सर्च-रिसर्च: रुजवू पाणी वापराची संस्कृती

योगिराज प्रभुणे
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

पाश्‍चात्त्य प्रगत देशांमध्ये प्रत्येक नागरिकाला पिण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ पाणी मिळते. पण, विकसनशील देशांतील ८६ टक्के नागरिकांपर्यंतच पिण्याचे स्वच्छ पाणी आत्तापर्यंत पोचले आहे.

पाण्याला जीवन असे म्हटले जाते आणि ते योग्यही आहे. पृथ्वीचा दोनतृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. पण, त्यापैकी फक्त ०.००२ टक्के इतकेच पिण्याचे पाणी आहे. पाश्‍चात्त्य प्रगत देशांमध्ये प्रत्येक नागरिकाला पिण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ पाणी मिळते. पण, विकसनशील देशांतील ८६ टक्के नागरिकांपर्यंतच पिण्याचे स्वच्छ पाणी आत्तापर्यंत पोचले आहे. ग्रामीण भागात आजही १४ टक्के नागरिक पाणवठ्यावरचे पाणी जसे आहे तसेच पितात. पाण्याचे शुद्धीकरण, त्याचे निर्जंतुकीकरण या प्रक्रिया त्यांच्यापासून कोसो दूर आहेत. भारतासारख्या मोसमी पर्जन्यमानाच्या देशासाठी पाण्याचा एकमेव स्रोत म्हणजे पाऊस. याच पावसावर पिकांचे नियोजन होते. त्यातूनच धरणे भरतात. जूनच्या पहिल्या सरीपासून धरणांत साठणाऱ्या पावसाच्या पाण्याकडे प्रत्येकाचे लक्ष लागलेले असते. कारण, त्यातूनच पुढील वर्षभर पिण्याच्या पाण्याची, उद्योगांची आणि शेतीची गरज पूर्ण होणार असते. इतकेच काय; पण आपल्या घरात येणाऱ्या विजेची निर्मितीही याच धरणांवरील जलविद्युत प्रकल्पातून होते. पाऊस चांगला झाला, तरच चांगली पिके येतात. त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळते. उद्योगांची चक्रे फिरण्याची खरी ‘ऊर्जा’ याच मोसमी पावसातून मिळते. 

प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर
देशात गेल्या काही वर्षांपासून पावसाचा ‘पॅटर्न’ बदलत असल्याचे निरीक्षण हवामानशास्त्रज्ञ वारंवार नोंदवत आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात गेल्या वर्षी एकामागोमाग एक अशी आठ चक्रीवादळे निर्माण झाली. भारतीय समुद्रांत यापूर्वी शंभर वर्षांमध्ये अशी चक्रीवादळे निर्माण झाली नव्हती. त्याचा थेट परिणाम मॉन्सूनवर होतो. अशा वातावरणाशी संबंधित घटना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत घडताना दिसतात. त्यातून अशा दुर्घटनांची शृंखला तयार होताना दिसते. केदारनाथ, माळीण, कोल्हापूर-सांगलीचा महापूर, कमी वेळेत मुसळधार पाऊस पडून पुण्यात अनेक सोसायट्यांमध्ये शिरलेले पाणी या सगळ्या याच शृंखलेच्या कड्या आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात आपल्याला पाण्याची किमान हमी मिळण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ही वेळ आहे. सध्या देशातील १२३ जलाशयांमध्ये १४२.२३४ अब्ज घनमीटर इतका पाणीसाठा आहे. साठवणूक क्षमतेच्या ८३ टक्के हे जलाशय यंदा भरल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे. दर वर्षी याच प्रमाणे धरणे काठोकाठ भरतात आणि मार्च-एप्रिलपर्यंत कोरडी ठणठणीत होतात. इतके भरमसाट पाणी आपण वापरतो. आता वेळ आली आहे ती धरणाच्या पाण्यावरचे अवलंबित्व कमी करण्याची!   

पावसाळी पाण्याचा संचय (रेनवॉटर हार्वेस्टिंग), मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) अशा माध्यमांतून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करण्याची वेळ आता आली आहे. घर असो की सोसायटी, त्यांच्या छतावर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब वाचला पाहिजे. ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हा त्यावरचा प्रभावी उपाय. हे काम फक्त सरकारी यंत्रणांकडून होणार नाही, तर लोकांनीही पुढे येऊन त्यात सहभागी झाले पाहिजे. त्यातून पावसाच्या पाण्याचा एकही थेंब रस्त्यावर वाहून जाणार नाही किंवा समुद्राला जाऊन मिळणार नाही, अशी व्यवस्था सुरुवातीला शहरा-शहरांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यानंतर ती तालुका आणि गावांपर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. पाणीपुरवठा ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असली, तरीही पावसाचा प्रत्येक थेंब साठवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. त्यातून हजारो लिटर पाणी आपल्या घरात, सोसायटीत साठवता येईल. परिणामी, काही दिवस तरी धरणाच्या पाण्याचा उपसा कमी होईल. पिण्याच्या पाण्याचे हे दुर्भिक्ष मनुष्यनिर्मित आहे. त्यातून आपणच मार्ग काढला पाहिजे. पाऊस चांगला झाला, तरी पाण्याची उधळपट्टी करून चालणार नाही. पाण्याच्या योग्य वापराची संस्कृती रुजविणे, ही काळाची गरज आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या