कारागृहातील एका कैद्याला वैद्यकीय तपासणीसाठी म्हापशातील जिल्हा इस्पितळात आणले जाते, तिथून परतताना त्या कैद्याला दोघेजण पोलिसांच्या तावडीतून घेऊन पळ काढतात, हे जणू एखाद्या सिनेमातील दृश्य... पण ही सत्यकथा आहे. मंगळवारी रात्रीची ही घटना.
कैद्याला सोडवण्यासाठी आलेले गावठी कट्ट्यातून गोळीबार करतात, पेपर स्प्रे मारतात. कैद्यासोबत असलेले पोलिस त्यांच्यांशी झटापट करतात, पण तरीही कैद्याला घेऊन गुन्हेगार पसार होतात. गोव्यासारख्या छोट्या राज्यात हे असे घडते. गुन्हेगारी नियंत्रणात आल्याचा दावा पोलिस प्रमुखांनी कितीही केला आणि सरकारने आपली पाठ थोपटून घेतली तरी गुन्हेगारांना गोव्यात रान मोकळे कसे मिळते, हा प्रश्न निरुत्तरीत राहतो. पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिला नाही आणि म्हणूनच गुन्हेगार पोलिसांवर शिरजोर ठरत आहेत. पोलिसांनाच हे एकप्रकारे आव्हान आहे. कैदी आजारी पडतो काय, त्याच्या पोटात दुखते काय, तपासणीनंतर त्याला इस्पितळातून नेले जात असताना रुग्णवाहिका पाहण्यासाठी एक पोलिस गेला तेव्हा कैदी हातातील बेडी झटकून दुसऱ्या पोलिसाला इंगा दाखवत पळतो काय, त्याचा पठलाग करणाऱ्या पोलिसाच्या डोळ्यात कैद्याचा जो साथीदार दबा धरून बसला होता, तो पेपर स्प्रे मारतो, तर आणखी एक साथीदार त्याला दुचाकीवरून घेऊन पसार होतो. या दरम्यान स्प्रे मारणाऱ्या साथीदाराला पकडण्यात पोलिसाला यश येते. परंतु आधीच तयारी करून आलेला दुसरा साथीदार गोळीबार करून घबराट माजवत आपल्या साथीदाराला सुरक्षितपणे पळण्यास मदत करतो. पोलिसांनी समयसूचकता दाखवत कैद्याच्या साथीदारांना पकडण्याचा केलेला प्रयत्न फसला. हे जे काही झाले ते काही क्षणातच.
या प्रकरणाच्या खोलात जायला हवे. कैदी आजारी पडतो आणि त्याचे सहकारी त्याची सुटका करण्यासाठी नेमके त्याचवेळी इस्पितळाकडे दबा धरून असतात, हा काही निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. तर यामागे मोठा कट असावा. कोलवाळचा मध्यवर्ती कारागृह गेली काही वर्षे नेहमीच चर्चेत राहिला आहे. अलिकडे तर या कारागृहातील अनेक भानगडी बाहेर येत आहेत. कैद्याला उपचारासाठी बाहेर आणले जाईल, याची माहिती आधीच कशी काय त्याच्या साथीदारांना मिळू शकते. दुसरे म्हणजे त्याला उलट्या येणे आणि पोटात दुखणे हे जाणीवपूर्वक घडवून आणले गेले असावे, असाही संशय बळावतो. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा रुग्ण म्हणून आलेला कैदी कसा होता, त्याच्या चेहऱ्यावरील भाव डॉक्टरांनी न्याहाळले असतील तर तपासात हा अनुभवही महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. उलटी येणाऱ्या रुग्णाला पुढील उपचारार्थ थांबवून घेण्याचा सल्ला दिला गेला होता काय, किंवा रुग्ण कैद्याने तिथे राहण्यास नकार दिला होता, हेही पाहायला हवे. त्याचे साथीदार इस्पितळाच्या बाहेर आहेत याची कैद्याला पुरेपूर कल्पना होती म्हणूनच तर तो रुग्णवाहिकेची वाट पाहत जास्तवेळ न थांबता बेधडक पुढे गेला. सारे काही ठरवून केले गेले होते. कारागृहात फोन वापरण्यास मिळत नाही. मग या कैद्याने कोणामार्फत आपण बाहेर पडणार असल्याचा निरोप दिला आणि वेळ साधली. म्हणजेच कुणीतरी फंदफितुरी केली आहे. एखाद्या कैद्याला इस्पितळात आणले जाते तेव्हा त्याच्याबरोबर किती पोलिस असतात. प्रकरण घडले त्यावेळी अन्य पोलिस बाहेर होते काय? इस्पितळाचे सुरक्षारक्षक बाहेर नव्हते काय, याबाबत पोलिस चौकशी करतील. परंतु एक कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देतो, त्याचे साथीदार त्याला पळवून नेण्यात यशस्वी ठरतात, हे फारच झाले. पोलिसांना अशा कैद्यांचा पूर्वेतिहास माहीत असतो तर मग कैद्यांना बाहेर नेताना तशी कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली जाते का, नसल्यास पोलिसांना कैदी पळून जाणार नाही, एवढा आत्मविश्वास कसा येतो, हाही गहन प्रश्न आहे. अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त अशा कोलवाळच्या नवीन कारागृहातील आजवरचे एकेक प्रताप पाहिले की हा कारागृह आहे की आणखी काही, असेच वाटावे. यापूर्वीही कैदी पळण्याचे प्रकार घडले आहेत. इस्पितळातून कैदी लघवी करण्याच्या बहाण्याने तिथून पसार झाल्याची उदाहरणे आहेत. पण एका कैद्याला, तेही रात्रीच्यावेळी त्याच्या साथीदारांनी सहीसलामत पळवून नेणे, हे गोवा पोलिसांना आव्हानच.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले आहेत. रस्त्यावर रात्रीचीही वाहनांची गर्दी असते. अशावेळी असे दुचाकीवरून कैद्याला नेण्याचे धाडस त्याचे साथीदार दाखवतात. एकतर सुसाट जाण्यासाठी रस्ते रिकामी नसणार याची त्या साथीदारांना कल्पना असताना मग कैद्याला कुठे लपवायचे आणि नंतर कुठे ठेवायचे, याचाही डाव शिजला होता. पोलिस आता तपास करीत आहेत. इस्पितळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज पाहून संशयित गुन्हेगारांचा माग काढण्यात ते यशस्वी झाले. घरफोड्यांमध्ये माहीर असलेला कैदीही आवाक्यात आला. लोकांना पोलिसांबद्दल नुकताच कुठेतरी विश्वास वाटत असताना असे प्रकरण घडणे हा पोलिसांच्या लौकिकाला डाग लावणारे आहे. आधीच खून, चोऱ्या, लूट, असे प्रकार घडत आहेत. त्यात गुन्हेगार पळून जातात. पोलिसांसमोर हे आव्हान आहेच, पण भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून योग्य दक्षता घ्यायला हवी. निदान या प्रकरणातून तरी पोलिसांनी बोध घ्यायला हवा.