महासत्ताही महासंकटात!

Shambhu Bhau Bandekar
मंगळवार, 9 जून 2020

मागील अर्धशतकाहून अधिक काळ आर्थिक सबलता, शस्त्रसज्जता, शस्त्रनिर्मिती, जमिनीवरील आणि अंतराळातील संशोधन यामुळे जागतिक महासत्ता बनलेला अमेरिका देशही कोरोना विषाणू आणि वर्णद्वेषाची विषवल्ली या दोन्हींमुळे महासंकटाचा सामना करीत आहे. या दोन्ही आघाड्यातील असंतोषामुळे, उद्रेकामुळे ही महासत्ता कधी नव्हे इतकी भीषण व भयाण परिस्थितीला सामोरे जात आहे. कोरोनाचा विषाणू गेली तीन-साडेतीन महिने आणि वर्णद्वेषाची विषवल्ली गेले पंधरा दिवस अमेरिकेत ठाण मांडून आहे. पण सरकारी अकार्यक्षमतेमुळे या दोन्ही गोष्टी काबूत आणणे अजून तरी शक्य झालेले नाही.

मागील अर्धशतकाहून अधिक काळ आर्थिक सबलता, शस्त्रसज्जता, शस्त्रनिर्मिती, जमिनीवरील आणि अंतराळातील संशोधन यामुळे जागतिक महासत्ता बनलेला अमेरिका देशही कोरोना विषाणू आणि वर्णद्वेषाची विषवल्ली या दोन्हींमुळे महासंकटाचा सामना करीत आहे. या दोन्ही आघाड्यातील असंतोषामुळे, उद्रेकामुळे ही महासत्ता कधी नव्हे इतकी भीषण व भयाण परिस्थितीला सामोरे जात आहे. कोरोनाचा विषाणू गेली तीन-साडेतीन महिने आणि वर्णद्वेषाची विषवल्ली गेले पंधरा दिवस अमेरिकेत ठाण मांडून आहे. पण सरकारी अकार्यक्षमतेमुळे या दोन्ही गोष्टी काबूत आणणे अजून तरी शक्य झालेले नाही.
अमेरिका हा देश जेव्हा आपल्या नजरेसमोर येतो, तेव्हा त्याचे सर्व सुखसोयींनी सुसज्ज जीवनशैली, उच्च दर्जाचे शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान यात अग्रेसर व भूतलावरील सर्वात श्रीमंत राष्ट्र असे चित्र नजरेसमोर येते आणि यात खोटे असे काहीच नाही. पण, गेल्या तीन साडेतीन महिन्यांच्या काळात या देशाने कोरोनाची इतकी धास्ती घेतली आहे की लाखोंनी दगावले, लाखो रुग्ण कोरोनाबाधीत असे भयाण चित्र येथे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडालेली आहे. तेथील विरोधात असलेला डेमॉक्रेटिक पक्षच नव्हे तर ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्षही त्यांच्या हात धुवून पाठी लागला आहे. ट्रम्प महाशय तर सुरुवातीपासूनच चीनला दूषण देत असून त्यांची सर्व बाजूंनी नाकेबंदी करण्याची भाषा करत आहेत व आमचे संशोधन यशस्वी झाले, तर लवकरच त्यावरील लस, औषध उपलब्ध करण्याचा दावा करीत आहेत. लवकरच होऊ घातलेल्या या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी ते इच्छुक असल्यामुळे तर विरोधकांनी त्यांना ‘लक्ष्य’ ठरवीत त्यांची भडकलेल्या कोरोनाच्या विषाणूच्या आगीत वर्णद्वेषाच्या विषवल्लीचे तेल ओतीत प्रतिमा अधिक मलिन करण्याचा आटापिटा चालविला आहे.
अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करताना ट्रम्प यांनी दोन्ही गोष्टी गंभीरपणे हाताळाव्यात, असे सांगत पोलिस दलाने केलेली कारवाई दुर्दैवी असून, या देशातील पोेलिस दलाच्या कार्यपध्दतीत सुधारणेला विलक्षण वाव असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूने ट्रम्प-ट्विटर यांच्यातही जुंपली असून, अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये ट्विटर हस्तक्षेप करत असून त्याने भाषण स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली आहे, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र ट्रम्प यांचा आरोप दिशाभूल करणारा असून अशा मेलबॉक्सची चोरी होऊ शकते, असे ट्विटरने म्हटले आहे. दोन्ही गोष्टी काबूत येईपर्यंत हे असेच चालू राहणार आहे. मात्र यामुळे युरोप खंडाचे लक्ष अमेेरिकेकडे लागून राहिले आहे.
२५ मे रोजी जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येमुळे तर ही महासत्ता सपशेल आडवी पडली असेच म्हणावे लागेल. जॉर्ज फ्लॉईड या ४६ वर्षीय व्यक्तीची चूक काय तर त्याने एका दुकानातून काही खरेदी करून तो बाहेर पडला. त्याने दिलेली डॉलरची नोट बनावट असल्याचा संशय दुकानदाराला आल्याने दुकानदाराने तात्काळ पोलिसांना फोन केला. त्याबरोबर जॉर्जला रस्त्यात अडवून चॉवीन डेरेक नावाच्या गौरवर्णीय पोलिस अधिकाऱ्याने तो मरेपर्यंत त्याला मारले. जार्ज ती नोट आपल्याकडे कशी आली, ते सांगण्याचा प्रयत्न करीत होता, पण तो गौरवर्णीय पोलिस अधिकारी आणि त्याचे साथीदार काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. माझा श्‍वास गुदमरतोय, असे जॉर्ज वारंवार ओरडून सांगत होता. पण, त्या गौरवर्णीय पोलिस अधिकाऱ्याने आपला गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला तो जॉर्ज शेवटचा श्‍वास घेईपर्यंत त्याच्या मानेवरून आपला गुडघा हटवला नाही. भर रस्त्यावरच्या या ‘थर्ड डिग्री’चे पडसाद ताबडतोब सर्वत्र पसरले आणि कृष्णवर्णीयांनी सरकारचे हे कृष्णकारस्थान भलतेच लावून धरले आणि अमेरिकेत भीषण स्वरूपाच्या वांशिक हिंसाचाराने उसळी मारली. ‘न भूतो’ अशी जाळपोळ, लुटालूट आणि हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेला शेवटी नॅशनल गार्ड्‍सना रस्त्यावर उतरवावे लागले. कृष्णवर्णीयांमधील संतापाची लाट इतकी तीव्र होती व आहे की, सुरवातीपासूनचा रास्तारोको, पोलिसांवरील हल्ले, निदर्शने आदींमुळे धवल अमेरिकेचा शिरकाव आता काळ्या विश्‍वात झाला आहे. एखाद्या व्यक्तीवर असा जाहीर अन्याय होतो, त्या अन्यायाचे पर्यवसान हत्येत होते तेव्हा सरकार, प्रशासन आणि पोलिस यांच्या विरोधात जेव्हा संतापलेले लोक कसा रूद्रावतार धारण करू शकतात. याचा अनुभव सध्या महासत्ता घेत आहे.
जागतिक समतेच्या चळवळीचे जनकत्व आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याकडे जाते. त्यांच्या अहिंसेच्या व शांततेच्या पावलावर पाऊल ठेऊन मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आदि महापुरूषांनी इतिहास घडविला. पण सत्य, अहिंसा, शांततेसाठी लढणाऱ्या महात्मा गांधींची जशी हत्या झाली. तशी मार्टिन ल्युथर किंग यांचीही झाली. दक्षिण आफ्रिकेपासून समतेचे निशाण घेऊन वावरणाऱ्या गांधींना जसा तेथे अन्याय, छळ, सतवणूक यांचा सामना करावा लागला, तसा तो ‘काळा गांधी’ म्हणून गणल्या गेलेल्या मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेलांनाही करावा लागला. पण या त्रिमूर्तींचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी आपल्या तत्वापासून ते परावृत्त व्हायचे नाही, हे ब्रीद त्यांनी शेवटपर्यंत पाळले आणि याचा वचपा घेण्याचा एक मार्ग म्हणून की काय अमेरिकेतील या आंदोलनाच्या चळवळीत अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची मोडतोड व विटंबना झाल्याची बातमी समोर आली आहे. ही बातमी केवळ भारतीयांसाठी किंवा अमेरिकेतील कृष्णवर्णीयांसाठीच संतापजनक नाही, तर स्वातंत्र्य, समाज, बंधुता यावर विश्‍वास असणाऱ्या सर्वांसाठीच ती संतापजनक व खेदजनक आहे. जागतिक महासत्तेलाही याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. महामारीच्या आणि वर्णद्वेषाच्या महासंकटात सापडलेली महासत्ताही आज यामुळे महासंकटात सापडली आहे. जागतिक शांतिदूतांना यावर गंभीरपणे विचार करावा लागेल.

संबंधित बातम्या