धग आणि धुरळा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

कुठल्याच मर्यादा न पाळणे हेच वैशिष्ट्य असलेले डोनाल्ड ट्रम्प अद्यापही आपल्या आधीच्या कोशातून बाहेर आलेले नाहीत. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्याबरोबर ट्रम्प यांच्या झालेल्या अखेरच्या जाहीर वादविवादात हीच बाब प्रकर्षाने स्पष्ट झाली.

 प्रस्थापितविरोधी पवित्रा घेत, खरे-खोटे शत्रू समोर उभे करीत आणि लोकांच्या भावनांना हात घालत राजकारण करणे सत्तेचा अनुभव घेतलेला नसताना खूपच सोपे जाते आणि लोकांवर छाप पाडता येते. मात्र सत्तेवर येऊन कारभाराचे सुकाणू सांभाळल्यानंतर या सगळ्याला मर्यादा येतात. याचे कारण काय करून दाखवले, याचा चोख ताळेबंद लोकांसमोर मांडावा लागतो. कोणत्या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत, याची रूपरेखा मांडावी लागते. पण कुठल्याच मर्यादा न पाळणे हेच वैशिष्ट्य असलेले डोनाल्ड ट्रम्प अद्यापही आपल्या आधीच्या कोशातून बाहेर आलेले नाहीत. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्याबरोबर ट्रम्प यांच्या झालेल्या अखेरच्या जाहीर वादविवादात हीच बाब प्रकर्षाने स्पष्ट झाली. त्यांनी नेहेमीच्या आक्रमक पद्धतीने बायडेन यांच्यावर वार केले. मागच्या वेळेप्रमाणे बायडेन बोलत असताना मध्येच तावातावाने बोलणे टाळले, एवढाच काय तो फरक. पण मुद्दे तेच. ‘मी प्रस्थापित राजकारणी नाही, लोकांचा प्रतिनिधी आहे आणि त्यांच्यासाठीच झगडतो आहे. विरोधकांना तेच खटकते आहे’, असा आरोप करत, प्रसारमाध्यमांतून आलेल्या विरोधातील बातम्यांची ‘फेक न्यूज’ अशी संभावना करीत आणि डेमोक्रॅटिक पक्ष कसा परधार्जिणा आहे, हे सांगत त्यांनी खापर फोडण्याचा आपला कार्यक्रम चालू ठेवला आहे. कोरोनाचा संसर्ग निदान या बाबतीत तरी त्यांच्या पथ्यावर पडला. अर्थातच त्यांनी चीनच्या विरोधात आगपाखड केली; एवढेच नव्हे तर बायडेन यांचे चीनमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला. ओहावो प्रांतात झालेल्या वादात आणि या अखेरच्या वादविवादातही वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला होता. बायडेन यांनीही ट्रम्प यांनी केवळ ७५० डॉलर प्राप्तिकर भरल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला, तर ट्रम्प यांनी बायडेन यांच्या मुलाचे युक्रेन आणि चीनमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचे सांगून ते सत्तेवर आले तर देशाचे वाटोळे होईल, अशी झोड उठवली. त्यातच अमेरिकी निवडणुकीत रशिया आणि इराण लुडबूड करीत असल्याचे अमेरिकी गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केल्याने ट्रम्प यांच्या ‘परकी हाता’च्या धोशाला पुष्टी मिळाली आहे. 

भूमिपुत्रांचा प्रश्‍न मांडत आणि राष्ट्रवादाचा गजर करीत मागची निवडणूक ट्रम्प यांनी जिंकल्यामुळे तोच पवित्रा ते पुन्हा घेत असतील तर त्यात आश्‍चर्य नाही. पण ट्रम्प यांनी जो अजेंडा पुढे आणला त्याला प्रतिक्रिया देण्यातच डेमोक्रॅटिक पक्षाची बरीच ऊर्जा खर्च होते आहे, याचाही पुनःप्रत्यय आला. तरीही त्यांनी या निवडणुकीत जी रंगत आणली आहे, त्याची नोंद घ्यायला हवी. कोरोनाच्या संसर्गाच्या उद्रेकामुळे जवळजवळ सव्वा दोन लाख व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आणि अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य विमा यांचा प्रश्‍न समोर आला. स्वतः ट्रम्प यांना कोरोनाने ग्रासले तरी हा प्रश्‍न त्यांनी कधीच गांभीर्याने घेतला नाही. मास्क घालण्याच्या नियमाची त्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या खिल्लीच उडवली. ट्रम्प यांनी ज्याप्रकारे कोरोनाचा प्रश्‍न हाताळला, तो मुद्दा डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला आहे. जनमत चाचण्यातूनही बायडेन यांच्याकडे कल दर्शवितात. हे सगळे असले तरी निकालाविषयी कोणतेच भाकीत करणे शक्‍य नाही, अशी या घडीला स्थिती आहे. २०१६च्या निवडणुकीत हिलरी क्‍लिंटन यांच्याही बाजूने जनमत चाचण्यांचा कौल होता, पण निकाल ट्रम्प यांच्या बाजूने लागला होता. 

ईस्ट आणि वेस्ट कोस्ट राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे, तर दक्षिण आणि मध्य भागात रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असल्याचे दिसते. त्यामुळे या निवडणुकीत ‘स्विंग स्टेट’ महत्त्वाची भूमिका बजावतात. तेथेच उमेदवारांचे भवितव्य निश्‍चित होईल, असे मानले जाते. अशा राज्यांमध्ये भारतीयांची संख्या जवळजवळ १८ लाख असल्याने भारतीयांचा कल कुठे राहतो, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. फ्लोरिडा, मिशिगन, पेनसिल्व्हानिया, विस्कॉन्सिन या राज्यांत २०१६च्या निवडणुकीत ट्रम्प यांना एक टक्‍क्‍याहूनही कमी फरकाने विजय मिळाला होता, हे लक्षात घेतले तर या चुरशीची कल्पना येईल. शेवटच्या टप्प्यात माजी अध्यक्ष बराक ओबामा हेही प्रचाराच्या मैदानात उतरले असून, त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचा उत्साह वाढेल. अर्थात निकाल काहीही लागला तरी कोरोनाच्या छायेत पार पडत असलेल्या या निवडणुकीने आणि त्यातील प्रचाराच्या पातळीने लोकशाही देश म्हणून अमेरिकेची जी प्रतिमा होती, तिला काही प्रमाणात छेद गेला आहे. बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षा, आरेग्य विमा असे अनेक प्रश्‍न सोडविण्यात नवे अध्यक्ष आणि त्यांचे सरकार यांची कसोटी लागेलच, परंतु ही प्रतिमा पुन्हा उंचावण्याचे आव्हानही तितकेच मोठे असेल. 

संबंधित बातम्या