सर्च-रिसर्च: मधमाश्यांचे विष रोखेल कर्करोग

सुरेंद्र पाटसकर
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

ऑस्ट्रेलियातील ‘हॅरी परकिन्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च’ने मधमाश्यांमधील विषाचे गुणधर्म तपासून त्याचा वापर कर्करोगावरील औषधासाठी करण्यात येऊ शकेल, असा दावा केला आहे.

कर्करोग असा एक रोग आहे, की त्यावर रामबाण उपाय सापडलेला नाही. विविध प्रकारच्या प्रयोगांतून कर्करोगावरील औषधे व उपचार शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. ऑस्ट्रेलियातील एका संशोधन संस्थेने नव्या संशोधनाद्वारे कर्करोगावरील औषध तयार करण्यासाठी आश्वासक पाऊल टाकले आहे.

ऑस्ट्रेलियातील ‘हॅरी परकिन्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च’ने मधमाश्यांमधील विषाचे गुणधर्म तपासून त्याचा वापर कर्करोगावरील औषधासाठी करण्यात येऊ शकेल, असा दावा केला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ, तसेच आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये आढळणाऱ्या ३१२ मधमाश्यांमधील विषाचा उपयोग करून डॉ. सिएरा डफी यांनी ट्रिपल निगेटिव्ह प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगावर औषध विकसित करण्यात यश मिळविले आहे. हे संशोधन ‘जेएनपी नेचर प्रिसिजन ऑन्कोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. संशोधनाबाबत डॉ. डफी म्हणाल्या, मधमाश्यांच्या विषामध्ये  विशेषतः मेलिटीन या संयुगात कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत का, हे तपासण्याचा मूळ प्रकल्प होता. कोणत्या प्रकारच्या कर्करोगाची वाढ थांबविण्यासाठी या दोन्ही गोष्टींचा उपयोग होऊ शकतो हे तपासण्यात आले. मधमाश्यांच्या विषाची अशी चाचणी अशा प्रकारे यापूर्वी झालेली नव्हती. सर्वसामान्य स्तनातील पेशी आणि कर्करोग झालेल्या स्तनातील पेशींवर मधमाश्यांच्या विषाची चाचणी घेण्यात आली. एईआर-२ या जनुकांचे प्रमाण जास्त असल्याने होणारा आणि ट्रिपल निगेटिव्ह प्रकारात मोडणाऱ्या कर्करोगावर त्याचा परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले. मधमाश्यांच्या विषातील घटक असलेले मेलिटीन प्रयोगशाळेत तयार करता येणे शक्य आहे. अशा प्रकारे तयार केलेल्या संयुगातही कर्करोगविरोधी गुण दिसले. मधमाश्यांच्या विषाच्या विशिष्ट प्रमाणातील वापरामुळे कर्करोगाच्या सर्व पेशी मरत असल्याचे, त्याचवेळी इतर पेशींचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे आढळून आले. मेलिटीनद्वारे कर्करोगाच्या पेशींचे बाह्यकवच ६० मिनिटांत उद्ध्वस्त केले जात असल्याचे अभ्यासावेळी दिसून आहे. याशिवाय कर्करोगाच्या पेशींची वाढही मेलिटीनद्वारे रोखली गेल्याचे प्रयोगादरम्यान दिसून आले. ही वाढ रोखण्यासाठी केवळ २० मिनिटांचा कालावधी लागला, असा दावा संशोधकांनी केला आहे. कर्करोगाच्या पेशींकडून इतर पेशींकडे रासायनिक संदेश पाठविले जातात; ते संदेश यामुळे रोखले गेल्याचा दावाही संशोधकांनी केला.

स्तनाच्या कर्करोगामध्ये ट्रिपल निगेटिव्ह म्हणजे टीएनबीसीचे प्रमाण १० ते १५ टक्के आहे. टीएनबीसीवर सध्यातरी कोणताही ठोस उपाय नाही. केमोथेरपीमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांबरोबर मेलिटीनचा उपयोग केला, तर त्याची परिणामकारकता अधिक होईल, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मेलिटीनमुळे कर्करोगाच्या पेशींचे आवरण तोडणे शक्य होते. त्यानंतर केमोथेरपीमध्ये वापरण्यात येणाऱ्या डेसिटेक्सेल या औषधाचा वापर केल्यास कर्करोगाच्या गाठींची वाढ रोखली जाऊ शकते. उंदरांमध्ये अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. जगभरात फुप्फुसाच्या कर्करोगापाठोपाठ सर्वाधिक रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे आहेत. गेल्या वर्षी दोन्ही प्रकारच्या कर्करोगांचे रुग्ण जगभरात प्रत्येकी सुमारे २० लाख होते. जगभरातील सातपैकी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाची लागण झाल्याचे अभ्यासांतून दिसून आले आहे. यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या महिलांचे प्रमाणही १३.७ टक्के आहे. 

नोंद घेण्यासारखे

  • जगभरातील सातपैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग
  • महिलांमध्ये ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण १० ते १५ टक्के
  • मधमाश्यांच्या विषापासून तयार केलेल्या औषधाचा उपयोग स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी शक्य
  • केमोथेरपीच्या औषधांसोबत मेलिटीनचा वापर केल्यास परिणामकारकता वाढत असल्याचे निरीक्षण

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या