फक्त वस्तूंवरच नव्हे, चीनवरच बहिष्कार टाका

शंभू भाऊ बांदेकर
बुधवार, 24 जून 2020

भारत व चीनमध्ये दरवर्षी सहा लाख कोटी रुपयांचा द्वैवार्षिक व्यापार चालतो. भारतात चीनमधून दरवर्षी सुमारे पाच लाख कोटी रुपये वस्तूंची आयात होते. तर भारत चीनमध्ये १.२ लाख कोटी रुपये किमतीचे साहित्य निर्यात करतो. याचा अर्थ दोन्ही देशात व्यापार युध्द झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही देशांवर होणार असला तरी त्याचा जास्त फटका चीनला बसणार आहे.

लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन सैनिकांमधील चकमकीत भारताने चोख प्रत्युत्तर दिले असले, तरी चीनची खुमखुमी जिरलेली दिसत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले की, प्रत्यक्ष ताबा रेषेवेरील सीमा भागात चीनने भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी केलेली नसून भारताचा भूभागही बळकावलेला नाही. पुढे पंतप्रधानांनी असेही म्हटले की, भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची आज कोणाचीही हिंमत नाही. प्रत्येक सच्च्या भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट म्हणावी लागेल, पण त्याचबरोबर लडाखमधील गलवान कोर हे आमचेच आहे, असा चार दिवसांत चीनने पाचवेळा दावा केला आहे. याकडे डोळेझाक करून कसे चालेल. हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी संरक्षण मंत्री शरदराव पवार यांनी तर स्पष्टपणे प्रतिपादन केले की, गेली किमान तीस वर्षे चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेच्या चार हजार किलोमीटर भागात हवाई ताकद वाढविली आहे. दुब्रुक-डीबीओ रस्ता हा भारतीय हद्दीत संपूर्णपणे असला तरी या रस्त्यासह संपूर्ण लडाखवरच चीनचा डोळा आहे. अत्यंत गंभीर अशी ही बाब असून चीनची मस्ती काबूत आणायची असेल, तर याचवेळी चीनला योग्य तो धडा शिकवला गेला पाहिजे. कारण भारत चीनमधील या संघर्षाची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी गंभीर दखल घेतली आहे. जगप्रसिध्द न्यूयॉर्क टाइम्सने दोन सर्वांधिक लोकसंख्या असलेल्या देशांमधील हा संघर्ष असल्याचे म्हटले असून एक्‍सप्रेस डॉट युकेने हा संघर्ष म्हणजे तिसऱ्या महायुध्दाची सुरुवात असल्याचे वृत्त दिले आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरील वृत्तानुसार, दोन अणुशक्तीमधील संघर्ष असून तो धोक्‍याचा आहे. या घटनेने भारतात चीनविरोधी भावनांची एक नवीन लाट सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. असे नमूद केले आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही चीन आणि भारतातील संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली असून संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एतोनियो गुतीरेस यांनी दोन्ही देशांनी संयम बाळगण्याचा आग्रह धरला आहे. महासत्ता अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॅम्पिओ यांनी तर चीनचे वर्तन हे उर्मटपणाचे प्रतिक आहे, असा आरोप करीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) चे हे वर्तन भारतासह अन्य देशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे म्हटले आहे. फ्रान्सनेही चीनचे हे वागणे बरे नव्हे, असे सांगत आपण तिसऱ्या महायुध्दाकडे तर वाटचाल करीत नाही ना? अशी भीती व्यक्त केली आहे. रशियानेही याबाबत भारतास निःसंदिग्ध पाठिंबा देऊ केला आहे. जगभरात चीनविरोधात वातावरण असले तरी चीनने मात्र भारताला धमकावणे सुरू ठेवले आहे. चीनने हायड्रोजन बॉम्ब वापरण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने एका ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. चीनने १९६७ मध्ये हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. त्याचाच व्हिडिओ ग्लोबल टाइम्सने शेअर केला आहे.
हायड्रोजन बॉम्ब हा आत्मसंरक्षणासाठी असून आपला देश प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नसल्याचे म्हटले आहे. पण चीन ज्या प्रकारची आगळीक करीत आहे, त्यावरून हा ड्रॅगन भारताला अप्रत्यक्षपणे युध्दासाठी प्रवृत्त तर करीत नाही ना? अशी शंका जागतिक मुत्सद्यांनाही वाटू लागली आहे. भारताचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी- चिनी भाई-भाईचा नारा दिला, पण तो हवेत विरतो न विरतो तोच माओत्से तुंग यांनी १९६२ सालच्या ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये नेफामध्ये (आताचा अरुणाचल प्रदेश) चीन सेना पाठवून आक्रमण केले व आपले खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे हा वेगळेपणा जगाला दाखवून दिला होता. भारतानेही यापासून योग्य तो धडा घेऊन भविष्यकाळात चीनला योग्य तो धडा शिकवायची तयारी केली व त्याचा पडताळाही चीनला आणून दिला होता. २०१३ सालची एक घटना येथे नमूद कराविशी वाटते. यावर्षी चीनने भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात आगळीक करण्यास सुरुवात केली होती. यावेळी चीनच्या घुसेखोरीची भारताच्या संरक्षणदलांनी गंभीर दखल घेत तणाव दूर करण्यासाठी सरकारी आणि लष्करी पातळीवर प्रयत्न सुरू केले. विशेष म्हणजे भारताच्या मानवरहित विमानांनी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आम्ही कशातच नाही, असे म्हणणाऱ्या चीनला ‘हा सूर्य नि हा जयंद्रथ’ याचा पुरावा सादर करून त्यांचा खोडसाळपणा लक्षात आणून दिला होता. मुख्य म्हणजे लष्करीदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ‘डीबीओ’ क्षेत्रात (ज्याचा उल्लेख शरदराव पवार यांनी केला आहे) चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली होती. ही घुसखोरी करताना त्यांनी दोन चिनी हेलिकॉप्टर्सचे संरक्षण घेतले होते आणि भारताच्या हद्दीत बेकायदा कारवाया करण्यास सुरुवात केली होती. हे सगळे चक्षूवैसित्यम दृश्‍य जगाच्या समोर येताच ड्रॅगनने आपली वळवळ थांबवली होती. किंबहुना ती थांबवण्यास त्यांना भारताने भाग पाडले होते. त्यापेक्षा मोठी कृती आज्ञा भारताने केली तरच तो देश वठणीवर येणार आहे.
चीनने कोरोना विषाणूच्या माध्यमातून जगाला हादरा बसविला व आपण मात्र नामानिराळा झाला. जगभरात विषाणूचा विषवल्लीमुळे लाखो मृत्युमुखी पडले आहेत. पण याचे चीनला काहीच सोयरसुतक नाही, हे दृश्‍य जगाने पाहिले आहे. यामुळे चीनच्या कह्यात असणारे काही देश सोडले, तर जवळजवळ साऱ्या युनियननेच चीनवर बहिष्कार टाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे, ही समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल. विशेषतः लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चिनी सैनिकांच्या नापाक हल्ल्यानंतर देशात चीनच्या उत्पादनांवरील बहिष्काराच्या हाकेने जोर वाढला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आवाहन व्यापारी संघटनेने केले आहे व या हाकेस ओ देण्यासाठी सर्व सेलिब्रेटिंनीही चिनी कंपन्यांच्या जाहिरात न करण्याचे आवाहन करताच त्यांनीही त्याला मान्यता दिली आहे. आज सामान्य जनतेपासून मोठाल्या नेते मंडळींनीही चिनी वस्तुंवरील बहिष्कारास मान्यता देऊन एकप्रकारचे देशकार्य केले आहे, असे म्हटले पाहिजे. उपलब्ध माहितीनुसार, भारत व चीनमध्ये दरवर्षी सहा लाख कोटी रुपयांचा द्वैवार्षिक व्यापार चालतो. भारतात चीनमधून दरवर्षी सुमारे पाच लाख कोटी रुपये वस्तूंची आयात होते. तर भारत चीनमध्ये १.२ लाख कोटी रुपये किमतीचे साहित्य निर्यात करतो. याचा अर्थ दोन्ही देशात व्यापार युध्द झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही देशांवर होणार असला तरी त्याचा जास्त फटका चीनला बसणार आहे.
काय गंमत आहे बघा. साधे पेन, घड्याळ, बॅटरीपासून इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांपर्यंत आपण चीनच्या वस्तुंनाच प्राधान्य देतो. ज्या ब्रिटिश सरकारने आम्हाला पारतंत्र्यात ठेवले. त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची चळवळ आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी चालवली व ती यशस्वी करून दाखविली. आपल्या देशात साधी सुईसुध्दा आयात केली जात होती. त्या देशाने स्वातंत्र्यानंतर चौफेर विकासाची घोडदौड सुरू केली. तो आदर्श डोळ्यांपुढे ठेवून चिनी वस्तूंची आयात बंद करून तेथून येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे उत्पादन आपल्या देशात कसे होईल व ते दर्जेदार कसे होईल याकडे लक्ष पुरवणे आवश्‍यक आहे. चिनी वस्तूंवर फक्त बहिष्कार घालून चालणार नाही. तर त्या वस्तू दर्जा सांभाळून आपल्या देशात तयार झाल्या तर देशवासीयांकडून स्वागतच होणार आहे. त्यामुळे चीनकडून आपल्या देशाला होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन ड्रॅगनचा महाधूर्तपणा कावेबाजपणा लक्षात घेऊन केवळ चिनी वस्तूंवरच नव्हे तर चीन देशावरच बहिष्कार टाकणे श्रेयस्कर ठरणार आहे.

संबंधित बातम्या

फोटो फीचर