जागर

Kishor Shantaram shet Mandrekar
बुधवार, 10 जून 2020

कोरोनाचा प्रसार काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. रुग्णांची संख्याही वाढतच आहे. राज्यात तर तीनशेच्या पार रुग्ण पोचले आहेत. ४ टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर पाचव्या टप्प्यात अनलॉक सुरू झाले. जवळजवळ सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत. लोकांची वर्दळही वाढत आहे. गजबजाटाचा अनुभव ६०-७० दिवसांनंतर आपण अनुभवत आहोत.

स्वत:वरच हवे नियंत्रण

कोरोनाचा प्रसार काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. रुग्णांची संख्याही वाढतच आहे. राज्यात तर तीनशेच्या पार रुग्ण पोचले आहेत. ४ टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर पाचव्या टप्प्यात अनलॉक सुरू झाले. जवळजवळ सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत. लोकांची वर्दळही वाढत आहे. गजबजाटाचा अनुभव ६०-७० दिवसांनंतर आपण अनुभवत आहोत. कोरोनाचा धोका काही कमी झालेला नाही. उलट राज्यात आता रुग्ण पसरत आहेत. समूह संक्रमण नसले तरी इकडून-तिकडे रुग्ण पोचत आहेत. यातून उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यात आणि दक्षिण गोव्यातून उत्तर गोव्यात रुग्ण बाधित होत आहेत. एका ठिकाणी कामाला असणाऱ्या विविध ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत आहे. इतरांसाठी काम करणारे हे कोविड योध्दे, त्यांच्यापैकी काहीजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पण त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने आपली सेवा सुरू ठेवली आहे. कर्तव्यात कसूर होणार नाही, याकडे त्यांचा कटाक्ष आहे. अशा योद्‍ध्‍यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी राहायला हवे. त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना धीर द्यायला हवा. कोरोनाविरोधातील लढा लढण्यात या सर्वांचा मोठा वाटा आहे.
वास्कोतील मांगोर हिलने बराच इंगा दाखवला आहे. तिथे सुरू झालेली रुग्णांची संख्या मारूतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच आहे. शंभर, दोनशे आणि आता तीनशे रुग्णांपर्यंत... बापरे बाप... पुढे होणार कसे? राज्य ग्रीन झोनमध्ये आल्यावर सर्व काही सुरळीत होईल. सगळे काही आटोक्यात आहे अशी स्थिती असताना आता चिंता आणखी वाढली आहे. आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही कमी होत नाही. उपचारासाठीची यंत्रसामग्री अधिक हवी असल्याने सरकारदरबारी धावपळ सुरू झाली आहे. कोविड इस्पितळे वाढवावी लागणार आहेत. मडगावातील ईएसआय इस्पितळ सर्व रुग्णांना सामावून घेऊ शकत नसल्याने अशा आणखीन तीन केंद्रांची गरज लागणार आहे. शिरोड्यातील आरोग्य केंद्रात व्यवस्था करायचे ठरवले तर तिथे लोकांनी विरोध केला. लोक असा विरोध करू लागले तर रुग्णांना ठेवायचे कुठे, असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. काही भागात संशयितांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेलमध्ये आणण्यासही लोकांनी विरोध केला. पेडणेतील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालयात चाचणी केंद्र सुरू करण्यासही विरोध झाला. सगळीकडूनच विरोध व्हायला लागला तर रुग्णांचे हाल होतील. हे रुग्ण आपल्या गोव्यातल्याच कोणाचे तरी सगेसोयरे आहेत, नातलग आहेत हे लक्षात ठेवायला हवे. ते संशयित असतील किंवा सुरक्षितता म्हणून त्यांना क्वारंटाईन केले जात असेल तर त्यांची काही चूक नाही. ते ज्या स्थितीतून जात आहेत ते पाहिले तर अशा लोकांना आपण सर्वांनी मानसिक आधार देण्याची आवश्‍यकता आहे. काही जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतात. पण इतरांना संशय नको, उगाच रिस्क नको म्हणून जी सुरक्षितता बाळगली जाते त्यासाठी त्यांना क्वारंटाईन केले जाते. तसे केले नाही तरीही लोक नाराज होतात. सरकार काही करत नाही, असे म्हणतात.
आता अनलॉक झाल्याने सारे काही सुरू आहे. सरकारसुध्दा किती दिवस बंद ठेवणार आणि लोकांना मर्यादा घालून देणार? असे करता येत नाही. जगात असे घडत नाही. विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा सगळे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मोकळीक द्यावीच लागते. जगाचा हा रहाटगाडा सुरू राहायला हवा. प्रत्येकाला आपल्याला मोकळीक हवी. मुक्त वातावरण हवे. इतरांनाही ते हवे असते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळेच काही कोलमडले आहे. आता रुग्ण संख्या वाढल्याने लोकांनी धास्ती घेतली आहे. पण कामावर गेल्याशिवाय रोजीरोटी मिळणार नाही, दुकानदारांनी दुकानात गेल्याशिवाय धंदा होणार नाही. हे अर्थचक्र गतिमान होण्यासाठी सर्वच कामे सुरू व्हायला हवीत. सध्या हळूहळू या गोष्टी घडत आहेत. धोका आहेच, पण असा धोका पत्करल्याशिवाय आपण सावरू शकत नाही, हे प्रत्येकाला माहीत आहे. म्हणूनच आपण पुरेशी काळजी घेतली आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला तर सर्व काही सुरळीत होऊ शकते. सरकारने बंधने उठवली, लोकांना मोकळीक दिली आणि सरकार मोकळे झाले. रुग्ण मात्र वाढत आहेत. याला केवळ सरकारला जबाबदार कसे धरणार? सोशल मीडियावर सरकारला नेटिझन्सनी आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवले आहे. सरकारचीच चूक आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. अनलॉकनंतर कोरोनाचा प्रसार वाढला आहे, रुग्णही अधिक सापडत आहेत. याला परिस्थिती जबाबदार आहे. सरकारने सारे काही खुले केले तरी कोरोना काही दूर पळालेला नाही. तो आहेच. त्याचा मुकाबला सर्वांना करावा लागणार आहे. सरकारने बंधने घातली तेव्हा अती झाले म्हणणारे आता बंधने खुली केली तरीही दोष देत बसतात. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. त्यासाठी सरकारचे नियम, बंधने कशाला हवीत? आपण स्वत:वर काही बंधने लादल्यास कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. आपण प्रत्येक बाबतीत काळजी घेतली तर धोका टळू शकतो. कारणाशिवाय आपण बाहेर फिरण्याचे टाळावे. आता मॉल, हॉटेल्स सुरू झाली आहेत. लोक गर्दी करतील. पण आपण सुरक्षित अंतर राखले तर कोरोनाला अंतरावर ठेवू शकतो. सरकारने आता गोव्यात येणाऱ्यांसाठी ऐच्छिक चाचणी केली आहे. मात्र क्वारंटाईन सक्तीचे केले आहे. एक तर घरी राहावे किंवा चाचणी करून अहवाल येईपर्यंत संस्थात्मक क्वारंटाईन व्हावे, असे सरकारने सुचवले आहे. यावरूनही नाराजी पसरली आहे. नाराजी एवढ्यासाठीच की रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना सरकार चाचण्यांवर भर देत नाही. त्या कमी करीत आहे. यातून संशयितांना त्रास होऊ शकतो. पण सरकारकडे मोठ्या संख्येने चाचण्या करण्यासाठी यंत्रणा नाही, तेवढे मनुष्यबळ नाही. आहे त्यातच सर्व काही करायचे आहे. म्हणून सरकारने ज्यांना लक्षणे दिसतील त्यांच्यावर आणि पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दहा वर्षांखालील मुले, गर्भवती तसेच ज्यांना आजारपण आहे अशांवरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र चाचण्या अधिक कराव्यात आणि लोकांकडे आरोग्य खात्याने मोर्चा वळवावा, अशी मागणी केली आहे. अर्थात, सरकार काही ही मागणी मान्य करण्याच्या मन:स्थितीत नाही. कारण सरकारला आपल्या मर्यादा ठाऊक आहेत. ज्या काही चाचण्या घेतल्या जात आहेत, त्यांचे अहवाल येण्यास विलंब लागतो. अहवाल खोळंबून राहण्यापेक्षा मर्यादित चाचण्या झाल्या आणि त्या विशिष्ट रुग्णांचा वर्ग ‘फोकस’ करून झाल्या तर अहवालही लवकर येतील आणि उपचारही अधिक गतीने होण्यास मदत मिळेल. सरकारच्या आवाक्याबाहेर काही गोष्टी आहेत याचाही लोकांनी विचार करायला हवा. सारे काही सरकारच्या भरोशावर राहून होणार नाही. यासाठी प्रत्येकाला स्वत:ची जबाबदारी स्वत:च घ्यावी लागणार आहे. ही खबरदारी घेतली तर बरेचसे प्रश्‍न सुटतील. सरकारनेही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडायला हवी, लोकांना विश्‍वासात घ्यायला हवे. कोरोनाविरोधातील लढा हा लोकांच्या सहभागातून अधिक प्रभावीपणे लढला जावू शकतो आणि त्यात यश लवकर मिळू शकते. सरकारने म्हणूनच लोकांमध्ये अधिक जागृती करायला हवी. लोकांनीही सरकारला सहकार्य करायला हवे. कोरोनाचा मुकाबला करणे सहज शक्य आहे हे आता सिध्द होत आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. गोव्यात सुदैवाने सर्व रुग्ण बरे होत आहेत. त्यांच्यावर फार उपचार करावे लागलेले नाहीत, असे सरकार आणि आरोग्य खातेही सांगते. याचाच अर्थ गोमंतकीय जनता कोरोनाला पिटाळून लावण्यात यशस्वी ठरत आहे. आपण जर निश्‍चय केला तर कोरोना आपल्यापासून दूर जाईल. स्वयंशिस्त आणि सामाजिक अंतर राखले तर कोणालाही घाबरायचे कारण नाही.

संबंधित बातम्या