चौकुळ : गावाला गवसला विकासाचा मार्ग

शिवप्रसाद देसाई
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

प्रत्येक गावात, प्रांतात एक स्वभाव लपलेला असतो. त्या स्वभावातले शहाणपण शोधून त्याला दिशा दिली की, विकासवाटा आपसूक प्रकट होतात. चौकुळ (जि. सिंधुदुर्ग) या सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेल्या गावानेही हे शहाणपण शोधलं आणि पर्यटनाचा सूर्य उगवला.

प्रत्येक गावात, प्रांतात एक स्वभाव लपलेला असतो. त्या स्वभावातले शहाणपण शोधून त्याला दिशा दिली की, विकासवाटा आपसूक प्रकट होतात. चौकुळ (जि. सिंधुदुर्ग) या सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेल्या गावानेही हे शहाणपण शोधलं आणि पर्यटनाचा सूर्य उगवला. मागासलेपणाचा शिक्का पुसून गेला आणि गावकऱ्यांच्या सहभागातून ग्राम पर्यटनाचे नवे मॉडेल उभे राहिले. गावाचे अर्थकारणही धावू लागले. धुक्‍यांच्या सोबतीला एका बाजूस सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचणे कठीण असे घनदाट जंगल. दुसरीकडे लांबच लांब पसरलेल्या कातळावर उगवलेली दाट हिरवाई. लोकजीवनाचे अंतरंगही तेवढेच देखणे आहे.

चौकुळ हे बारा वाड्यांचे गाव. कागदोपत्री चार हजारांच्या जवळपास लोकसंख्या असली तरी जेमतेम दोन हजार ग्रामस्थच येथे राहतात. येथे अनेक पिढ्या विकास पोहोचला नव्हता. धड कोकणात नाही आणि घाटावरदेखील नाही, अशीच भौगोलिक स्थिती. लढवय्यांचा गाव म्हणून संस्थान काळापासून ख्याती. कधीकाळी येथील घरटी एकजण तरी सैन्यात असे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परंपरेने आलेले कितीतरी आदर्श येथे आहेत. कबुलायतदार गावपद्धत हा यातीलच एक प्रकार. कबुलायत म्हणजे जुनी खोती पद्धत म्हणू शकू, पण त्यातही आदर्श मॉडेल येथे अनेक पिढ्यांपासून राबवले जात आहे. गावात दरवर्षी कारभार चालवण्यासाठी तीन खोत नेमले जातात. क्रमवार पद्धतीने (रोटेशन) खोतीचा हा मान गावातील जवळपास सगळ्या गावडे कुटुंबांकडे येतो. 

येथील बहुसंख्य लोकसंख्या गावडे घराण्यातीलच. गावच्या विकासाचे निर्णय हे खोत घेतात; पण ते एकतर्फी नसतात. प्रत्येकवेळी गाव सभा घेऊन सर्वांच्या विचाराने निर्णय होतो. याला चावडी किंवा न्यायसभाही म्हणतात. प्रत्येक मंगळवारी गावच्या मंदिरात ही सभा भरते. दोनशेहून अधिक वर्षे झाली हा पायंडा सुरू आहे. येथील तंटे गावतच सुटतात. याशिवाय तंटामुक्त गाव, कुऱ्हाडबंदी, चाराबंदी पाळणारे गाव, दारूबंदी यशस्वी करणारे गाव, वन्य जीवांना अभय देणारे गाव असे कितीतरी आदर्श येथे पिढ्यानपिढ्या चालत आले आहेत.

चौकुळ दुर्गम ठिकाणी वसल्याने रोजगाराच्या संधी मर्यादित होत्या. तीव्र थंडी, तुफान पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे येथे कृषी क्षेत्रालाही मर्यादा होत्या. सात वर्षांपूर्वी गावात बदलाचे वारे वाहू लागले. लुपिन फाऊंडेशन आणि कोकण भूमी प्रतिष्ठान या दोन संस्थांनी ग्रामस्थांना एकत्र करून ग्राम पर्यटन संकल्पना मांडली. गावाला ती पटली. या दोन संस्थांच्या मदतीने ‘होम स्टे’चा प्रयोग सुरू झाला. पर्यटक येऊ लागले. गावकऱ्यांनी अस्सल कोकणी पाहुणचार देणे सुरू केले. गावकऱ्यांच्या घरातच पर्यटकांची व्यवस्था केली जाऊ लागली. हळूहळू यातून गावात पैसे येवू लागले. आता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ७० ते ८० कुटुंब पर्यटन व्यवसायात आहेत.

इतर ठिकाणी सरकारकडे पर्यटन विकासासाठी साकडे घातले जाते. चौकुळमध्ये मात्र पर्यटनासाठी सरकारला गावकऱ्यांच्या मागे यावे लागले. ग्रामस्थांनी पहिल्या दोन वर्षात आपल्या घरांमध्ये छोटे-मोठे बदल करून पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या. काहींनी ‘होम स्टे’साठी स्वतंत्र घरे बांधली. बंद घरे खुली केली गेली. सोबत दोन-तीन सुसज्ज हॉटेल उभी राहिली. कुटुंबवत्सल पर्यटन येथे विकसित झाले. प्रशासनानेही गावात रस्ते आणि इतर सुविधा दिल्या. येथे पर्यटक बारमाही येवू लागले. ग्रामपर्यटनाचे एक आदर्श मॉडेल म्हणून चौकुळ बहरू लागले.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या