सत्संग: गुरुसेवेचा महिमा

रमेश सप्रे
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

संसारात सारं काही ठीक होतं असं नाही. पण उदरनिर्वाह, पुढे कसं होणार या विषयी चिंता मात्र तुकाराम कधीही करत नसे. यामुळे श्रीमहाराजांची त्याच्यावर कृपादृष्टी होती.

आपल्या जीवनात अनपेक्षितपणे असे प्रसंग घडतात की त्यांचा साऱ्या जीवनावर प्रभाव पडतो. हा प्रभाव चांगला किंवा वाईट दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्याचा उपयोग करून जीवन अधिक संपन्न बनवण्यासाठी तीन घटक महत्त्वाचे असतात. - प्रारब्ध, आपले प्रयत्न आणि गुरुकृपा.

असाच एक प्रसंग एका गरीब शेतकऱ्याच्या जीवनात घडला. तो अत्यंत भाविक गृहस्थ होता. त्याचं नाव तुकाराम शेगोकार. शेगांव येथे राहून आपल्या कष्टाच्या संसारातून वेळ काढून तो श्रीगजानन महाराजांच्या मठात जात असे. त्यांना चिलीम भरून देणे. त्यांच्या सहवासात काही वेळ घालवून मनाला शांत करणं. नंतर त्यांच्या चरणांना वंदन करून आपल्या कामावर जाणं हा त्याचा नित्यक्रम होता. तो अत्यंत समाधानात असायचा. संसारात सारं काही ठीक होतं असं नाही. पण उदरनिर्वाह, पुढे कसं होणार या विषयी चिंता मात्र तुकाराम कधीही करत नसे. यामुळे श्रीमहाराजांची त्याच्यावर कृपादृष्टी होती.

एके दिवशी तुकाराम नित्याप्रमाणे आपल्या शेतात गेला होता. सकाळची वेळ. नुकताच सूर्योदय झालेला. वातावरणात थंडी असल्यानं तुकारामानं शेकोटी पेटवली नि तो शेकत बसला. त्यावेळी त्याच्याजवळ, कुपाटीला (हाताच्या अंतरावर) एक पांढराशुभ्र ससा बसलेला त्याला दिसला. त्याचवेळी एका शिकाऱ्यालाही तो ससा दिसला. त्यानं नेम धरून बंदुकीची गोळी सोडली. ती बंदूक छऱ्याची होती. म्हणजे गोळी सुटल्यावर तिचे बारीक तुकडे होऊन ती लक्ष्याचा वेध घेते. त्याप्रमाणे सशाला तुकडे (छरे) लागलेच पण एक छरा जवळच बसलेल्या तुकारामाच्या मस्तकात घुसला. दासगणू या प्रसंगाचं प्रत्ययकारी वर्णन करतात. 

जे जे असेल दैवात । ते ते श्रोते घडून येत ।
एके दिनी शेतात । असता तुकाराम आपुल्या ।।
तो एक आला शिकारी । बंदूक ज्याच्या खांद्यावरी ।
नेम धरून ससे मारी । छरे घालून बंदुकीत ।।

तुकारामाच्या जवळ बसलेला तो ससा त्या शिकाऱ्याला दिसला.
त्याची शिकार करण्या भली । शिकाऱ्याने आपुली ।
नेम धरून झाडीली । खांद्यावरील बंदूक ।
त्या योगे ससा मेला ।  एका छर्रा लागला ।
त्या तुकाराम माळ्याला । कानामागे अवचित ।।

बघा, कसा प्रसंग आला तो! तुकाराम सकाळी उठतो काय, शेतात जातो काय, शेकोटी पेटवतो काय, शेजारी झुडपाच्या आडोशाने बसलेला ससा दिसतो काय ते दृश्‍य पाहून त्याच्या मनात नक्की आनंदाची लाट हेलावत असेल. पण त्याचवेळी अवचितपणे, अकस्मात तो शिकारी बंदूक झाडतो काय नि एक छरा कल्पनाही नसताना तुकारामाच्या कानामागून मस्तकात शिरतो काय... सारं अघटित वाटणारं पण अटळ असलेलं.

या साऱ्याचा परिणाम त्याचं डोकं अतिशय दुखू लागलं. त्याच्या सहनशक्तीचा अंत ती डोकेदुखी पाहत होती. डॉक्टर सारे उपाय करून थकले. छरा काही बाहेर निघेना. इतकंच नव्हे तर इतर उपाय, नवससायास सारे करून झाले. अशाही अवस्थेत मठात येऊन श्रीमहाराजांची सेवा करणे नि त्यांच्या चरणाचं दर्शन घेणं हा नित्यक्रम त्यानं निष्ठेनं चालू ठेवला.

श्री महाराजांच्या एका भक्ताच्या लक्षात ज्यावेळी तुकारामाची ही परिस्थिती आली त्यावेळी तो आस्थेने तुकारामाला म्हणाला,

डॉक्टर वैद्य सोडा आता । साधुचिया सेवेपरता ।
नाही उपया कोणता । उत्तम या जगामधे ।।
कृपा त्यांची झाल्यास । चुकेल हा तुझा त्रास ।
झाडीत जा आसपास । या मठाच्या नित्य तू ।।

हे सांगताना त्या भक्तानं असंही सांगितलं, ‘श्री महाराजांची कृपा घडली तर तू या भोगातून, डोकेदुखीच्या त्रासातून सुटशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या वडिलांप्रमाणे दांभिकतेने, सेवेचं ढोंग करून मात्र तू हे करू नकोस.’ इथ वडिलांचा जो उल्लेख आहे त्याचा संदर्भ तुकारामाच्या नात्यातल्या वयानं वडील असलेल्या विठोबा घाटोळ याच्याशी आहे. या विठोबाला त्याच्या सेवेतील दांभिकता लक्षात आल्यावर श्रीगजानन महाराजांनी थोबाडून, तुडवून हाकलून दिलं होतं. अनेकांच्या साक्षीनं हा प्रसंग घडला होता. 

तुकाराम शेगोकार मात्र असा नव्हता. त्यानं सारा मठ रोज झाडून आरशासारखा लख्ख चकचकीत ठेवला. इतक्या निरलसपणे, मनापासून त्यानं ही सेवा सुरू केली. चौदा वर्ष ही नित्य सेवा केल्यानंतर एक दिवस भोकरातून (बोरासारखं फळ) त्याची बी (आठोळी) बाहेर पडावी तसा तो छरा आपोआप गळून पडला, त्याच क्षणी तुकाराम डोकेदुखीच्या त्रासातून मुक्त झाला.

सद्गुरूंच्या निरपेक्ष सेवेची अशी सत्यप्रचिती तुकारामाबरोबर इतर भक्तांनाही आली. अशी गुरूसेवा करण्याचा संकल्प आपण करूया. जय गजानन! श्रीगजानन ।।

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या