जागर

Kishor Shantaram shet Mandrekar
बुधवार, 17 जून 2020

देशात केरळ राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक गोव्याचा लागतो. यावरून लक्षात घ्यायला हवे की ज्येष्ठ हे गोव्याचे आधारवड आहेत. त्यांचा सन्मान करायला हवा. त्यांची काळजी घ्यायला हवी. प्रत्येकाला वृध्दत्व येणार आहे, ते कोणाला चुकलेले नाही.

ज्येष्ठांना हवा आधार

---------------------------------------------

- किशोर शां. शेट मांद्रेकर

---------------------------------------------

कोरोनाच्या गेल्या काही महिन्यांच्या काळात एक घटक दुर्लक्षित राहिला आहे आणि तो म्हणजे ज्येष्ठ नागरिक. एरव्हीही ज्येष्ठ नागरिकांची कशी परवड होते हे आपण पाहत असतो. उतारवयात ज्यांना खरोखरच आपल्या मुलांकडून सांभाळण्याची आवश्‍यकता असते तिथे काही जणांच्या वाट्याला हाल येतात. आपल्याला त्यांनी मोठे केले, शिकवले, या जगात ताठ मानेने जगायला शिकवले, आपण त्यांच्या आधारामुळे कर्तेसवरते झालो याचा विसर काहीजणांना पडतो. यामुळे ज्येष्ठ काहीजणांना अडगळ ठरतात. गेल्या काही वर्षांत राज्यातही ज्येष्ठांना वाईट वागणूक दिली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्याविषयी पोलिस स्थानकांतही तक्रारी झाल्या आहेत. आपल्या वडिलांची संपती लाटून काही जणांनी त्यांना घराबाहेर काढल्याची उदाहरणेही आहेत. ज्यांनी आपल्या पोटाला चिमटा काढून वाढवले त्यांच्या तोंडचा घास उतारवयात पळवताना काहीजणांना काहीच वाटत नाही. असंवेदनशीलता आणि दुसऱ्याबाबतची कणव कमी झाली की तिरस्कारच राहतो. आजचा समाज हा याच ज्येष्ठांनी घडवला आहे. त्यांच्यामुळे आपण चांगले दिवस पाहू शकलो आहोत. ज्येष्ठ नागरिकांनी त्यावेळी खस्ता खाल्ल्या नसत्या, त्रास सोसले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसते. वडीलधारी माणसे आपल्या मुलांकडे, आप्तेष्ठांकडे अपेक्षा बाळगत नसतात. त्यांनी या लोकांसाठी जे काही केलेले असते ते निरपेक्ष भावनेने केलेले असते. त्यामागे त्यांचा स्वार्थ नसतो. आपले आई-वडील आपल्यासाठी अडचण असू नयेत. ज्यांनी उभ्या आयुष्यात केवळ आणि केवळ आपले हित पाहिले ते आपले अहित कशाला पाहतील. त्यांना आपली गरज जेव्हा असते त्यावेळी मुलांनी त्यांना मदत करायला हवी. मुलेच जर त्यांना अव्हेरू लागली तर त्यांना कोण आधार देणार? परंतु आज समाजात अशा काही संस्था आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतात. समाज काल्याण खात्याच्या उम्मीद योजनेंतर्गत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा पुरवल्या जातात. राज्यात काही भागात ज्येष्ठ नागरिकांचे संघ आहेत ज्याठिकाणी त्यांच्यासाठी वेळ घालवण्यासाठी तसेच आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम वगैरे करून घेतले जातात.
देशात केरळ राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक गोव्याचा लागतो. यावरून लक्षात घ्यायला हवे की ज्येष्ठ हे गोव्याचे आधारवड आहेत. त्यांचा सन्मान करायला हवा. त्यांची काळजी घ्यायला हवी. प्रत्येकाला वृध्दत्व येणार आहे, ते कोणाला चुकलेले नाही. आज आपण युवा पिढीसमोर ज्येष्ठांचा व्यवस्थित सांभाळ करून चांगले उदाहरण ठेवले तर यापुढे ज्येष्ठांच्या समस्या कमी होतील. सगळ्याच ज्येष्ठांना काही त्यांच्या कुटुंबियांकडून अथवा मुलांकडून वाईट वागणूक मिळत नाही. गोव्यात सुमारे ४० टक्के ज्येष्ठांची सतावणूक होत आहे, असा हेल्प एज इंडिया या संस्थेचा अभ्यास अहवाल सांगतो. हा प्रकार धक्कादायक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्येष्ठांना जर त्रास होत असेल तर राज्यात माणुसकी आटू लागली आहे का, असे विचारण्याची वेळ आली आहे. कुटुंबाकडून, समाजाकडून या घटकाकडे दुर्लक्ष झाले तर सामाजिक स्वास्थ्य बिघडणार आहे. ज्येष्ठांचे अनुभव आणि त्यांनी आजवर केलेली मेहनत यामुळे गोवा विकास करीत आहे. राज्य सरकारच्या ज्येष्ठांसाठी खास सेवा आहेत आणि योजनापण आहेत. त्या कोणाला मिळत नसतील तर त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. काही ज्येष्ठ नागरिक आजही श्रमाची कामे करताना आपल्या दृष्टीस पडतात. मिळकत कमी असल्याने आणि आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी हे कष्ट ते सोसत असतात. ज्या वयात आराम करायचा आणि मुलांनी ज्येष्ठांना सांभाळायचे दिवस येतात त्यावेळी ज्येष्ठांनाच कामाला जुंपून घ्यावे लागणे यापेक्षा वाईट गोष्ट नाही. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना अथवा पती पत्नीला पोलिसांमार्फत अत्यावश्‍यक सेवा पुरवण्याचा विचार पुढे आला होता. त्यांना लागणारी औषधे व इतर काही तातडीच्या वस्तू दिल्या जाणार होत्या. परंतु हा विचार काही पुढे फारसा गेला नाही. काही मुले आपल्या आई-वडिलांना घराबाहेर काढतात आणि त्यांचे घर, मालमत्ता हस्तगत करतात. पण हे चुकीचे आहे. कायद्यानेही अशा प्रकाराला मनाई आहे. पालकांचा सांभाळ करणारा कायदा अस्तित्वात आहे. त्यानुसार पालकांना त्रास करणे, त्यांची जबाबदारी न पेलणे, मुस्कटदाबी करणे आदी कारणांसाठी मुलांना, सुनेला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. पालकांचा सांभाळ करणे आणि त्यांच्या उतारवयात चरितार्थासाठी यथायोग्य मदत करणे हे मुलांचे कर्तव्य ठरते. या संदर्भातील काही खटल्यांमध्ये मुलांना शिक्षा झालेली आहे आणि पालकांना मदत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आपल्या मुलाने, सुनेने आपल्याला कितीही त्रास दिला तरी काही पालक तोंड उघडत नाहीत. तक्रारींचा सूर लावत नाहीत. ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’, असे म्हणत येणारे दिवस घालवतात. शिवाय आपल्या घराच्या चार भिंतीआड जे काही घडते ते बाहेर जाऊ नये, अशी त्यांची इच्छा असते. पण काही मुले कसलेली असतात. त्यांना पालकांबद्दल काहीच पडलेले नसते. घराबाहेर काढून आपण घरात बस्तान बांधायचे यातच काहीजण पुरुषार्थ मानतात. पालकांबद्दल ममत्व नसणे म्हणजे संवेदना बोथट होणे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांनाच वाऱ्यावर सोडणे, हा विचारच पटत नाही. कोरोनाच्या टाळेबंदीच्‍या काळात अनेक ज्येष्ठांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागले. ६५ टक्‍क‍े ज्‍येष्‍ठ नागरिकांची रोजीरोटीही या काळात बंद झाल्याचा निर्षष्क हेल्‍प एज इंडिया या संस्‍थेने देशपातळीवर केलेल्‍या सर्वेक्षणातून समोर आला आहे. टाळेबंदीच्‍या काळात ४२ टक्‍के वृध्‍दांच्‍या आरोग्याच्या समस्या वाढल्या. तर ७८ टक्‍के वृध्‍दांना जीवनावश्‍यक वस्‍तू मिळवण्यासाठी पराकाष्टा करावी लागली. आपल्‍याला कोरोना तर होणार नाही ना? मिळकतीचे साधन तर बंद होणार नाही ना? अशा एक ना अनेक प्रश्‍नांनी त्यांची झोप उडवली. या साऱ्याचा विचार केला तर एक भयानक सत्य आपल्यासमोर उभे राहते. वयोवृध्द नागरिकांनी कोणत्या आशेवर जगायचे? त्यांना धीर देण्यासाठी कोण पुढे येणार? ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला, आव्हाने पेलली त्यांना आपल्या आयुष्याच्या शेवटी आणखी किती बळ एकवटावे लागणार की जेणेकरून त्यांचे उर्वरीत आयुष्य सुखी होईल, समाधानाने ते अखेरचा श्‍वास घेऊ शकतील. प्रश्‍न केवळ त्यांच्या जगण्याचा किंवा मरण्याचा नाही. तर त्यांनी ‘जीवन’ का जगू नये? मुंबईत एक वयोवृध्द जोडपे एका फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांना मुले नव्हती. कोरोनाच्या काळात हे जोडपे प्रचंड दडपणाखाली होते. जगात, देशात काय घडत आहे ते टीव्हीवर बातम्यांच्या माध्यमातून पाहत होते. एक दिवस त्यांनी एक बातमी पाहिली. दोन परराज्यातील मित्र जे मजूर होते ते आपल्या गावी परतत होते. त्यातील एकाला सर्दी, खोकला होता. त्याला अशक्तपणा आला होता. त्यांच्या गावातील सर्वजण एका गाडीतून जात होते. कोरोनाच्या काळात अशी लक्षणे असणे म्हणजे कोरोनाची बाधा असू शकते. त्यामुळे इतरांनी त्याला गाडीतून उतरायला सांगितले. आपल्या गावाकडे परतलेल्या लोकांना हा आपल्यातला आहे याचा विसर कोरोनाच्या भीतीमुळे पडला होता. लोकांनी त्याला गाडीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्राला राहवेनासे झाल्याने तो त्याच्याबरोबर खाली उतरला. उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि पदरात पैसेही नव्हते. त्या मित्राने आजारी मित्राला एका ठिकाणी झोपवले. पण तिथेच त्याचा मृत्यू झाला... त्याच्या मदतीसाठी सोबत राहिलेला मित्र आता काय करणार... ही बातमी पाहून हे वयोवृध्द जोडपे हादरून गेले. आपण दोघेच आहोत आणि आपल्यापैकी कोणाला कोरोनाची बाधा झाली तर आपले पुढे कसे होणार... या चिंतेने त्यांना ग्रासले. शेजारी पाजारी त्यांच्याकडे यायचा प्रश्‍नच नव्हता. पण एक जण त्यांची विचारपूस अधूनमधून करायचा. त्याने या जोडप्याला काही दिवस संपर्क करायचा प्रयत्न केला तर कोणी प्रतिसाद देत नव्हता. काय झाले असावे, असा प्रश्‍न त्याच्या मनात डोकावला आणि एक दिवस त्याने त्या फ्लॅटवर जाऊन दारावरची बेल वाजवली. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने जोरजोरात बेल वाजवली आणि दरवाजावर धडक देताच, दरवाजा उघडला गेला. आतमधील दोघेही वृध्द शुष्क झाले होते. ते भयानक चिंतेत होते. त्यांची ख्यालीखुशाली विचारल्यावर मूळ प्रश्‍नाकडे लक्ष वेधताच त्यांनी कोरोनाचा धसका घेतला होता आणि त्यातील महिलेने आपले काही वाईट झाले तर मग पतीचे पुढे कसे होईल, या विचाराने मनाला लावून घेतले होते. त्यात ती पूर्ण खंगून गेली होती. आयुष्याच्या संध्याकाळी एकत्र जगत असताना आपल्यातील एकटा जग सोडून गेला तर आपले काय होईल, अशी चिंता अशा पती-पत्नीला सतावत असते. आपल्या अवतीभवती अशी काही वृध्द जोडपी असू शकतात. कोरोनाच्या भीतीने त्यांची जगण्याची उमेद हरवलेली असू शकते. अशा ज्येष्ठांना जगण्याचे बळ द्यायला हवे. त्यांना एकटेपणाची जाणीव करून न देता आम्ही आपल्यासोबत आहोत, असा विश्‍वास देण्याची गरज आहे. आपल्या शब्दातील ओलाव्याचा स्पर्श आणि ममत्व अनेकांना जगण्याचे बळ देऊ शकतो. ज्येष्ठांप्रती आदरभाव बाळगायला हवा. त्यांना समाजानेही आधार देण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या