राष्ट्रहिताच्या नजरेतून: लोकप्रियतेचा पराभव अशक्य

शेखर गुप्ता
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

खरोखरच लोकप्रिय असलेल्या आणि जनतेशी थेट संपर्क असलेल्या भारतीय नेत्याला कधीही पराभूत करता येत नाही. म्हणूनच मोदी इतरांसाठी अजिंक्य आहेत आणि त्यांचा पराभव ते स्वतःच करू शकतात.

शंभराहून अधिक दिवसांचे लडाखमधील चिनी नाट्य, कोरोनाचा सहा महिन्यांचा काळ आणि गेल्या चार वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा उतरता आलेख या मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत आहे. मात्र, याचा लोकांना त्रास होतो आहे का, ते मोदींच्या विरोधात का जात नाहीयेत? मोदींनी त्यांच्यावर कोणती जादू केली आहे का? भारतीय राजकारण असेच आहे. लोकांना विचारा, तुम्हाला त्रास होतो का? ते ''हो'' असंच उत्तर देतील. पण मग ते मोदींना दोष देतात का? लॉकडाउनच्या काळात हजारो किलोमीटर चालत गेलेले मजूर, चीन बरोबरील भांडण, अर्थव्यवस्थेची घसरण, कोरोना विषाणू या कोणत्याही मुद्यावरून लोक मोदींना नाव ठेवायला तयार नाहीत. सत्तर वर्षांचा गोंधळ दूर करण्यास वेळ लागणारच, असं उत्तर मिळतं. 

तुम्ही मोदींचे टीकाकार असाल तर मी तुम्हाला चिडवत असल्याचे वाटेल. माझा उद्देश तोच आहे. राजकारण समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला वास्तव कितीही कटू असले तरी स्वीकारावेच लागेल. अर्थव्यवस्था अडचणीत असताना , सुरक्षेला आव्हान मिळाले असताना, अंतर्गत वाद असताना आणि संसर्गाचे थैमान सुरू असतानाही मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. हा काय प्रकार आहे? कुठेही जा, लोकांना विचारा- पुन्हा निवडणूक झाली तर ते कोणाला मतदान करतील? त्यांच्या समोर दुसरा पर्याय आहे का? या प्रश्नाच्या उत्तराने तुमची चिडचिड वाढू शकते. मग काय लोक असं का वागत आहेत.

मोदींना कसे पराभूत करता येईल, यावर अनेक विचारवंतांनी काथ्याकूट केला आहे. असेच करा, तसेच करा वगैरे. सर्व विरोधकांनी एकत्र येणे ही जुनीच खेळी आहे. मात्र मोठी लोकप्रियता असलेल्या नेत्याविरोधात असे प्रयत्न फसतात. १९७१ मध्ये इंदिरा गांधींविरोधातही विरोधकांची सर्व ताकद एक झाली होती. जर नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि सरसंघचालक यांना बरोबर घेऊन अयोध्येत भूमिपूजन करतात आणि मुख्य विरोधकांपैकी कोणीही बोलत नाही, तर मग मंदिर विरुद्ध मंडल हा वाद संपुष्टात आला आहे. भारताचा राजकीय नकाशा पहा. मोदींना आव्हान देऊ शकेल असा नेता कुठेच दिसत नाही. अमरिंदरसिंग, ममता बॅनर्जी वगळता तिसरे नाव नाही. तमिळनाडू, केरळ, आंध्र आणि तेलंगण यापासून दूर आहेत. उलट काही मुद्द्यांवर ते मोदींच्या पाठीशी आहेत. ओडिशाचे तसेच आहे. 

अजून कोण? काँग्रेस नेतृत्वात बदल करायचा आहे. राहुल गांधींना बाजूला ठेवा, दुसरा कोण त्यांची जागा घेऊ शकतो? काही म्हणतात प्रियांका, तर काही म्हणतात ''गांधी'' नको. काहींचे म्हणणे तर आहे की काँग्रेसपासून फुटलेल्या सर्वांना, ममता बॅनर्जी, शरद पवार, जगनमोहन रेड्डी यांना पुन्हा परत बोलवा. पण हे लोक तयार कसे होतील? तयार झाले तरी नेतृत्व कोण करेल, हा प्रश्न आहेच. 

सद्यस्थितीत या सर्व कविकल्पना आहेत. यामध्ये खूप सारे अंदाज, शक्यता आणि इच्छा यांचे मिश्रण आहे. यातून भविष्यातील घडामोडींचा अंदाज बांधण्याची एक पद्धत आहे. बाराव्या शतकात इंग्लंडमध्ये विल्यम ओकहॅम नावाचा हुशार माणूस होऊन गेला. तो तार्किक नव्हता, पण त्याने एक संकल्पना मांडली होती, ती नंतर ओकहॅम रेझर म्हणून प्रसिद्ध झाली. भविष्यातील घटनांबाबत खूप शक्यता, तर्क लढवले गेले असतील तर यातील जे सर्वांत सोपे आहे, तेच घडते, अशी ही संकल्पना आहे. कमी प्रमाणात अंदाज बांधले तर उत्तर अधिक सोपे होते. उलट खूप साऱ्या शक्यता व्यक्त करा, तुम्ही नक्की चुकाल. ओकहॅमचे अनेक अंदाज अचूक ठरले होते. आम्ही ही पद्धत भारतीय राजकारणाचा वेध घेण्यासाठी वापरली. आम्ही अनेक घटनांचा धांडोळा घेतला. सर्वांत कमी अंदाज कशाबद्दल वर्तवले असतील ? २०२४ मध्ये मोदीच पुन्हा पूर्ण बहुमताने निवडून येणार, ही एकच शक्यता ओकहॅम रेझरच्या कसोटीवर टिकली. 

तुम्हाला अजून सोपे करून हवे असेल तर भविष्यातील शक्यता बाजूला ठेवा आणि आपल्या राजकीय इतिहासात डोकावून पहा. भारतात खरोखरच लोकप्रिय आणि जनसंपर्क असलेल्या नेत्याला पराभूत करणे शक्य नाही. अशा नेत्याचा पराभव खुद्द तोच करू शकतो, जसा इंदिरा गांधींनी १९७७ मध्ये केला होता आणि राजीव यांनी १९८९ मध्ये पुनरावृत्ती केली होती. अटलबिहारी वाजपेयी देखील २००४ मध्ये विरोधकांमुळे नाही तर पक्षाच्या अहंकारामुळे पराभूत झाले होते. असे असताना, तुम्ही मोदींसमोर आव्हान निर्माण करू शकत नसाल आणि पळूनही जाणे शक्य नसेल तर काय कराल? मोदी कधी स्वतःचा पराभव करणार, याची वाट बघणार का.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या