गांजा विक्री, उत्पादकांना हद्दपार करा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

निसर्गसंपन्न छोट्या गोव्याला गांजाचा व्यापार, लागवड काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने अनेक गांजाची अनेक प्रकरणे येथे उघड होत आहेत. टाळेबंदीच्या काळात काही प्रमाणात प्रकरणे कमी झाली होती, परंतु टाळेबंदी उठविल्यानंतर मात्र पुन्हा जोमाने गांजाचा सुळसुळाट सुरू झाला. लाखो रुपयांच्या गांजाची प्रकरणे कोटीच्या घरात केव्हा गेली, हे कळलेच नाही. गांजाची लागवड आणि तस्करी ही प्रकरणे गोव्याचे नाव बदनाम करणारी आहेत. तेव्हा हा प्रकार गांजा उत्पादन करणाऱ्यांच्या मूळासकट उपटून टाकला पाहिजे. तरच गोव्याची शान अबाधित राहाणार आहे, अन्यथा गोवा बदनाम होईल.

 संजय घुग्रेटकर

देशातील इतर राज्यात गांजाची लागवड शेतात, मळ्यात चोरट्या पद्धतीने होते. काही ठिकाणी परवाना घेऊनही औषधोपचारासाठी म्हणून लागवड केली जाते. परंतु आपल्या राज्यात शेती, मळा नाहीच. शेती करणारेही कमी झालेत, पण भाड्याच्या घरात, फ्लॅटमध्ये गांजाची लागवड विदेशी नागरिकांतर्फे केली जाते. आम्ही ज्यांना आपल्या मालकीची घरे, फ्लॅट भाड्याने देतात. ते मात्र निश्चितपणे भाडे घेत गप्पच असतात. ज्या प्रमाणे आपण इंग्रज, पोर्तुगिजांना व्यापारासाठी आपली जमीन दिली, त्याचप्रमाणे आपण आता गांजा लागवडीसाठी स्वागत करीत आहोत, की काय? असे वाटते. विदेशींतर्फे गांजासाठी भाड्याच्या घरात सुपिक जमीन मिळाल्याने लागवड उत्तम प्रकारे सुरू झाली. उत्तर गोव्यातच अशी अनेक प्रकरणे उघड झाली असून या प्रकरणाचा अंत अद्याप झालेला नाही. गांजाचे रॅकेट खूपच मोठे असावे. सापडलेल्या गांजा लागवड प्रकरणाचा विचार करता अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजा लागवड केलेली असावी. ही प्रकरणे शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मांद्रे, शिवोली, हरमल सारख्या ठिकाणी गांजाची लागवड करणाऱ्यांना पकडले. यात रशियनांचे कौशल्य मोठे आहे.

शिवोलीत जुलै २०१७ मध्ये क्राईम ब्रँचतर्फे दोन रशियनांकडून १० लाखांचा गांजा पकडण्यात आला होता. जुलै २०१८ मध्ये शिवोली भागात ३० किलो गांजाची शेती नष्ट करण्यात आली. दोन रशियनांवर कारवाई करण्यात आली. डिसेंबर १८ मध्ये एका जोडप्याकडून १५ लाखाचा गांजा जप्त केला. त्यानंतर कांदोळी परिसरात एका बंगल्याच्या परिसरात लागवडीवर कारवाई करण्यात आली. २०१९ मध्ये मांद्रे परिसरात ३ रशियनांकडून ६५ हजारांचा गांजा जप्त करण्यात आला. मार्च २० मध्ये शिवोलीत रशियन नागरिकाकडून १.६ कोटीचा गांजा हस्तगत केला. जून २०२० मध्ये थिवी परिसरात गांजा लागवडीवर कारवाई झाली. तेथेही ४.७५ लाखाचा गांजा जप्त केला आणि ऑक्टोंबर २०२० मध्ये मांद्रेत २ रशियन नागरिकांकडून ३.५ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. यानंतरही पेडणे थोरलेबाग-केरीत एक कोटीचा अमलीपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. गांजा तस्करीच्या घटना पाहता गोव्याला गांजा लागवड, तस्करीचे केंद्रच करण्यात आले आहे. बॉलिवूडच्या अमली पदार्थप्रकरणाशी संबंधितही अनेकांना गोव्यातून अटक केली, त्यांची चौकशी सुरू आहे.
रशियन पर्यटक म्हणून येतात आणि गांजा लागवड करतात. हा प्रकार नवा नाही. त्यांच्यावर पाळत ठेवल्यास अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे. राज्यात त्यांना भाडेपट्टीवर घर, फ्लॅट देणारेही गप्पच असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. परंतु जागा मालकच गप्प असल्यामुळे असे व्यवहार होण्यास वाव आहे. टाळेबंदीनंतर गोव्यात किमान ४०-५० प्रकरणे तरी ड्रग्जशी संबंधित घडलेली आहेत. यापैकी सगळीच प्रकरणे नोंद झालेली नसतात. किनारपट्टीवर गांजाशी संबंधित व्यवहारातून अनेक मारामाऱ्या, भांडणेही होत असतात. त्यांची कुठेच नोंद नसते. अशा काही प्रकरणात ४२ जणांना अटकही झाली आहे. त्यात देशी, परदेशी नागरिकांबरोबरच स्थानिकांचाही समावेश आहे. राज्यात टाळेबंदीच्या काळात अनेक देशी-विदेशी पर्यटक आपल्या मूळ राज्यात, विदेशात निघून गेले. विदेशींना तर खास विमानांची सोय करण्यात आली होती. तरीसुद्धा बार्देश, पेडण्यात काही विदेशी पर्यटक फिरताना दिसत होते. काही पर्यटक आपल्या देशात गेलेच नाहीत. ते येथे फक्त पर्यटनासाठी आलेले नाहीत, तर ते व्यापारी म्हणून आले आहेत. त्यांचा व्यापार छुप्या पद्धतीने सुरू होता. म्हणून ते येथेच राहिले. काही स्थानिक, काही परराज्यातील नागरिकांना हाताशी धरून त्यांचा गांजा, अमलीपदार्थांचा व्यवहार सुरूच होता. टाळेबंदीनंतर सीमा खुल्या झाल्याने या मालाची तस्करी सुरू झाली. काही प्रकरणात चोप बसला, पकडले गेले तर काही प्रकरणे पचलीसुद्धा. कारण येथून गेलेला गांजा, अमलीपदार्थ बेळगाव, पुणे, मुंबईत पकडला गेला. त्यानंतर गोव्यात असलेल्या एजंटाचा शोध सुरू झाला. काही फरार झाले, काहीजण सापडलेही.

गांजासाठी फक्त उत्तर गोवाच केंद्र आहे. शिवोली, मांद्रे, पेडणे, हरमल, थिवीत लागवड झाली, असे तपासात सिद्ध झाले असले तरीसुद्धा इतर ठिकाणीही गांजाची पाळेमुळे रूजलेली आहेत. विदेशी नागरिक कुठेही भाड्याच्या घरात राहताना हा व्यवसाय करतात. तेव्हा त्यांच्यावर पोलिसांपेक्षा स्थानिकांनीच नजर ठेवली पाहिजे. बाहेरच्या राज्यातील व्यक्ती दिसली, की `घाटी` म्हटले जाते. मग विदेशी घाटी नव्हे का? ते कोण लागतात, ते जर पर्यटक म्हणून आले असतील तर त्यांचे स्वागत कराच, पण जर का ते पर्यटनाच्या नावावर नको ते धंदे करीत असतील, गोव्याचे नाव बदनाम करीत असतील, तर त्यांना हाकललेच पाहिजे. गांजा किंवा इतर अमलीपदार्थांचे व्यवहार करीत असतील तर त्यांची पाळेमुळेच नष्ट केली पाहिजेत. आपला सुंदर, समृध्द गोवा बदनाम होण्यापासून वाचविले पाहिजे. ते आपल्याकडेच आहे. देशी पर्यटक किंवा गरजूला आपण घाटी म्हणून खोली, फ्लॅट भाड्याने देताना कचरतो. कारण तो कमी पैसे देतो. विदेशी खूप पैसे देतो, म्हणून त्यांच्यावर खूप विश्वास ठेवून राहातो. पण तो घरात गांजाची लागवड करतो, की किरायत्याचे झाडे लावतो, हे आपल्याला कळले पाहिजे. तेवढी हुशारीही आपण ठेवलीच पाहिजे. गांजाच्या प्रकरणात घडलेल्या बहुतांश प्रकरणात रशियन नागरिक सापडले आहेत. त्यांना साथ देणारे स्थानिकही आहे. तेव्हा हे प्रकार वेळीच बंद झाले नाहीत, तर मग मात्र आपल्या सर्वांवर वाईट परिणाम होतील. आपली नवी पिढीसुद्धा या धंद्यात उतरेल. त्यांना त्यापासून रोखण्यासाठी आताच आपण या व्यवसायात गुंतलेल्यांचा बंदोबस्त आपण केला पाहिजे. शासन, पोलिस आपल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेतच. परंतु त्यांना आपण साहाय्य करणे, हे आपले कर्तव्य आहे. आपण जर का या प्रकारांना थारा दिला नाही, ठराविक काळासाठी विदेशींना राहायला दिले. त्यांच्यावर नजर ठेवली, तर हे प्रकार निश्चित कमी होतील. आपण सूज्ञ आहोत, गांजा तस्करी, लागवडी विरोधात एकदिलाने लढूया!

संबंधित बातम्या