इंटरनेटद्वारे चालणारा ‘कोरो-बॉट’

प्राची नाईक
शनिवार, 25 जुलै 2020

या कोरो-बॉट चे वैशिष्ट्‍य म्हणजे हा रुग्णांची काळजी घेण्यासोबत स्वतःची ही काळजी घेऊ शकतो. हा नियमितपणे स्वतः वर जंतुनाशकाची फवारणी करू शकतो आणि त्यासोबत तो चालणाऱ्या जमिनीवरही जंतुनाशकाचा फवारा करू शकतो. कोरो-बॉटची किंमत १.६० ते ३.८० लाखांच्या दरम्यान आहे,

लेखिका - प्राची नाईक

महामारीला लढा देण्यासाठी रोज नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरत आहेत. मोठ्या कंपन्यांसोबत अनेक विद्यार्थीही आपले योगदान देत आहेत. यात आता भारतातील पहिला इंटरनेटच्या साहाय्याने चालणारा ‘कोरो-बॉट’ एका २३ वर्षीय अभियंत्याने तयार केला आहे. कोविड -१९ रूग्णांवर उपचार करणाऱ्यांना मदत करण्यासाठी प्रतीक तिरोडकर यांनी इंटरनेट-नियंत्रित रोबोट तयार केला आहे. त्यांनी मुंबई येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातून इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमधून बीटेकची पदवी संपादन केली आहे. ते पीएनटी सोल्युशन्सचे संस्थापकही आहेत. त्यांच्या कंपनीने इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील कोणत्याही ठिकाणाहून कोरोबोट चालवू शकू, असे एक विशेष ॲपही तयार केले आहे. कोरो-बॉट (Coro-bot) असे या रोबोटचे नाव असून डॉक्टर, नर्स, वॉर्ड स्टाफ किंवा इतर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांची कामे तो स्वतः करू शकतो. रुग्णांना अन्न, पाणी, शीतपेये, औषधे आणि त्यांना गरज पडल्यास सल्लाही देऊ शकतो. जसे स्पीकरच्या माध्यमातून रुग्णांना रोबोटिक ट्रेमधून काहीही उचलण्यापूर्वी हात स्वच्छ करून घेण्यासारख्या विविध सावधगिरीचा सल्ला हा रोबोट देऊ शकतो. कोरो-बॉटमध्ये ३ ट्रे आहेत ज्यात प्रत्येकी १०-१५ किलो सामान वाहून नेण्याची क्षमता असते, तसेच त्याच्या तळाच्या भागात ३० किलो सामान मावेल एवढी स्टोरेज असते, ज्यामुळे कोविड -१९ विभागात अनेक रूग्णांच्या व्यवस्थितरित्या गरजा पुरवल्या जावू शकतात. या रोबोटमध्ये स्वतंत्र पाणी, चहा, कॉफी डिस्पेंसर आहेत आणि सॅनिटायझर्ससाठी सेन्सर्स देखील आहेत. जे त्याच्यापुढे हात केल्यावर त्वरीत सुरू होतात आणि जेव्हा हात काढला जातो तेव्हा बंद होतात. पुढे सरकण्यासाठी हा कोरो-बॉट यूव्ही लाइट्सचा वापर करतो. कोरो-बॉट रात्रीच्या वेळेसही सुरळीतपणे काम करावा म्हणून यात एलईडी दिवे बसविण्यात आले आहे. या सोबत यात जेवणाची वेळ सांगण्यासाठी टायमर, इमर्जन्सी बटण तसेच करमणूक तसेच इतर कामासाठी छोटा स्क्रीन देखील आहे. या कोरो-बॉट चे वैशिष्ट्‍य म्हणजे हा रुग्णांची काळजी घेण्यासोबत स्वतःची ही काळजी घेऊ शकतो. हा नियमितपणे स्वतः वर जंतुनाशकाची फवारणी करू शकतो आणि त्यासोबत तो चालणाऱ्या जमिनीवरही जंतुनाशकाचा फवारा करू शकतो. कोरो-बॉटची किंमत १.६० ते ३.८० लाखांच्या दरम्यान आहे, त्यासोबत सामान-वाहन क्षमता इत्यादी विविध वैशिष्ट्यांनुसार ३० हजार रुपये जास्त पडू शकते. कोरो-बॉटमुळे नर्स किंवा प्रभागातील इतर कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी संपर्क होत नाही. ज्यामुळे त्यांना होणारा संसर्ग टाळला जावू शकतो. अशा प्रकारची नवनिर्मिती औद्योगिक क्षेत्राला नवीन वळण देणार आहे.

संपादन हेमा फडते

संबंधित बातम्या