प्रजासत्ताकाची सुखस्वप्ने

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

यंदाचा प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक आगळावेगळा प्रजासत्ताक दिन ठरणार आहे.

यंदाचा प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक आगळावेगळा प्रजासत्ताक दिन ठरणार आहे. 1950 च्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासूनचे ठळक वैशिष्ट्य हे राजधानी दिल्लीत राजपथावर होणारे भव्य आणि शानदार संचलन असते. अवघ्या भारतवर्षाचे आणि मुख्य म्हणजे या देशाच्या बहुसांस्कृतिक, बहुभाषिक तसेच बहुधर्मीय संस्कृतीचे दर्शन जसे या संचलनातून घडते, त्याचबरोबर देशाने घेतलेल्या उत्तुंग झेपेचे प्रदर्शनही होत असते. मात्र, यंदा राजधानीत दोन संचलने होणार आहेत. एकातून आपल्या लष्कराचे नेहमीप्रमाणे शक्तिप्रदर्शन होणारे असले तरी त्याचवेळी गेले जवळपास दोन महिने राजधानीला वेढा घालून बसलेले शेतकरीही आपल्या एकजुटीचे दर्शन आज होणाऱ्या ‘ट्रॅक्‍टर मार्च’मधून घडवणार आहेत. त्याचवेळी मुंबईतही महाराष्ट्राच्या विविध भागांतील शेतकऱ्यांनी कालच्या सोमवारीच राजभवनावर चाल करून ताकद दाखवून दिली आहे. देशातील अन्य काही महत्त्वाच्या शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागातील जनताही आज मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहे.

आज रस्त्यावर उतरलेल्या या प्रजेमध्ये शेतकरी आघाडीवर आहेत. गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या आसपास दिल्लीत शाहीन बाग परिसरात जनतेने मोठे धरणे धरले होते आणि ते कोरोनाच्या सावटामुळे जारी केलेल्या ठाणबंदीपर्यंत सुरू होते. ठाणबंदीत स्थलांतरित मजुरांची पुरती ससेहोलपट झाली. जवळपास अवघे वर्ष कोरोनाच्या छायेत गेले. त्यामुळे 135 कोटींचा हा देश पायांत मणामणाच्या बेड्या घातल्याप्रमाणे असेल, तेथेच ठाणबंद होऊन पडला होता. वर्षभरातील उदासीनतेची काळोखी आज राजधानीतल्या सरकारी संचलनावरही दाटलेली आहे. अर्थात, ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल!’ या काव्यपंक्तीनुसार आज विविध आव्हानांनी भारतीय समाजमन अस्वस्थ असले, तरी ते नव्या जोमाने दाटून आलेले मळभ दूर करण्यासाठी झडझडून कामाला लागल्याचेही दिसते आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडून आर्थिक प्रगतीची चाके गतीमान होताहेत. शेअर बाजार निर्देशांकाने उच्चांकी पातळी गाठल्याने चैतन्य आहे. जनजीवन पूर्वपदावर आल्याने आणि औद्योगिक उत्पादने वाढल्याने सरकारच्या तिजोरीत महसुलाचा ओघ वाढल्याचे आकडे सांगत आहेत.

स्वातंत्र्यानंतर केवळ दोन-अडीच वर्षांत भारताने अवघ्या जगाला आदर्शवत अशी राज्यघटना उभी केली. यात स्वातंत्र्य, समता, बंधुभाव यांच्याबरोबरच धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा जोरदार पुरस्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या संविधानानुसारच आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. मात्र, नंतरच्या सात दशकांत या संघराज्यात्मक रचनेवर वेळोवेळी झालेले अनेकानेक आघात आपण पचवले. तरीही गेल्या पाच-सात वर्षांत सारी सत्ता ही केंद्रात एकवटू पाहत आहे आणि या प्रयत्नाला आव्हानही काही राज्यात दिले जात आहे. दुसरीकडे भेदाच्या भींती उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे सौहार्द, शांतता आणि सहजीवन टिकवणे हे मोठे आव्हान आहे. कोरोनाने आपली जीवनशैली आरपार बदलली आहे. खरे तर या महाभयानक विषाणूची चाहूल डिसेंबर 2019 मध्येच जगाला लागली होती. मात्र, आपण ‘नमस्ते ट्रम्प!’च्या उद्‌घोषात मग्न होतो. त्या भावविश्वातून बाहेर पडून प्रखर वास्तवाची दखल घेऊ पावेतो कोरोनाने आपले जाळे जलदगतीने फैलावले होते. अर्थात, आपण त्यानंतरचे सारे नियम हे होता होईल तेवढ्या कसोशीने पाळले आणि जगाच्या तुलनेत महामारीवर चांगल्या प्रकारे मात केली. आता आपण अवघ्या देशाच्या लसीकरणाचा श्रीगणेशा केलाय.

त्यावरच न थांबता शेजाऱ्यांसह इतर काही देशांना लस पुरवून दृढ संबंधांची ग्वाहीही दिली आहे. हे सारे याच अस्वस्थ प्रजासत्ताकाच्या मनोधैर्याचे तसेच अथक परिश्रमाची निःसंशय साक्ष देणारे आहे. मात्र, कोरोनाने अनेकांच्या जीवनाची घडी पुरती विस्कटून टाकली, हेसुद्धा मान्य करावे लागते प्लेटो या थोर ग्रीक विचारवंताने सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी ‘रिपब्लिक’ हा ग्रंथ साकार केला. तेव्हा त्याने कोणतीही राज्यव्यवस्था जनता लोकशाही मार्गाने स्वीकारते, ते जीवन आनंददायी होण्यासाठीच असा विचार मांडला होता. त्यामुळे प्रजासत्ताकाची सात दशके पूर्ण करताना, आज आपल्या प्रजेची तसेच देशाचीही आर्थिक, मानसिक, शारीरिक तसेच राजकीय प्रकृतीही नेमकी कशी आहे, याचा विचार शासनकर्त्यांनी करायला हवा. तो त्यांनी डोळसपणे तसेच वास्तवाचे भान ठेवून केला, तरच हे प्रजासत्ताक अधिक जोमाने प्रगतिपथावर जाईल.

संबंधित बातम्या