बिंब-प्रतिबिंब: ‘विरुष्का’वर अभिनंदनाचा वर्षाव !

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी सकाळी आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली. ‘येत्या जानेवारीत आमचं कुटुंब तीन जणांचं होईल’, असे सांगत ‘विरुष्का’ने समाजमाध्यमांवर ते आई-बाबा होणार असल्याचे जाहीर केले.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी सकाळी आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली. ‘येत्या जानेवारीत आमचं कुटुंब तीन जणांचं होईल’, असे सांगत ‘विरुष्का’ने समाजमाध्यमांवर ते आई-बाबा होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही क्षणांतच त्यांच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव आणि विनोदी मीम्सचाही पाऊस सुरू झाला. या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र हॅशटॅग ‘विरुष्का’, अनुष्का शर्मा, विराट कोहली ट्रेंडमध्ये होते.

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी ‘सीबीआय’ने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, नोकर नीरजसिंह, दीपेश सावंत यांची चौकशी केली. सुशांतच्या शवविच्छेदनाबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित झाल्याने ‘सीबीआय’च्या एका पथकाने कूपर रुग्णालयाला भेट दिली. ‘सीबीआय’कडून सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीचीही चौकशी होण्याची शक्‍यता आहे. रियाने एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांचे खंडन केले. त्याशिवाय सुशांतला विमानात बसण्याबाबत दडपण येत होते, त्यासाठी तो औषधे घेत होता, असेही रियाने सांगितले. मात्र त्याचवेळी सुशांत पॅराशूटद्वारे उडी मारतानाचे, तसेच चार्टर विमानांचे उड्डाण करत असल्याचे व्हिडिओ समोर आले. या पार्श्‍वभूमीवर सुशांतच्या चाहत्यांकडून संबंधित वृत्तवाहिनीला ट्रोल केले जात होते.

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने तडकाफडकी बदली करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी त्यांची नियुक्ती केली. इतर १६ अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली. ‘कोरोना’च्या संकटात मुंढे यांनी उत्तम नियोजन करत नागपूरमध्ये संसर्ग नियंत्रणात ठेवला होता. मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पातील त्यांची कार्यप्रणाली खटकल्याने त्यांची बदली झाल्याची चर्चा रंगली. दरम्यान, नागपूरकरांनी मुंढे यांच्या बदलीविरोधात नाराजी व्यक्त करत सरकारचा निषेध केला. त्यानिमित्त समाजमाध्यमांवर ‘तुकाराम मुंढे’ हा हॅशटॅग चर्चेत होता.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या