शस्त्रहीन क्रांतीचे जनक युगपुरुष गांधीजी

शंभू भाऊ बांदेकर
शनिवार, 30 जानेवारी 2021

एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी जगातील अनेक वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आणि अन्य सामाजिक संस्थांनी जगाच्या इतिहासावर नि एकूणच विचारी सद्‍वर्तनी अशा जीवन पध्दतीवर सर्वाधिक प्रभाव पाडलेल्या व्यक्तींची नावे प्रकाशित केली होती. त्यापैकी जवळजवळ सर्व याद्यांमध्ये प्रथम पाच व्यक्तींच्या नावात महात्मा गांधीजींचा समावेश होता. 

एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी जगातील अनेक वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आणि अन्य सामाजिक संस्थांनी जगाच्या इतिहासावर नि एकूणच विचारी सद्‍वर्तनी अशा जीवन पध्दतीवर सर्वाधिक प्रभाव पाडलेल्या व्यक्तींची नावे प्रकाशित केली होती. त्यापैकी जवळजवळ सर्व याद्यांमध्ये प्रथम पाच व्यक्तींच्या नावात महात्मा गांधीजींचा समावेश होता. 

शस्त्रहीन क्रांतीचे जनक म्हणून जगविख्यात या भारतीय युगपुरुषाचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान वाटावा, अशीच ही गोष्ट म्हणावी लागेल. मोहनदास करमचंद गांधी नावाचा एक सामान्य माणूस जगाला वंदनीय ठरला तो त्यांनी अंगिकारलेल्या तत्त्वांमुळे. सत्य, अहिंसा, शांती, प्रेम आणि करूणा ही पंचतत्वे त्यांनी आपले जीवनकार्य ठरविले. तसेच स्वच्छता, दीन-दलित, पीडित, शोषित समाजाचे उन्नयन व प्रामाणिकपणा सोबतीला होताच. या साऱ्यांची सुरुवात त्यांनी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जोखडातून स्वतंत्र करण्यासाठी केला.

विशेषतः या चळवळीत झोकून देताना त्यांनी अहिंसा व सत्याग्रह ही दोन शांततावादी तत्त्वे बाळगून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे आहे व हे करत असताना आपल्याला साऱ्या जगाला विश्वशांतीचा संदेश द्यायचा आहे, असे सांगून देशातील सामान्यांपासून असामान्य जनतेपर्यंत प्रचार आणि प्रसाराची मोहीम उघडली. हे असिधाराव्रत देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालू राहिले आणि त्यामुळेच जागतिक कीर्तीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला, जॉन केनेडी, बराक ओबामा त्यांचे अनुयायी बनले व जगात शांतता नांदावी जग निशस्त्र क्रांतिने एकत्र यावे यासाठी आपापल्या काळात शर्थीचे प्रयत्न केले. महात्मा गांधींची ही किमया पाहून तर जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन चकितच झाले आणि ते उद्‍गारले, ‘आजपासूनच्या तिसऱ्या पिढीतील लोकांचा या पृथ्वीतलावर मोहनदास करमचंद गांधी नावाची हाडामासाची व्यक्ती प्रत्यक्ष जगून गेली यावर विश्र्वास देखील बसणार नाही.’

गांधीजींच्या या शस्त्रहीन क्रांतीला किंवा त्यांच्या सत्याग्रह व अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्य मिळवण्याच्या कार्याला विरोधही भरपूर झाला होता. ज्याप्रमाणे गांधीजींच्या मार्गाने जाणारे मवाळ देशभक्त होते. त्याचप्रमाणे शस्त्राविना स्वातंत्र्य कुणा मिळाले? असा खडा सवाल करणारे जहाल देशभक्तही होते. यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आदि जाज्वल्य क्रांतिकारक होते. त्यांनी आपापल्या अनुयायांसह अथक परिश्रमही चालविले होते. याकामी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा तर भोगावी लागलीच. पण आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या नेताजींचा दुर्दैवी मृत्यूदेखील परदेशात विमान अपघातात झाला. सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्ग अवलंबणारे काय किंवा सशस्त्र क्रांतिचा झेंडा घेऊन पुढे सरसावलेले देशाभिमानी काय, त्या सर्वांनी न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने या तळमळीने आणि जिद्दीनेच तळहातावर शिर घेऊन स्वातंत्र्यलढ्यात उतरले होते. मार्ग भिन्न होते. पण साध्य एकच होते. ते म्हणजे देशाला स्वतंत्र करणे.

दरम्यान, आधी स्वराज्य मग सुराज्य, तथा आधी सुराज्य मग स्वराज्य हा वादही तावातावाने चर्चिला जात होता. गांधीजींनी मात्र ही मोहीम दोन्ही आघाड्यांवरून लढवायचे ठरवले होते. एका बाजूने त्यांचे अनुयायी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. तर त्यांचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांनी स्वतःला भूदान चळवळीत झोकून दिले होते. आपल्या अनुयायांसह भूमिहिनांना जमिनीचा तुकडा मिळावा म्हणून देशभर ते पायी दौरा करीत होते. गांधीजींनी स्वतःला अस्पृश्‍यता निवारणाच्या कार्यात व स्वच्छता मोहिमेत झोकून दिले होते. खेड्यापाड्यातील अडाणी, अज्ञानी, अशिक्षित लोकांना स्वेच्छेचे महत्त्व सांगून आपला वाडा, आपला गाव स्वच्छ करण्याचे आवाहन करत होते. अंगावरचा कपडा फाटका असला तरी चालेल पण तो स्वच्छ असला पाहिजे. आंघोळीला साबण नसला तरी चालेल पण, नेहमी आंघोळ केली पाहिजे.

आपला परिसर स्वच्‍छ ठेवायला दुसऱ्या माणसांची काय गरज? आपण मिळून तो परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. गावचा रस्ता, नाला, ओहोळ हे आपण श्रमदानाने स्वच्‍छ करायला शिकले पाहिहजे. आपण जी घाण करताे, ती स्वच्छ करायला दुसरी माणसं कशाला? असा सवाल करीत त्यांनी भंगी-मुक्ती आपल्यापासूनच सुरू केली. स्वतःच्या हातात झाडू, पाण्याची बादली घेवून त्यांनी दुसऱ्यांचे संडास स्वच्‍छ करण्याचे काम केले. यात त्यांच्या अनुयायांनाही पहिल्यांदा किळस वाटायची. दुसऱ्यांचे मल-मूत्र काढण्यास कुणाला बरे आनंद वाटेल? पण हळूहळू त्यांच्या अनुयायांच्या सगळे अंगवळणी पडत गेले आणि खऱ्या अर्थाने भंगीमुक्ती चळवळ यशस्वी झाली. आणि मग हा साबरमतीचा संत खऱ्या अर्थाने अस्पृशोदारक ठरला. 

गांधीजींनी स्वतःच स्वच्छतेचा मार्ग स्वीकारला. कारण त्यांना स्वच्छतेच्या विषयाशी निगडीत शोषणाच्या व्यवस्थेची जाणीव प्रस्थापितांना करून द्यायची होती. त्यामुळे आधी आपण केले अन् मग दुसऱ्यांना सांगितले या कृतीने ते वागले. या त्यांच्या कृतिशीलतेमुळे ते सर्वांना आपले ‘बापू’ वाटू लागले. या स्वच्छतेच्या संबंधाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे एक उदाहरण द्यावेसे वाटते. २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत देशातील सर्व राज्ये हागणदारीमुक्त व्हावीत, असे सक्त निर्देश पंतप्रधानांनी दिले होते. त्या अनुषंगाने काही राज्यांनी हागणदारीमुक्त प्रदेश जाहीर केले होते. याबाबत गोव्यातील नगरपालिकांनी एक पाऊल पुढे टाकताना आपापले क्षेत्र १०० टक्के हागणदारीमुक्त जाहीर केले. पालिका क्षेत्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या घराच्या ठिकाणापासून पाचशे मीटरमध्ये शौचालय उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला होता. पण दुर्दैव म्हणजे काही ठिकाणी नैसर्गिक विधी उघड्यावरच केला जातो. असे अनेकदा आढळून येते. 

गांधीजींनी सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी त्यांना निरोगी आरोग्य प्रदान व्हावे, यासाठी नैसर्गिक चिकित्सा सिध्दांतही अंमलात आणला होता. आजच्या कोरोना विषाणूच्या महामारीने लाखो लोक दगावले. कोट्यवधी लोक रुग्णशय्येवर आहेत. हे जागतिक चित्र नजरेखाली घातले तर गांधीजींचा नैसर्गिक चिकित्सा सिध्दांत आजही किती मौलिक आहे, याची खात्री पटते. यामध्ये शक्यतो शाकाहारी जेवण करावे. ज्या-त्या मौसमातील ताज्या भाज्या, फळे, पिके यांचा अवलंब करावा, पोटाला लागेल त्यापेक्षा दोन घास कमी खावेत. न पचणारे किंवा जड अन्न घेऊ नये. स्वच्छता राखावी, निसर्गाच्या सानिध्यात रहावे, अशा वरवर साध्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या गोष्टी प्रतिपादन केल्या होत्या. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व मानवजात एक आहे.

त्या सर्वांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तिन्ही गोष्टींचा सारखाच लाभ मिळाला पाहिजे व त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ते आपले प्रथम कर्तव्य मानले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. अत्यंत साध्या वाटणाऱ्या गोष्टींपासून, शस्त्रहीन क्रांतीपर्यंत झेप घेणारे महात्मा गांधीजी आपल्या देशाचे राष्ट्रपिता बनले व त्यांच्या क्रांतिशील कार्यकर्तृत्वामुळे, नेतृत्वामुळे ते युगपुरुष म्हणून नावाजले गेले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या