समृध्द वारसा : गोव्यातील सागरी जीवाश्‍म

राजेंद्र केरकर
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

सागरी जीवाश्‍मांत मृत प्राणी, वनस्पती यांचे नैसर्गिकरित्या जतन केलेले अवशेष आढळतात. खडकांमध्ये नदी किंवा सागराच्या तळाशी पडलेल्या गाळात त्यांची निर्मिती होत असते. 

सागरी जीवाश्‍मांत मृत प्राणी, वनस्पती यांचे नैसर्गिकरित्या जतन केलेले अवशेष आढळतात. खडकांमध्ये नदी किंवा सागराच्या तळाशी पडलेल्या गाळात त्यांची निर्मिती होत असते. 

पृथ्वीचे बाह्यकवच घट्ट होऊन भूगर्भात व भूस्तरावरती जेव्हा पाण्याचे साठे निर्माण झाले आणि वातावरण तयार होऊन त्यात बाष्प सामावले गेले तेव्हा नियमित पर्जन्यवृष्टी सुरू झाली आणि त्यात जीवसृष्टीचा उगम झाला. आपला गोवा भौगोलिकदृष्ट्या आकाराने अगदी छोटा असला तरी या प्रदेशाला भूगर्भशास्त्रानुसार महत्त्वपूर्ण असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याचे दर्शन भूस्तरांचे निरीक्षण करताना घडते.

गोव्यातला भूपृष्ठावरील  सर्वात वरचा  स्थर गाळयुक्त मातीचा, त्या खालचा जांभ्या दगडाचा तर त्यानंतरचा स्थर ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्‍हारसाने बनलेला आहे. या थराखाली कॅंब्रियनपूर्व थर आहे. कॅंब्रियन काळात वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्‍म आढळतात. कॅंब्रियन काळात समुद्राची निर्मिती झाली व डोंगर तयार होऊ लागले. ज्वालामुखी उत्पन्न झाल्यावर जमिनीची धूप व्हायला लागली आणि भूगर्भात बदल घडू लागले. जमीन खचू लागली, खडक वर येऊ लागले तेव्हा त्यात प्राणी व वनस्पती चेंगरून त्यांच्याभोवती माती साचून नवे खडक तयार झाले.

ज्वालामुखीतून लाव्हारस निर्माण होऊन सर्वत्र पसरला आणि दख्खनचे पठार निर्माण झाले. कॅंब्रियन काळात वादळवारे आणि सागरी लाटांमुळे जमिनीची धूप होण्याची प्रक्रिया सुरू झाली. कालांतराने पश्‍चिम घाट निर्माण झाला. गोव्यातला बहुतांश भाग कॅंब्रियनपूर्व धारवाड  व कडाप्पा खडकांनी व्यापलेला आहे. तेरेखोलपासून मुरगावपर्यंतच्या किनारपट्टीत कडाप्पाचे अस्तित्व असून त्यात भेगा व चिरा असून तेथे जीवाश्‍म आढळत नसल्याचे बा. द. सातोस्कर यांनी नमूद केलेले आहे. 

गोव्याच्या समुद्रात खुबे, शिनाणे आणि अन्य शंखधारी मासे असून ते जेव्हा मृत होतात तेव्हा त्यांच्यातला मऊ भाग कुजतो व शंख विखुरतात. हे शंख उथळ पाण्यात असताना सागरी लाटांच्या तडाख्यात वाळूच्या आकारासारख्या कणांत रुपांतर होते. सागरी जीवांच्या सांगाड्यांचे जेव्हा जीवाश्‍मात रुपांतर होते तेव्हा अशा जीवाश्‍माद्वारे हजारो वर्षांपूर्वीच्या परिसरातल्या वातावरण आणि हवामानाची कल्पना येते. एखादा लाकडाचा तुकडा, हाड किंवा शंख पाण्यातल्या गाळात गाडला जातो आणि खनिजयुक्त पाण्याच्या संपर्कात येतो. त्यांच्या मोकळ्या जागेत खनिज समाविष्ट होतात आणि कालांतराने त्यात जीवाश्‍म निर्माण होतात. गोव्याच्या निर्मितीसंदर्भात एक पूर्वांपार कथा सांगितली जाते, त्यानुसार परशुरामाने धनुष्याद्वारे बाण मारून सागराला मागे हटवले आणि बाणावलीला गोव्याचा जन्म झाल्याचे सांगितले जाते.

या लोककथेला कोणताच वैज्ञानिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या आधार नसला तरी एकेकाळी गोव्याची भूमी मोठ्या प्रमाणात सागराच्या पाण्याखाली होती. गोमंतकाच्या वसाहतीची रूपरेषा या निबंधात अनंत रामकृष्ण धुमे यांनी नमूद केलेले आहे की, फार प्राचीन काळी गोमंतकाची जमीन लगतच्या भू-प्रदेशाच्या त्या काळाच्या उंचीच्या पातळीबरोबर होती. नंतर धरणीकंप होऊन गोमंतकाचा भाग खचला व तो समुद्राच्या पाण्याखाली गेला, मध्ये इकडे तिकडे बुडबुड्याप्रमाणे काही भाग मूळच्या उंचीच्या पातळीवर राहिले, ते आज मध्ये दिसणारे उंच पर्वत होत. तद्‍नंतर लगतच्या काळात, पूर्वकृत युगात, सह्याद्रीच्या पूर्वेकडे धरणीस भेग पडून त्यातून लाव्हारस  व अन्य खनिज पृष्ठभागावर घट्ट बनले. याने सरासरी दोन लक्ष चौरस मैल व्यापले. या उत्सर्गातील खनिज वर्षावाने व पावसाच्या पाण्याने येऊन समुद्राखाली गेलेल्या जमिनीवर जमा झाले. विशेषतः गोमंतकाच्या मध्यभागी जास्त साठले व अशारीतीने आजची गोमंतकाची भूमी तयार झाली.

पोर्तुगीज कालखंडात १८६३ साली गोवा-कर्नाटक सीमेवर असलेल्या सत्तरीतील आम्याचो गवळ येथे लॉपिस मेंडिस यांना सागरी शंख सापडला होता याचा उल्लेख त्यांनी सादर केलेल्या अहवालात आढळतो. १९४३ साली भूमापन काम करणाऱ्या गणबा राम कंटक यांना सत्तरीतल्या सुर्ल गावात शंख सापडला होता. सुर्लाच्या उत्तरेच्या बाजूस काळ्या पाषाणाचा एकसंधी भयंकर कडा असून या कड्याच्या पायथ्यापासून काही अंतरावरती जेथे शंख सापडला होता, त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी अनंत धुमे यांनी केली होती, याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. सह्याद्रीच्या उंच भागात जेथे हे शंख सापडले होते  तेथे कधीकाळी सागराचे पाणी होते असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे.

गोव्यातले सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांना शंखवाळहून मुरगाव जाण्याच्या महामार्गासाठी जेथे खोदकाम केले होते तेथे चिखली परिसरात सागरी जीवाश्‍म आढळले होते. सुमारे दहा ते पंचवीस हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी उंचावर असून जेथे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जांभ्या दगडात खणलेले होते तेथे सागरी शंखांच्या जीवाश्‍माचे दर्शन घडते.  शिरदोनपासून माजोर्डा, वार्का, बेताळभाटी, कोलवा आदी भागांतील सागर किनारे गोव्यातल्या अंतर्गत भागातल्या सागर किनारपट्टीशी तुलना करता सहा ते पंधरा हजार वर्षांच्या काळात अस्तित्वात आल्याचे शास्‍त्रज्ञांच्या निरीक्षण आणि संशोधनातून स्पष्ट झालेले आहे. याच परिसरात खिडक्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शिनाण्यांचे अंश जमिनीत सापडलेले असून हे अवशेष दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा सागराची पातळी उंचावरती होती त्यावेळचे असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सागरी जीवाश्‍मांचे अंश म्हापसा, शापोरा नदी परिसराबरोबर चिखली, शिरदोनच्या किनारपट्टीवरती आढळलेले आहे.

मुरगाव बंदरासाठीच्या जलमार्गावरती चिखली गावचा किनारा वसलेला असल्याने जुन्या काळी या भागाला विशेष महत्त्व लाभले होते. शिनाण्याच्या अंशाचा साठा चिखलीतल्या टेकडीवरती उत्खनन करताना सापडल्याने जुन्या काळी इथे सागराच्या पाण्याची पातळी पोहचली होती याची प्रचिती या क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना आलेली आहे. सत्तरी तालुक्यातल्या सुर्ल आणि आम्याचो गवळ या गावात जेथे शंख आढळलेले होते, तो सारा परिसर आजच्या घडीस समुद्रसपाटीपासून सातशे मीटरवरती वसलेला असल्याने सर्वसामान्यांना हजारो वर्षांपूर्वी इथे समुद्राचे पाणी पसरले होते असे सांंगितले तर त्यांचा याच्यावरती विश्‍वास बसणे कठीण आहे. परंतु आज भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने संशोधक अभ्यास करत असून त्यांना सह्याद्रीच्या पर्वतरांगात सागराचे पाणी पोहचल्याचे पुरावे आढळत आहेत. सत्तरीतल्या साटरे, कोदाळ आदी ठिकाणी चूनखडकाच्या नैसर्गिक गुंफा आढळलेल्या असून त्यांचा शोधक दृष्टीने अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. इथे आढलेल्या चुनखडकाच्या गुंफा आणि तेथे सापडत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या अभ्यासाअंती हजारो वर्षांच्या इतिहासाचे दर्शन घडेल आणि सांस्कृतिक इतिहासकार अनंत घुमे यांनी काढलेल्या निष्कर्षांना भक्कम पुराव्यांचा आधार मिळेल.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या