खुडून टाका गुन्ह्यांची ही विषवल्ली...!

Narendra Tari
मंगळवार, 23 जून 2020
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोवा हे सर्वांत शांत आणि कमी गुन्हेगारीचे राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने एका पाहणीत इतर देशांपेक्षा गोव्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे म्हटले आहे. हे सगळे खरे असले तरी इतर राज्यांचे क्षेत्रफळ आणि तेथील लोकसंख्या ही बाबही जमेस धरली पाहिजे.

- टिप्पणी
---------------------
लेखक - नरेंद्र तारी
---------------------

खुडून टाका गुन्ह्यांची ही विषवल्ली...!

....
शांत, सुंदर गोव्याची सुंदरता अबाधित ठेवण्यासाठी येथील वाढत्या गुन्हेगारीला आधी आळा बसायला हवा. त्यासाठी राज्याची सुरक्षा यंत्रणा आहेच, तरीपण राडा काही थांबत नाही, बळी जाण्याचे प्रकार काही खंडित होत नाहीत. अधूनमधून ही गुन्हेगारी डोके वर काढतेच, त्यामुळे सर्वसामान्य माणूस अशा घटनांनी हादरून जातो, त्याचे काय...!
......
सोनेरी वाळूच्या, फेसाळत्या लाटांच्या आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात रमायचे असेल तर कुठे जावे, मनशांतीसाठी कुठल्या देवाचे दर्शन घ्यावे असा मनात विचार आला की आपसूकच पर्यटकांच्या ओठांवर गोवा हे नाव येते. निवृत्तीनंतर निवास असावा तर तो गोव्यातच, मस्तपैकी सुटी ‘एन्जॉय’ करायची असेल तर फक्त आणि फक्त गोवाच, असे जेव्हा पर्यटकांना वाटते, तेव्हा गोव्याचे महत्त्व पर्यटनाच्याबाबतीत अधिकच स्पष्टपणे जाणवते. मात्र गोव्याच्या या पर्यटनाला आणि सुशेगादपणाला सध्या गुन्हेगारीचा विळखा पडत चालला आहे. गोव्याची सुरक्षा यंत्रणा आपल्यापरीने काम करते आहे, आपण निदान तसे समजूया, पण वाढत्या गुन्हेगारीला आळा घालताना गोव्याचे हे वेगळेपण जपणे ही सरकारची सध्या मोठी जबाबदारी आहे.
सांताक्रूझ येथे दोन टोळ्यांमधील संघर्ष विकोपाला गेल्यानंतर एकाला ठार मारण्यापर्यंत एका गटाची मजल गेली. मूळात अशा गॅंगमधील लोक हे शेवटी कुत्र्याच्या मौतीनेच मरत असतात. त्यामुळे या लोकांबाबत कुणाच्या मनात ना सहानुभूती असते, ना दया! तरीपण गॅंगवॉर करून एकंदरच गोव्याची शांतता भंग करण्याएवढा राडा करण्याचे धाडस या लोकांना येते कुठून हे आधी पहायला हवे.
गोव्यातील गॅंगवॉर आणि राज्यात कार्यरत गुंडांच्या टोळ्या हे काही आपल्यासाठी नवीन नाही. कारण चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर अशाप्रकारची गुंडगिरी ही विशिष्ट अशा भागातच फोफावलेली आपल्याला दिसेल. गुंडांच्या या टोळ्यांमध्येही परिवर्तन होत राहते. गोव्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर काही गुंड राजकीय क्षेत्रातही पोचले. त्यामुळे एकाची जागा दुसऱ्याने घेणे हे ओघाने आलेच, मात्र या जागा घेण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी जी प्रभावी सुरक्षा यंत्रणा हवी ती आपल्याकडे नाही का, असा सवाल उपस्थित होतो. गोमंतकीयाला शांत जीवन जगण्यासाठी हवी असलेली सुरक्षितता पुरवण्यात आपण कमी पडतोय का?
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोवा हे सर्वांत शांत आणि कमी गुन्हेगारीचे राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने एका पाहणीत इतर देशांपेक्षा गोव्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे म्हटले आहे. हे सगळे खरे असले तरी इतर राज्यांचे क्षेत्रफळ आणि तेथील लोकसंख्या ही बाबही जमेस धरली पाहिजे. त्यातच गोव्यात अधूनमधून गुन्हेगारी उफाळते, पण ती तेवढी नजरेस भरत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत गोवा हे एकदम लहान असल्याने गुुन्हेगारीचे प्रमाणही चटकन लक्षात येत नाही. पूर्वीच्या काळी गुन्ह्यांचे वाढते प्रमाण हे आपण मुंबईसारख्या मोठ्या शहरातच पाहत होतो, पण जेव्हा मुंबईसारख्या भागात गुन्हे करून जर गोव्यात लपण्यासाठी एखादा अट्टल गुन्हेगार जागा शोधत असेल तर आपण सजग रहायला नको का. केवळ देशीच नव्हे तर परदेशींकडूनही गोव्याचा हा असा सुरक्षित आसरा घेण्यासाठी वापर झाला आहे. गोमंतकीयांची ही शांतता भंग केवळ परराज्यातील गुन्हेगारांकडूनच झाली आहे, असे नव्हे तर नोंद होण्यासारख्या गुन्ह्यांत परदेशी पाहुणेही अडकले आहेत. मघाशी म्हटल्याप्रमाणे, गुन्ह्यांचे सरासरी प्रमाण हे गोवा राज्यातही वाढत आहे. मागील २०१५ ते २०१७ या तीन वर्षांच्या कार्यकाळात गोव्यात परदेशी नागरिकांकडून मग ते पर्यटक असो वा उद्योग व्यवसायासाठी गोव्यात आलेले असोत, या लोकांकडून साडेतीनशेपेक्षा जास्त गुन्हे नोंद झाले आहेत. त्यात खुनासारख्या मोठ्या घटनाही नोंद झाल्या आहेत. काही घटनांचा तर पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या गोव्याची नाचक्की करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय स्तरावर वापर झाला आहे. गोव्याची हेतूपुरस्सर बदनामी करण्याचाही प्रकार यापूर्वी घडला आहे. तरीपण गोव्याचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व हे आजही अबाधित आहे, हे आपण मानले पाहिजे.
वर वर शांत दिसणारा गोवा आज गुन्हेगारीने पोखरला आहे, राज्यातील वाढते गुन्हे आणि या गुन्ह्यात सातत्याने होणारे बदल हे घातक आहे. गॅंगवॉरमध्ये एखाद्याचा बळी जातो, तेव्हाच त्याची तीव्रता समजते. खंडणी वसूल करण्याबरोबरच धमकावणे, एखाद्याचा खून करणे यावरूनच टोळी युद्धे भडकतात. कायदा आणि सुव्यवस्थेला चक्क आव्हान देणाऱ्या अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा सर्वसामान्य माणूस हादरून जातो. ही गुंडगिरी मोडित काढण्याची जशी जबाबदारी आताच्या सरकारवर आहे, तशीच ती मागेही होती की...! सरकार बदलत राहते, माणसे बदलत जातात, पण गुन्ह्यांचे प्रमाण काही आटोक्‍यात येत नाही. त्यातच गोवा म्हणजे भुतलावरील चॉंद का टुकडा. त्यामुळे येथे निवास करणे कुणाला आवडणार नाही. जो कुणी येतो, तो गोव्याच्या प्रेमातच पडतो. त्यामुळे कसा तरी गोव्यात एखादा फ्लॅट असावा अशी मनिषा जर परराज्यातील नागरिकांनी धरली तर त्यात गैर ते काय मानायचे. मात्र अशा प्रकारातून गोव्यात ऐरागैऱ्यांचा शिरकाव झाला आहे, हे ही आपण नजरअंदाज करून चालणार नाही. मूळात गोमंतकीय संस्कृती काय म्हणते, हे आधी समजून घेतले पाहिजे. आपल्या ताटात असलेले भुकेल्याला देणारी गोमंतकीय संस्कृती आहे. कमरेची लंगोटी सोडून दुसऱ्याचे अंग झाकण्याची गोमंतकीयाची खासियत आहे, जी इतरांकडे नाहीच मुळी हे इतर राज्यातील लोकही मानतात. मात्र अशा परिस्थितीत जर शांतताप्रिय गोमंतकीयांच्या उरात धडकी भरवणारी गुन्हेगारी कृत्ये जर सुरू झाली तर मग पुढे काय?
या ठिकाणी आपण एक लक्षात ठेवले पाहिजे, एखाद्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला सर्वप्रकारची सुरक्षा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सर्वसामान्य माणूस आज न्यायालयाची पायरी चढायला मागत नाही, तपासणीच्या नावाखाली भरभक्कम बिले करणाऱ्या खासगी आरोग्य सेवेतील काही कसायांमुळे हाच माणूस धास्तावला आहे. पोलिस जनतेचे मित्र म्हणतात, मात्र पोलिस म्हटले की सर्वसामान्य माणूस तोंड वेडंवाकडं का करतो, याचा परामर्श घेण्याची खरी गरज आहे. या ठिकाणी कुणाला कमी लेखण्याचा किंवा कुणाचे मनोबल खच्चीकरण करण्याचा अजिबात प्रयत्न नाही. वर उल्लेखित क्षेत्रात काही प्रामाणिक लोक असतीलही. पण ही संख्या आजच्या घडीला पुरेशी नाही.
गोव्यातील गुन्हेगारीचा पुरता बिमोड करणे ही आज काळाची गरज आहे. ज्या सांताक्रूझ मतदारसंघात गॅंगवॉर झाले, त्या मतदारसंघाचा आमदारच इतिहासाला उजाळा देतो. रवी नाईक मुख्यमंत्री असताना राज्यात गुन्हेगारीला कसा पायबंद बसला होता, त्याचे उदाहरण देतो. या ठिकाणी कुठल्याही एका व्यक्तीचा संदर्भ देण्याचे कारण नाही, पण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तेवढी धमक अंगी बाळगावी लागते. गुन्हेगारीची ही विषवल्ली खुडून टाकण्यासाठी प्रभावी उपायांची आवश्‍यकता आहे. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यादृष्टीने कार्यवाही करायला हवी, नव्हे ते करतीलही अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या