समृध्द वारसा : कोदाळ येथील ‘निमगो गुणो’

राजेंद्र केरकर
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेल्या सत्तरी तालुक्याला समृध्द असा भूगर्भशास्त्रीय इतिहास असून, इथल्या युगायुगापासून अखंड वहाणाऱ्या नदीनाल्यांना आणि आकाशाला गवसणी घालू पहाणाऱ्या पर्वतशिखरांनी लाखो वर्षांचा इतिहास अनुभवलेला आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेल्या सत्तरी तालुक्याला समृध्द असा भूगर्भशास्त्रीय इतिहास असून, इथल्या युगायुगापासून अखंड वहाणाऱ्या नदीनाल्यांना आणि आकाशाला गवसणी घालू पहाणाऱ्या पर्वतशिखरांनी लाखो वर्षांचा इतिहास अनुभवलेला आहे. 

सत्तरीतल्या नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या कोदाळ गावात भूगर्भशास्त्राच्या चमत्कृतींचे प्रेक्षणीय दर्शन घडत असून, शेकडो वर्षांपासून निसर्गाच्या या संचितांचे याची देही, याची डोळी दृष्टीसुख लोकमानसाने घेतलेले आहे. कोदाळ गावातलया डोंगरदऱ्यात पायपीट करताना निसर्गाची मतीगुंग करून टाकणारी रुपे अनुभवत असताना आपणाला निसर्ग हाच श्रेष्ठ शिल्पकार असून त्याच्या कलाकृतींतल्या कणाकणांत वास करणारे भव्यत्व, दिव्यत्व दृष्टीस पडते. सहस्त्रावधी वर्षांपासून निसर्गात उद्भवणाऱ्या वादळवारे ऊन-पाऊस यांचे घाव झेलताना ही संचित उभी आहेत. कधी गिर्यारोहकांच्या अचाट साहसाला साद घालणारे उंच सुळके तर कधी आपल्या छातीत धडकी भरणारे दऱ्या-खोऱ्यांचे स्वरुप खरतर निसर्ग आपल्यातल्या अद्भुत रुपांचा साक्षात्कार घडवत असतो आणि नतमस्तक व्हायला लावतो.

कोदाळ हा गाव आज अल्प लोकसंख्येचा असला तरी कधीकाळी गोवा-कर्नाटक सीमेवर वसल्याकारणाने त्याला विशेष महत्त्व लाभले होते. पोर्तुगेज इंडिया आणि ब्रिटिश इंडिया अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन राष्ट्रांच्या सीमेवरच्या कोदाळात सैनिकी तळ होता. आज येथील गावठाण वगळता सरकारी राखीव वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा लाभलेला असल्याने, कायद्याने येथे खनिज उत्खननाला बंदी आहे आणि त्यामुळे येथील दगड-धोंडे, खनिज संपत्तीच्या नाना विविध घटकांचे संवर्धन आणि संरक्षण झालेले आहे. या गावात चुनखडकाच्या गुंफा आणि सुळके असून, येथील लोकमानसाला त्यांच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वैभवाची जाण असून त्यांच्या पूर्वजांनीही वारसा जतन केला होता. कोदाळ गावात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या बाजूची पायवाट आपणाला जंगलाच्या दिशेनं नेते. माडत, किंदळ, नाणो, जामो, हेद अशा वृक्षांबरोबर इथले जंगल नाना तऱ्हेच्या झुडूपांनी नटलेले आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून मेक्सिकोवरून आयात करण्यात आलेल्या गव्हांबरोबर युफोटोरियम आॅडेरेटमसारख्या विदेशी वनस्पतीचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाल्याने इथल्या पायवाटांवरून मार्गक्रमण करताना, त्यांचा पादुर्भाव सोसावा लागतो. नानोडा बांबर येथून येणारा ओहाळ ओलांडल्यानंतर पानगळतीच्या जंगलातून पायपीट केल्यावरत तिरफळणीचा व्हाळ लागतो. तेथून काही अंतरावरती मठातली झर ओलांडावी लागते. वाटेत वाघाटी, घडवेल, घुंगरीवेल अशा वेलवर्गिय वनस्पतींचे वैभव अनुभवण्याची संधी लाभते.

दीड तासाची पायवाट तुडवल्यावर आणि नानाविविध पक्ष्यांचा मधुर गुंजारव कानी साठवत आपणाला जंगलात मध्येच महाकाय अशा शिलाखंडाचे अचंबित करणारे दर्शन घडते. वृक्षवेलींनी नटलेल्या त्या हिरव्यागार जंगलात अगदी एकाकी शिलेदारासारखा उभा असलेला हा पाषाण कोदाळ आणि पंचक्रोशीत ‘भिवगो गुणो’ म्हणून ओळखला जातो. महाभारत महाकाव्यातल्या पांडवांत भीम हा महापराक्रमी आणि त्यामुळे रिपूमर्दन करणाऱ्या या व्यक्तीमत्वाच्या बऱ्याच लोककथा प्रचलित आहेत. अज्ञातवासाच्या आणि तत्पूर्वी वनवासाच्या कालखंडात पांडव गोमंतभूमीत आले होते, अशी लोकश्रध्दा असून इथल्या जंगलात मार्गक्रमण करण्यासाठी महाकाय देहाच्या भीमाने जी काठी धारण केली होती, ती त्यांनी म्हणे कोदाळच्या जंगलात विसरली आणि लोकांत हा शिलखंड भिवगो गुणो म्हणून ओळखला जाऊ लागला. कोदाळ गावात सह्याद्रीची जी पर्वतशिखरे आहेत, त्यापैकी समुद्र सपाटीपासून ३९८ मीटर उंचीच्या डोंगराचा हजारो वर्षांपूर्वी निसर्गात ज्या घडामोडी उद्भवतात तेव्हा अलग झाला असावा आणि त्यामुळे भूगर्भशास्त्रदृष्ट्या जंगलात मध्येच उभ्या असलेल्या या उंच सुळक्याविषयी लोकमानसाला आकर्षण निर्माण झाले. त्याला त्यांनी भिवगो गुणो अशी संज्ञा प्रदान केली. २७ मीटर उंचीचा हा सुळका निसर्गाच्या चमत्कृतीचा आविष्कार घडवत असल्याने लोकमनाने त्याच्यात भीमाचे रुप आणि कर्तृत्व पाहिले असावे. या भिवग्या गुण्याच्या एका बाजुने असलेल्या रानवेली आणि झुडपांचा आधार घेऊन प्रस्तारोहण केले तर सृष्टीच्या नयनरम्य अशा संचिताचे दर्शन घडते. निसर्गनिर्मित अशा भिवग्या गुण्याचे स्वरुप मानवी मनाला भुरळ घालते.

कोदाळातल्या चिंदबरच्या मठाकडून जाणारा जीपगाडीचा पोर्तुगीज काळातला मार्ग आज जंगलाने लपटलेला असून येथील काणेकेवणीच्या झाडांतून मार्गक्रमण करताना वाटते घूबघूबी फातर येथे भूगर्भातल्या पोकळीची प्रचिती येते. आम्याकडला पाणी हा जलस्त्रोत जंगली श्‍वापदांबरोबर पूर्वी जंगलात भटकंती करणाऱ्यांसाठी पेयजल पुरवठा करायचा. घोटींग, करमळ, वाघाटी, सातवीण, वसय, आमेरी, फळ्यो, चांदिवडे अशा वृक्षवनस्पतींचे वैभव या जंगलमार्गाच्या दुतर्फा असून, चिंदबर व्हाळ, आवळी व्हाळसारख्या ओहळांना ओलांडून गेल्यावर डाव्या बाजुला वळणारी छोटीशी पायवाट आपणाला निमगो गुण्याच्या दिशेनं नेते. मार्गालगत असलेल्या टेकडीवर चढून गेल्यावर निमग्या गुण्याचे दर्शन घडते, तेव्हा आपणाला हा शिलाखंड आवाक्यात आला असे वाटते. परंतु तेथून असंख्य अडीअडचणींशी संघर्ष करत आणि अगदी जीव मुठीत धरून छोट्या पायवाटेनं काही वेळ पुढे गेल्यावर निमग्या गुण्याचे शकट निसर्गशिल्प आकर्षित करते.

चिदंबर मठाकडून साडेतीन किलोमीटर अंतरावर जरी हा शिलाखंड वसलेला असला तरी डोंगर कड्याच्या सावलीत विसावलेल्या निसर्गशिल्पाकडे पोहचण्यासाठी अविरत धडपड करावी लागते. निमग्या गुण्याच्या पायथ्याकडे छोट्याशा नैसर्गिक गुंफेची निर्मिती झालेली असून तेथे सतत निथळत असणारे जलबिंदू चुनखडकाच्या स्वरुपाची कल्पना देतात. जमिनीपासून ४९ मीटर उंचीच्या या शिलाखंडावर प्रस्तराहोण करणे आव्हानात्मक असून, तेथे चढून गेल्यावर मंदिराच्या कळसासारखे भिवग्या गुण्याचे दर्शन घडते. कोदाळ गावातले निमगो आणि भिवगो हे दोन्ही शिलाखंड निसर्गाच्या शिल्पकृतींचे विस्मयजनक दर्शन घडवतात. निमगो गुण्यावर मधल्या भागात चुनखडकाचे जीर्णाविशेष पहायला मिळतात. तेथे असलेली छोटेखानी गुंफा वटवागळांसाठी निवास्थान ठरलेली आहे. सकाळच्या वेळेत बऱ्याचदा सर्पगरुडासारखा पक्षी सूर्याच्या कोवळ्या उन्हात निमगो गुण्याच्या शिखरावरती आरुढ होऊन आपल्या भक्ष्याचा वेध घेत असल्याचे पहायला मिळते. गोव्यातला सत्तरीतला सह्याद्री म्हणजे राकट, कणखर, दगडांचा प्रदेश. इथे जाणे म्हणजेच निसर्गातली अद्भतु शिल्पे अनुभवणे याची प्रचिती कांदोळमध्ये येते.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या