २ लाख ४० हजार ९२६ विद्यार्थी होते. उच्च माध्यमिकचा आकडाही दहा हजारांच्या आसपास असावा. दहावी, बारावीचे शिक्षण म्हणजे करिअरचा पाया, त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांना एकाचवेळी कसे काय बुवा मोबाईलचे शिक्षण मिळेल?
ऑनलाईन शिक्षणाला कुणाचा विरोध नाही, मात्र भारतासारख्या आताच कुठे विकासाची वाट चालणाऱ्या देशाला ते शक्‍य आहे काय? युरोपीय देशातील शिक्षण पद्धती, तेथील विज्ञान, तंत्रज्ञान आणि आपण यावर जास्त बोलणे योग्य नाही. त्यातच ऑनलाईन शिक्षण पद्धतीत बऱ्याच त्रुटी असल्याने हे काही चालणार नसल्याचा दावा खुद्द शिक्षण तज्ज्ञांकडूनच केला जातोय, आणि शैक्षणिक वर्ष सुरू करायचे असेल तर सरकारने शिक्षण क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांची मते आजमावून घ्यावी आणि त्यानंतरच योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरीत आहे.
ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठी अत्याधुनिक मोबाईलची गरज आहे. हा मोबाईल विकत घ्यायचे म्हणजे किमान दहा हजार रुपये खिशात हवेत. ‘इंंटररनेट’साठी पैसे हवेत. मोबाईल घेतला म्हणज झाले बुवा, असा प्रकार नाही. शहरी भागातही व्यवस्थित इंटरनेट उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील स्थिती काय असेल, याचा विचार न करणेच बरे. त्यातच पावसाळी दिवसांत जोरदार पाऊस, वादळी वारे, विजेचा लपंडाव यामुळे मोबाईल सेवा ठिक काम करील, याचा कोणताच भरवसा नाही. मोबाईलवरील संभाषण ठिक ऐकू येईल काय, मोबाईलवरील चित्र स्पष्ट दिसेल काय, एकमेकांशी संभाषणाचे आदानप्रदान होईल काय, शिक्षकाने विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर विद्यार्थ्याला मोबाईलवर सापडेल काय, असे अनंत प्रश्‍न आहेत.
कोरोनामुळे लोकांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. नोकरी-धंद्यावर गदा आली आहे, खिशात पैसा नाही. कुटुंब चालवण्यासाठी कोणत्या उचापती कराव्या लागतात, हे पालकांनाच माहीत! अशा स्थितीत पाल्यासाठी महागडा दहा हजार रुपयांचा मोबाईल घ्यायचा त्यासाठी इंटररनेटचे पैसे कायम भरायचे म्हणजे? शक्‍य आहे काय ते. खुद्द काही शिक्षकांकडेच असा मोबाईल आहे काय, याची विचारणा करण्याची गरज आहे. गरीब पालकांनी अशाप्रकारचा मोबाईल कधी हाताळला नाही. त्यामुळे हा मोबाईल कसा हाताळायचा हे पालक आपल्या पाल्यांना कसे बरे दाखवू शकतील. बरे...कसेबसे पैसे जमवून मोबाईल घेतला, पण घरातच एका कुटुंबात तीन विद्यार्थी असतील तर, विविध वर्गातील भावंडे एकाचवेळी एकच मोबाईल कसा काय वापरू शकतील, हाही अनुत्तरित प्रश्‍न आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा सरकारचा चांगला विचार असला तरी तो प्रत्यक्षात येणे शक्‍य आहे काय. शहरातील विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि इतर बाबतीत सुलभ ठरेल, पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय?
या पार्श्‍वभूमीवर काही राजकारण्यांनी शैक्षणिक वर्ष सुरू करताना सर्व बाबींवर सविस्तर चर्चा आणि सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक, प्राचार्य, शिक्षण संस्था चालवणारे जाणकार अशा लोकांची मते विचारात घेऊन सरकारने योग्य निर्णय घेण्याची आज खरी गरज आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांकडे शिक्षण खाते आहे, आणि मुख्यमंत्र्यांना शिक्षणाबद्दलचे महत्त्व पुरेपूर माहीत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, यात दुमत नाही. कारण दहावीच्या परीक्षा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला त्याचे विरोधकांनीही कौतुक केले, हे नजरअंदाज करून चालणार नाही.
शेवटी कोरोनाला सोबत ठेवूनच आपल्याला सध्या तरी मार्गक्रमण करायला हवे. त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मते दुबार शाळा, विद्यालये चालवावी, काहींच्या मते एखाद्या वर्गात जर चाळीस विद्यार्थी असतील तर वीस विद्यार्थ्यांचा गट तयार करून एक दिवसाआड किंवा आठ दिवस सलग एक त्यानंतर दुसरा वर्ग घ्यावेत, या विद्यार्थ्यांना शाळा, विद्यालयात आणण्यासाठी जादा वाहनांची सोय करावी, बडी आस्थापने, खाण कंपन्यांचे याकामी सहकार्य आवश्‍यक आहे. या उद्योग प्रकल्पांनी जर वाहने पुरस्कृत केली तर वाहतुकीची सोय होईल. सोशल डिस्टन्सिंगचाही प्रभावी वापर होईल. गर्दी होणार नाही. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरासंबंधीचे मार्गदर्शन करण्याबरोबरच सॅनिटायझेशन व इतर बाबींसंबंधी योग्य माहिती दिली, उपयुक्त मार्गदर्शन केले तर अशाप्रकारचे वर्ग भरवणे शक्‍य असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. तरीपण विद्यार्थ्यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. खुद्द पालकांनी अशा सुरक्षेसंबंधी खात्री करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थी वर्गात शिकतो ते कसे आणि ऑनलाईन घरी शिकतो ते कसे, यावरही विचार व्हायला हवा. शेवटी शाळा, विद्यालयांच्या सानिध्यात विद्यार्थ्याची जी जडणघडण होते, संस्कार, शिस्तीचे पाठ मिळतात, ते घरी कुठे हो मिळतात. आई-वडील आपापल्या कामाला, सकाळी जाणार ते संध्याकाळी घरी परतणार. मुले घरी. त्यातच मुले घरी कशी वागतात, ते सांगायला हवे का, पालक म्हणतात, नसता डोक्‍याला ताप, त्यामुळे शाळाच बरी. या सर्व बाबींचा विचार केला तर हे ऑनलाईन शिक्षण कशा पद्धतीचे होईल, याचा आणखी विचार करायला नको.
कोरोनाची महामारी कधी संपेल, हे कुणीच सांगू शकत नाही. एका बाजूला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आता कोरोनासोबत आपण जगायला शिकले पाहिजे, असे सांगतात. कोरोनावर औषध येईलच, पण ते कधी येईल, हे कुणी ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळेच तर सगळा घोळ निर्माण झाला असून आहे त्या साधनसुविधांचा वापर करून ‘चलती का नाम जिंदगी’ करण्यासाठीचा पुकारा हा झाला पाहिजे.

संबंधित बातम्या