गोमंतकाच्या विविध नावांविषयीच्या व्युत्पत्ती

प्रजल साखरदांडे
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

कोकणीत ‘गोंय’ आणि ‘गोंयबाब’, मराठीत ‘गोवे’, ‘गोमंतक’. तर ‘गोमंत’, ‘गोमंत दुर्ग’, ‘गोमांचल’, ‘गोमती’, ‘गोपका’, ‘गोवा’, ‘गोवापुरी’, ‘गोपकापट्टणा’, ‘गुवी’, ‘गुवक’, ‘गोवाद्वीप’, ‘गौबा’, ‘गोप्रदेश’, ‘कौबा’, ‘सिंदाबूर’, ‘सुनापरान्त’, ‘अपरान्त’, ‘कोवा’, ‘कल्याणगुडे’ इत्यादि नावांनी गोमंतक प्राचीन काळापासून ओळखला जातो.

कोकणीत ‘गोंय’ आणि ‘गोंयबाब’, मराठीत ‘गोवे’, ‘गोमंतक’. तर ‘गोमंत’, ‘गोमंत दुर्ग’, ‘गोमांचल’, ‘गोमती’, ‘गोपका’, ‘गोवा’, ‘गोवापुरी’, ‘गोपकापट्टणा’, ‘गुवी’, ‘गुवक’, ‘गोवाद्वीप’, ‘गौबा’, ‘गोप्रदेश’, ‘कौबा’, ‘सिंदाबूर’, ‘सुनापरान्त’, ‘अपरान्त’, ‘कोवा’, ‘कल्याणगुडे’ इत्यादि नावांनी गोमंतक प्राचीन काळापासून ओळखला जातो.  (संदर्भ : सातोस्कर, गुणे, कामत पी., मित्रगोत्री).

इतिहासकार डॉ. एस् एल् शांताकुमारी ‘कदम्बास ऑफ गोवा अँड देअर इन्सक्रीप्शन्स’ या आपल्या पुस्तकात नमूद करतात की कदंब राजवटीतील शिलालेखात गोमंतकाचा उल्लेख ‘गोवे’, ‘गोवागे’, ‘गोपका’, ‘गोपका द्वीप विषया’, ‘गोवा-दिवा देसा’, ‘गोपकाराष्ट्र’, इत्यादि नावांनी झालेला आहे. त्या पुढे असेही सांगतात की या शिलालेखांमध्ये कदंब राजांचा उल्लेख ‘गुवाला’, ‘गोवाला’, ‘गुहाल्ला’, ‘गुवालादेव’ आणि ‘गुहौसावासा’ असा केलेला आढळतो. कदंब राजवटीतील राणी मैलालादेवी यांच्या शिलालेखात गोमंतकाचा उल्लेख ‘गोल्लीहल्ली’ असा आढळून येतो. शेवटी, ‘गोवा’ हे नाव आपल्याला पोर्तुगीजांची राजधानी ‘लिस्बोआ’ या नावाशी यमक साधताना दिसते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गोमंतकाच्या प्राचीन आणि पूर्व मध्ययुगीन काळातील सर्व नावांमध्ये ‘गो’ हा शब्द आलेला दिसतो. ‘गो’ म्हणजे ‘गाय’. वर उल्लेख केलेल्या सर्व नावांच्या व्युत्पत्तीची मुळे प्राचीन काळातील लोकांच्या समृद्ध आणि संपन्न कृषी-संस्कृतीकडे निर्देश करताना दिसतात. ‘गोंय’ हे नाव गोमंतकातील ‘गावडा’ या जमातीवरून आले असल्याची शक्यताही वर्तविली जाते. ‘गांवचो-व्हड’ म्हणजेच ‘गावातील जाणता किंवा वडिल’ यावरूनही या नावाची व्युत्पती सांगितली जाऊ शकते.

गोमंतकियांची मातृभाषा कोकणी, या भाषेची पाळे-मुळे ‘कुणबी-मुंडारिका’ शब्दावलीत आढळून येतात. कुणबी ही गोमंतकातील आद्य ज्ञात जमात म्हणून ओळखली जाते. ही जमात भााताशी निगडीत आहे. त्यामुळे उभे असलेले किंवा वाकलेले, कापणीची वाट पाहत असलेले भात असाही या नावाचा अर्थ निघू शकतो. ‘गोंयबाब’ म्हणजे कणसाचा कललेला कान. ‘गोपराष्ट्र’ म्हणजे गुरांचा किंवा गुराख्यांचा प्रदेश. ‘गोमती’ हे मांडवी नदीचे प्राचीन नाव असून ती गोमाता असल्याचेही सांगितले जाते. ‘गोमंत दुर्ग’ हे नाव गोव्यातील प्राचीन किल्ल्याशी निगडित आहे. ‘गोवापुरी’ किंवा ‘गोपकापुर’ या शब्दांची फोड करता, ‘पुरी’ आणि ‘पूर’ असे संस्कृत शब्द आढळतात. याचा अर्थ शहर किंवा प्रदेश असा होतो. ‘पूर’ किंवा ‘पुरी’ या नावाला जोडलेल्या ‘गोपका’ किंवा ‘गोवा’ या शब्दांचा अर्थ गुरांचा प्रदेश, शेती-बागायती, चारा-पाण्याने समृद्ध आणि संपन्न असा प्रदेश. ‘गोंय’ म्हणजेच ‘गाय’.

आधुनिक काळातले ‘गोवा वेल्हा’ म्हणजे तत्कालीन ‘गोपकापट्टणा’. या शब्दाची फोड करता ‘पट्टणा’ हा कन्नड शब्द आढळतो. या शब्दाचा अर्थ बंदर असलेला प्रदेश असा होतो. सासष्टी तालुक्यातील कुशावती नदीच्या तीरावर वसलेले प्राचीन चांदोर किंवा चंद्रपूर या स्थळासाठी ‘सिंदापूर’ असा अरबी संदर्भ वापरलेला आढळून येतो. अरबी व्यापाऱ्यांनी गोमंतकात प्रगत आणि संपन्न व्यापार-उद्योग स्थापन केला होता. सुनील पालकर आपल्या लेखात म्हणतात की गोमंतकात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या तांदळामुळे ‘गोवा’ हे नाव पडले. प्राचीन आणि पूर्व मध्ययुगीन काळात भारत आणि अरब या देशांमध्ये स्थापन झालेल्या व्यापारावरून अरबी समुद्राचे नामकरण करण्यात आले.

‘सुनापरान्त’ म्हणजे पश्चिम तटावरील सोनेरी प्रदेश. तर ‘अपरान्त’ म्हणजे सह्याद्रीच्या पुढील प्रदेश. गोवा हा सुंदर कोकणपट्टीचा एक भाग आहे. ‘गुवी’ किंवा ‘गुवक’ हा शब्द आसामी भाषेमध्ये सुपारीसाठी वापरलेला दिसून येतो. गोमंतकातील 
‘कुळागरात’ (बागायत) मोठ्या प्रमाणात दिसून येणारे हे झाड आहे. ‘कल्याणगुडे’ हा कन्नड शब्द असून विजयनगर शिलालेखांमध्ये त्याचा अर्थ सुस्थितीतील (कल्याणकारी) राज्य असा सांगितलेला आहे.

पोर्तुगीजांच्या राजवटीत, गोवा बेट म्हणजेच तिसवाडी प्रदेशाला ‘इल्हास’ म्हणजेच बेट, किंवा ‘इल्हा-दे-गोवा’ आणि ‘सिदादे-दे-गोवा’ म्हणजे गोवा शहर तर ‘वेल्हा गोवा’ हा संदर्भ आजच्या ‘ओल्ड गोवा’साठी वापरला जायचा.

वरील सर्व संदर्भावरून दिसून येते की गोमंतकाच्या विविध नावाच्या व्युत्पत्तींना दीर्घ इतिहास लाभलेला आहे. या इतिहासाची पाळे-मुळे कुणबी-कोकणी (प्राकृत), आर्यन-संस्कृत, मराठी, कन्नड, पारशी आणि शेवटी पोर्तुगीज भाषेत दिसून येतात.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या