।। श्री गजानन महाराजांची भविष्यवाणी ।।

रमेश सप्रे
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

शेगांव जवळच असलेल्या अकोला गावात शिवजयंतीनिमित्त एका सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. जवळच असलेल्या सिंदखेड गावात छत्रपती शिवरायांची तेजस्विनी वीरमाता जिजाऊ (जिजाबाई) यांचा जन्म झाला होता. म्हणून या उत्सवाचं महत्त्‍व द्विगुणित झालं होतं

रमेश सप्रे

यावच्चंद्र दिवाकर । पुरूष बाळ गंगाधर ।।
चिरंजीव निरंतर । राहिल कीर्तिरूपाने ।।
संतकवी दासगणू महाराजांची आपल्या अजरामर अशा ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथात लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी हे कोणत्या संदर्भात लिहिले आहे? तो प्रसंग मोठा ‘पाहण्यासारखा’ आहे. ‘वाचण्यासारखा’ असं मुद्दा म्हटलं नाही. कारण, ‘जे न देखे रवी (सूर्य) ते देखे कवी’ या न्यायानुसार दासगणूंनी आपल्या अतिशय सोप्या, प्रवाही नि प्रभावी अशा चित्रमय शैलीत या प्रसंगाचं सविस्तर वर्णन केलंय.
त्याचं असं झालं, शेगांव जवळच असलेल्या अकोला गावात शिवजयंतीनिमित्त एका सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. जवळच असलेल्या सिंदखेड गावात छत्रपती शिवरायांची तेजस्विनी वीरमाता जिजाऊ (जिजाबाई) यांचा जन्म झाला होता. म्हणून या उत्सवाचं महत्त्‍व द्विगुणित झालं होतं. कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होतं लोकमान्‍य टिळक यांचं भाषण. अशा त्रिवेणी संगमावर (शिवजयंती उत्सव - मातोश्री जिजाबाईंचं जवळचं असलेलं जन्मस्थान आणि प्रसिद्ध लोकनेते नि स्फोटक वक्ते लोकमान्‍य टिळक) प्रयाग हे परमतीर्थक्षेत्र अवतरावं या भावनेनं अनेकांनी सूचना केली की, श्री गजानन महाराजांनासुद्धा आमंत्रित करावं. काहीजणांनी विरोध व्यक्त करताना म्हटलं -
तो शेगावाचा अवलिया । कशास आणिता ये ठाया ।।
तो काहीतरी करूनिया । विक्षोभ करील सभेचा ।।
फिरेल नागवा सभेत । ‘गणी गण गणात’ एैसे म्हणत ।।
मारिल वाटे कदाचित । तो लोकमान्याला ।।

त्याचवेळी अनेकजणांना श्रीमहाराजांनी सभेला उपस्थित असावे असंही वाटत होते. शेवटी श्री गजानन महाराजांना सभेचं निमंत्रण देण्यासाठी दादासाहेब खापर्ड्यांसह काही मंडळी आली.
येताच दादा खापर्ड्यांसी । बोलते झाले पुण्यराशी ।
आम्ही येऊ सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ।।
वेड्यापरी ना तेथे करू । जागीच बसूनी मौन धरू ।
सुधारकांचा कधी न करू । मनोभंग मनाचा ।।
यावरून सर्वांना श्री गजानन महाराजांच्या त्रिकाल ज्ञानाची कल्पना आली.
अखेर अक्षयतृतीयेच्या दिवशी (४ मे १९०८ या दिवशी) ही ऐतिहासिक सभा संपन्न झाली. ‘लोकमान्य’ ही पदवी टिळकांना कोणत्या संस्थेने दिलेली नव्हती. ज्या ब्रिटिश सरकारच्या विरूद्ध ते जनमत पेटवत होते ते सरकार तर त्यांना कोणतीही पदवी वा सन्मान देण्याचा प्रश्‍नच नव्हता. लोकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या हृदयाची मान्यता देऊन त्यांना ‘लोकमान्य’ टिळक बनवलं होतं.
त्यांची लेखणी आणि वाणी दोन्हीही ब्रिटिश सरकारचं धाब दणाणून सोडत होती. असे सर्वार्थानं लोकप्रिय ‘लोकमान्य’ टिळक हे कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून येणार या कल्पनेनंच सारा परिसर भरून गेला होता. शिवाजींची माता वऱ्हाडी (विदर्भातील) तर पिता शहाजी हे महाराष्ट्राचे शूरवीर होते. त्यामुळे शिवजयंती उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
सभेच्या दिवशी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. एकाच वेळी पूज्य श्री गजनन महाराज आणि लोकनेते टिळक यांना पाहण्याची पर्वणी होती ती.
सभेच्या दिवशी विशेष म्हणजे श्रीगजानन महाराज वेळेपूर्वीच सभास्थानी पोहोचले होते. व्यासपिठावर खास उच्चस्थानावर मोक्षदानी श्रीमहाराज बसले होते. ते जीवन मुक्त असल्याने उन्मती अवस्थेत निजानंदास बसले होते. आजुबाजूच्या हालचाली, आवाज यापैकी कशाचेच भान त्यांना नव्हते. सारे लोक अक्षय्‍य तृतियेच्या पावन दिवशी श्रीमहाराजांचं पुण्यदर्शन घेऊन धन्य होत होते.
सभामंचच्या अग्रभागी लोकमान्‍य टिळक नि बाजूला इतर महनीय मंडळी बसली होती. ज्यावेळी व्याख्यानसिंह लोकमान्य भाषणासाठी उठले तेव्हा श्रोत्यांचा सागर श्‍वास रोखून ऐकू लागला. लोकमान्य सिंहगर्जना करत गरजले, ‘स्वातंत्र्यरूपी सूर्य मावळला असून, दास्याचा अंधार पडलेला आहे. स्वातंत्र्य नाही तो समाज प्रेतासारखा असतो. ज्या शिक्षणानं राष्ट्रप्रेम वाढेल असं शिक्षण इंग्रज साहेब आपल्याला कधी देईल का? ’ यावर श्रीगजानन महाराज उठून ठामपणे ‘नाही, नाही, नाही’ असे त्रिवार म्हणाले. भाषणाच्या आवेशात लोकमान्य सरकारला टोचून बोलल्यावर श्रीमहाराज उद्‍गारले, ‘अरे ! अशानेच दोन्ही दंडास काढण्या (बेड्या) पडतात.’ नंतर शांतपणे ‘गण, गण, गणात बोते’ हे भजन करू लागले. श्रीमहाराजांच्या भविष्यवाणी प्रमाणे पुढे लोकमान्‍य टिळकांवर खटला भरला गेला. लोकमान्य स्वतः वकील होतेच, इतरही अनेक वकील त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करू लागले. कोल्हटकर नावाचे गृहस्थ टिळकांबद्दल अतीव आदर असल्याने श्री गजानन महाराजांचा प्रसाद नि आशीर्वाद मिळविण्यासाठी शेगावला आले, श्रीमहाराज म्हणाले, ‘सज्जानांना त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नसते. लोकमान्‍य टिळकांना शिक्षा होईलच,’. नंतर म्हणाले,
ही मी देतो भाकर । ती खाऊ घाला लौकर ।।
टिळकांप्रती अंतर यात काही करू नका ।।
या भाकरीच्या बळावरी । तो करील मोठी कामगिरी ।
जातो जरी फार दूरी । परि न त्याला इलाज ।।
अगदी तसंच घडलं, लोकमान्‍य टिळकांना ब्रह्मदेशातील (मॅनमार) मंडाले तुरुंगात पाठवलं, जिथं त्यांनी ‘गीतारहस्य’ हा अमर ग्रंथ लिहिला. धन्य ते लोकमान्‍य टिळक, नि धन्य ते श्रीगजानन महाराज !

संबंधित बातम्या