सर्च-रिसर्च: आर्सेनिक प्रदूषणाचे पूर्वानुमान

सम्राट कदम
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

भूपृष्ठातील खडकांमध्ये आढळणारे आर्सेनिक हे मूलद्रव्य मुळातच विषारी आहे. त्यामुळे पाण्याबरोबरच ते हवा आणि जमिनीचेही प्रदूषण करते. जास्त काळ खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या माध्यमातून आर्सेनिकशी संपर्क आल्यास त्याचे दुष्परिणाम शरीरावर जाणवतात. भारतासह बांगलादेश, चिली, चीन, अमेरिका, मेक्‍सिको आदी ५० देशांमधील सुमारे १४ कोटी लोक या समस्येचा सामना करत आहेत.

मानवी जीवनासाठी अत्यावश्‍यक असलेल्या पाण्यात दूषित आणि विषारी घटक मिसळले गेल्यास आपल्याभोवती विविध आजारांचा विळखा पडतो. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. उत्तर भारतात विशेषतः गंगेच्या खोऱ्यातील भूजलामध्ये आर्सेनिक हा रासायनिक पदार्थ आढळतो. हॅंडपंपाद्वारे पाणी उपसून ते पिणारे या प्रदेशातील नागरिक अनेक वर्षांपासून आर्सेनिकयुक्त पाणी, तसेच त्याचा वापर करून घेतल्या जाणाऱ्या फळभाज्या आणि मांसाहाराच्या दुष्परिणामांचा सामना करत आहेत. या पाण्यामुळे त्वचेचा कर्करोग, जखमा, शिशुमृत्यू, गर्भपात, हृदयविकार अशा समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. यावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने उपाय शोधण्याचे काम खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) केले आहे.  

भूपृष्ठातील खडकांमध्ये आढळणारे आर्सेनिक हे मूलद्रव्य मुळातच विषारी आहे. त्यामुळे पाण्याबरोबरच ते हवा आणि जमिनीचेही प्रदूषण करते. जास्त काळ खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या माध्यमातून आर्सेनिकशी संपर्क आल्यास त्याचे दुष्परिणाम शरीरावर जाणवतात. भारतासह बांगलादेश, चिली, चीन, अमेरिका, मेक्‍सिको आदी ५० देशांमधील सुमारे १४ कोटी लोक या समस्येचा सामना करत आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच पालेभाज्या, फळे, मासे, मांस आदी खाद्यपदार्थांच्या माध्यमातूनही आर्सेनिक शरीरात जाऊ शकते. औद्योगिक क्षेत्रातही आर्सेनिकचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. काच, कागद, धातूनिर्मितीच्या कारखान्यांतून बाहेर पडणारे सांडपाणी आणि इतर प्रदूषक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्सेनिक असू शकते. अशा विविध माध्यमांतून माणसांचा आर्सेनिकशी संपर्क येतो. साधारपणे प्रति लिटरला दहा मायक्रोग्रॅमपेक्षा कमी आर्सेनिक मानवी शरीराला सहन होते. त्यापेक्षा जास्त आर्सेनिक मानवी शरीराला घातक ठरते. आर्सेनिकचा परिणाम केवळ एका व्यक्तीवर नाही, तर मोठ्या समूहांवरही होतो. म्हणून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे आणि आर्सेनिक प्रदूषणाचे पूर्वानुमान बांधणे गरजेचे आहे. हाच प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञांनी या संशोधनाच्या माध्यमातून केला आहे.     

कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान  
पिण्याच्या पाण्यातील आर्सेनिकच्या प्रदूषणाचे पूर्वानुमान करण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला. यासाठी पर्यावरण, भूविज्ञान आणि मानवी हालचालींचा अभ्यास करण्यात आला. माहितीच्या आधारावर विकसित करण्यात आलेल्या या यंत्रणेमुळे आर्सेनिकच्या प्रदूषणाची माहिती तर मिळालीच; पण त्याचबरोबर त्यातून पसरणाऱ्या आजारांचेही पूर्वानुमान करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. गेल्या कित्येक वर्षांपासून गंगेच्या मैदानी प्रदेशातील भूजलाचे सर्वेक्षण शास्त्रज्ञ करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने विविध ठिकाणच्या पाण्याचे नमुने आणि आर्सेनिकचा प्रमाणाचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच, आर्सेनिकच्या प्रदूषणामुळे परिणाम झालेल्या लोकसंख्येची नोंदही यात घेण्यात आली आहे. भूपृष्ठाची जाडी आणि जलसिंचनाची व्यवस्था यांच्यातील सहसंबंध सिद्ध करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

पश्‍चिम बंगालमधील २५ जिल्ह्यांपैकी १९ जिल्ह्यांमधील भूजलामध्ये आर्सेनिकचे प्रमाण धोकादायक पातळीइतके आढळून आले आहे. यामुळे तब्बल तीन कोटी लोकांवर परिणाम झाल्याचे ‘आयआयटी’तील शास्त्रज्ञ आणि प्रमुख संशोधक डॉ. मधुमिता चक्रवर्ती यांनी सांगितले. पश्‍चिम बंगालमधील आर्सेनिकच्या स्रोतांचा शोध घेऊन माहितीचे संकलन करण्यात आले आहे. त्या आधारावर विकसित करण्यात आलेली ही यंत्रणा आता देशातील विविध भागांमध्ये बसविण्यात येणार आहे. यासंबंधीचे संशोधन ‘सायन्स ऑफ दी टोटल एन्व्हायरन्मेंट’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. देशातील सर्वसामान्य माणसांचे जीवन सुसह्य करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरेल. शास्त्रज्ञांचे हे कार्य निश्‍चितच अभिनंदनीय आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या