सर्च-रिसर्च: मोठ्याने वाचाल तर वाचाल!

महेश बर्दापूरकर
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कॅनडामधील वॉटरलू विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ कोलिन मॅकलॉड यांनी मोठ्याने वाचणे आणि स्मरणशक्ती या विषयावर संशोधन केले असून, त्यामध्ये मोठ्याने वाचन केल्यास शब्द आणि ओळी अधिक चांगल्याप्रकारे लक्षात राहतात हे सिद्ध झाले.

कोरोनानंतरचा ‘न्यू नॉर्मल’ म्हणून शाळा ऑनलाइन सुरू झाल्या आहेत. शिक्षकांना वर्गात मोठ्याने ओरडून, प्रत्येकाला समजले असल्याची खात्री करत शिकवणे अवघड जाते आहे. एका संशोधनानुसार, तुम्ही मनातल्या मनात न वाचता मोठ्याने वाचल्यावर ते तुमच्या दीर्घकाळ स्मरणात राहते, तसेच गुंतागुंतीची वाक्ये समजून घेणे व लोकांमधील भावनिक बंध अधिक दृढ होण्यासाठीही त्याचा उपयोग होतो, असे समोर आले आहे. 

कॅनडामधील वॉटरलू विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ कोलिन मॅकलॉड यांनी मोठ्याने वाचणे आणि स्मरणशक्ती या विषयावर संशोधन केले असून, त्यामध्ये मोठ्याने वाचन केल्यास शब्द आणि ओळी अधिक चांगल्याप्रकारे लक्षात राहतात हे सिद्ध झाले. हा परिणाम लहान मुलांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात दिसत असला, तरी वृद्धांनाही त्याचा फायदा होतो. थोडक्यात, सर्वच वयोगटांसाठी मोठ्याने वाचणे फायद्याचे असल्याचे मॅकलॉड सांगतात. त्यांनी या प्रक्रियेला ‘प्रॉडक्शन इफेक्ट’ असे नाव दिले आहे. याचा अर्थ लिहिलेले शब्द मोठ्याने वाचल्याने स्मरणशक्ती वाढते. हा ‘प्रॉडक्शन इफेक्ट’ गेली दहा वर्षे अनेक अभ्यासांत स्पष्ट झाला आहे. ऑस्ट्रेलियातील सात ते दहा वयोगटातील मुलांना शब्दांची एक यादी दिली गेली व ती काहींना मनातल्या मनात तर काहींना मोठ्याने वाचायला सांगितली गेली. त्यानंतर केलेल्या चाचणीत मोठ्याने वाचलेल्या ८७ टक्के मुलांनी शब्द बिनचूक ओळखले, तर मनातल्या मनात वाचलेल्या ७० टक्के मुलांनीच ते बिनचूक ओळखले. असाच प्रयोग ६७ ते ८८ या वयोगटातील ज्येष्ठांवरही केला गेला. वृद्धांनी हे शब्द आठवायला सांगितल्यावर मोठ्याने वाचलेल्या २७ टक्के, तर मनातल्या मनात वाचलेल्या फक्त १० टक्के जणांना शब्द बिनचूक आठवले. मॅकलॉड यांना स्मरणशक्तीचा हा परिणाम काही आठवडे राहत असल्याचेही दिसून आले. मोठ्याने वाचण्याबरोबरच शब्द पुटपुटल्यास ते मोठ्याने म्हणण्यापेक्षा कमी काळ, पण मनातल्या मनात म्हणण्यापेक्षा अधिक काळ लक्षात राहतात, असेही संशोधन सांगते. इस्राईलमधील एरिअल विद्यापीठातील संशोधकांनी बोलण्याची समस्या असलेल्या किंवा उच्चार स्पष्ट नसलेल्यांना मोठ्याने वाचण्यास सांगितल्यावर त्यांची स्मरणशक्ती वाढत असल्याचे दिसून आले. ‘‘मोठ्याने वाचनातून स्मरणशक्ती विषयक समस्या लवकर समजतात व त्यांवर वेळेत उपचार होतात. मोठ्याने वाचलेले शब्द स्मरणशक्तीचा आधार ठरतात,’’ असे मॅकलॉड सांगतात.

आपल्याला वेगळ्या, विचित्र व आपला थेट सहभाग असलेल्या घटना मोठ्या कालावधीनंतरही चांगल्या आठवतात. तुम्हाला एखादा प्रश्न विचारून त्याद्वारे शब्द तयार करण्यास सांगितल्यास तो चांगला लक्षात राहतो. याला ‘जनरेशन इफेक्ट’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे तुम्हाला एखादी सूचना देऊन शब्द ओळखण्यास सांगितल्यासही तो चांगला लक्षात राहतो. शब्द लक्षात ठेवण्याचा आणखी चांगला मार्ग म्हणजे अभिनय करणे. उदा. बाउन्सिंग अ बॉल हा शब्द चेंडू जमिनीवर आपटत म्हणल्यास तो चांगला लक्षात राहतो. याला ‘एनॅक्टमेंट इफेक्ट’ असे म्हणतात. ‘जनरेशन’ आणि ‘एनॅक्टमेंट’ हे ‘प्रॉडक्शन’ इफेक्टच्या जवळ जाणारे आहेत. ते शब्दाला एखाद्या घटनेशी जोडून तो लक्षात ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर दुसऱ्याने आपल्यासाठी मोठ्याने वाचणेही स्मरणशक्तीसाठी फायद्याचे ठरते, असे इटलीमधील पेरुगिया विद्यापीठातील संशोधनात आढळले. काही विद्यार्थ्यांनी कादंबरीतील उतारे डिमेन्शिया असलेल्या वृद्धांसाठी ६० सत्रांमध्ये वाचले. प्रत्येक सत्रानंतर या वृद्धांच्या स्मरणशक्तीच्या चाचण्या अधिक चांगल्या होत गेल्या. याचे कारण त्यांनी गोष्टी वाचताना स्वतःची स्मरण व कल्पनाशक्ती वापरून आपल्या अनुभवातून घटनांचा क्रम लावण्याचा प्रयत्न केला. गोष्टी ऐकण्यातून त्यांच्या मेंदूत माहितीचे खोलवर आणि तीव्र पृथःकरण झाले असावे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. थोडक्यात, तुम्ही मजकूर मोठ्याने वाचल्यास शब्द लक्षात ठेवण्यास व स्मरणशक्ती वाढण्यास त्याची मदत होईल.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या