मुलांची मने जपा, त्यांना सांभाळा

किशोर शां. शेट मांद्रेकर
बुधवार, 1 जुलै 2020

आपल्या परिसरात काय घडते, कोण अनोळखी वावरत आहेत. त्यांची नजर आपल्या अजाण मुलांवर तर नाही ना, याविषयी सतर्कता बाळगायला हवी. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण गोव्यात तर छोट्या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करण्याची प्रकरणे उघडकीस आली होती.

राज्यातील मुलांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. मुलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे आणि यात किशोरवयीन मुले फसतात, असा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. मुलांना लहान वयातच जपले पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला हवी. पण काही प्रवृत्तींमुळे ही मुले त्यांची शिकार बनत आहेत हे दुर्दैव आहे. गोव्यासारख्या प्रगत राज्यातही मुलांवर अत्याचार होतात हे वाईट आहे. राज्य सरकार मुलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक प्रकारे कार्य करीत आहे. तरीही मुले पीडित बनतात. यासाठी प्रत्येकाने दक्ष राहायला हवे. मुलांची योग्य ती काळजी घ्यायला हवी. आपल्या परिसरात काय घडते, कोण अनोळखी वावरत आहेत. त्यांची नजर आपल्या अजाण मुलांवर तर नाही ना, याविषयी सतर्कता बाळगायला हवी. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण गोव्यात तर छोट्या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करण्याची प्रकरणे उघडकीस आली होती. शालेय मुलींना फूस लावून नराधम अशी कृत्ये करतात, असेही घडलेले आहे. वास्कोत काही वर्षांपूर्वी गाजलेले अत्याचार प्रकरण आजही लोक विसरलेले नाहीत. पण त्याचा छडा काही शेवटपर्यंत लागला नाही. आरोपी मोकाट राहिले. काही शैक्षणिक संस्थांमध्येही मुलांवर अत्याचार झाल्याची उदाहरणे आहेत आणि त्याविषयी तक्रारी झाल्या आहेत, काही शिक्षकांना अटकही झाली आहे. केवळ मुलेच अशा अत्याचारांना बळी पडतात असे नाही तर काही महिला, मुलींचेही जीवन काही नराधमांच्यामुळे दु:खमय झालेले आहे. निभर्या प्रकरणानंतर तर देशात मोठा आक्रोश उठला. संतापाला अनावर राहिला नव्हता. पण हळूहळू त्यातील गांभीर्य कमी होत गेले. आपण लवकर सारे काही विसरतो, हा माणसाचा स्थायीभाव आहे. तसेही आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपल्या समस्यांकडेही पाहायला वेळ नसतो. माणूस स्वत:च्या जीवनाचे रहाटगाडगे फिरवताना सर्व काही विसरून गेलेला असतो. उद्याचा विचार करण्याचे नशिबी असल्याने आजची गोष्ट विसरून नव्याने सुरवात करण्यावरच सर्वांचे लक्ष केंद्रित होत असते. काही पालकांना तर आपल्या मुलांकडे पाहायला वेळ नसतो. त्यांचा अभ्यास सोडाच ते काय करतात, काय खातात इथेही काही पालक लक्ष देऊ शकत नाहीत. दोन्ही पालक काम करणारे असले तर मग आणखीच गोची होत असते. त्यातून मुलेही भरकटतात. पण आपल्या मुलांकडे वेळ दिला नाही तर त्यांची विचारपूस अन्य कोण करणार, याचा विचार पालकांनी करायला हवा. केवळ पैसा हे सर्वस्व नाही. आपण, आपले कुटुंब आणि मुले सुखी असतील तर घराला घरपण येईल. जीवन जगण्यासाठी पैसा हा हवाच. पैशांशिवायही काही गोष्टी मिळतात आणि त्या कुटुंबातील नातीगोती टिकवण्यास फारच उपयुक्त असतात याचा कधीही विसर पडू देता कामा नये. आपल्या माणसांबद्दलची आस्था, कणव आणि ममत्व यातून कुटुंब एकत्र येते. पण आज एकत्रित कुटुंब पध्दती बाजूला पडत आहे. यातू्न माणसामाणसांत दुरावा निर्माण होत आहे. पूर्वी पालक आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ द्यायचे. आता ते सगळ्याच पालकांना जमत नाही. तरीसुध्दा काही पालक आपल्या मुलांसाठी खास वेळ देतात. आपल्या करिअरचा त्याग करणारेही पालक आहेत. सर्व काही आपण मुलांसाठी करतो, असे जेव्हा म्हणतो तेव्हा आपण मुलांसोबत किती वेळ असतो. त्यांच्यासाठी खास वेळ काढतो का, असा प्रश्‍नही स्वत:ला प्रत्येकाने विचारायला हवा. आपली शाळेत जाणारी मुले वेळेवर शाळेत पोहचतात का, ती वेळेवर घरी येतात का, त्यांना एखाद्या ताणतणावाने ग्रासले आहे का, असे अनेक प्रश्‍न पालकांनी आपल्या मनाला विचारायला हवे आणि नंतर आपल्या मुलांना विश्‍वासात घेत असे प्रश्‍न त्यांच्या आयुष्यात असतील तर त्यावर उतारा काढायला हवा. असा प्रयत्न आपण केला तर बरेचसे प्रश्‍न सुटतील आणि आपली मुले हसत खेळत जीवन जगतील. वयात येतानाही मुलांना जपायला हवे. त्यांच्यात होणारे बदल सूक्ष्मपणे पालकांनी हेरायला हवेत. पालकांशिवाय अन्य कोणीही आपल्या मुलांमध्ये होणारे बदल हेरू शकत नाही. पण त्यातील सत्य पचवण्याची पालकांमध्ये ताकद असायला हवी. अनेकदा पालक आपल्या मुलांमधील दोष, अवगुण लपवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतात. कोणीही आपल्या मुलांबाबत काही वेगळे वा वंगाळ सांगितले तर पालक त्यावर विश्‍वास ठेवत नाहीत. उलट इतरांनाच दोष देत बसतात. दुसरा कोणी आपल्या मुलांविषयी काहीतरी सांगत असेल तर त्याची खातरजमा करायला हवी. त्यातून काहीतरी हाती लागू शकते. तसे झाले तर मग आपली फसवणूक आपण करून घेऊ शकणार नाही. गोव्यात किशोरवयीन मुलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढल्याचे ‘व्हीएयू’ संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. लहान मुलांवर विविध प्रकारे अत्याचार होतो. ११ ते १५ या वयोगटातील मुले ही अधिकतर टार्गेट होतात. लहान मुले अजाण असतात. ती सहज कोणावरही विश्‍वास ठेवतात आणि तिथेच त्यांचा घात होतो. अशा अल्पवयीन मुलांवर डोळा ठेवून कुकर्म करणारे महाभागही काही कमी नाहीत. या अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे अगदी लहान वयात गर्भधारणा झालेल्या मुलींची संख्या चक्रावणारी आहे. आपल्याला चांगली पिढी घडवायची असेल तर आपणच दक्ष राहायला हवे. आपल्या अवतीभोवती दुष्ट माणसे आहेत त्यांना हेरून आपण अशा दृष्प्रवृत्तींनाही वठणीवर आणायला हवे. मुलांचे आयुष्य बरबाद करायला टपलेल्यांना वेळीच ठेचले पाहिजे. कोवळ्या मुलांना हेरून त्यांच्यावर अत्याचार करणारे नराधम आहेत. त्यांना सैल सोडता कामा नये. अशा प्रवृत्तींच्या आमिषांना बळी पडू नये म्हणून मुलांमध्ये जागृती करायला हवी. शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ देण्यासाठी त्यांना धाडसी आणि हुशार बनवण्याची आज गरज आहे. बाल हक्क समिती याकामी अधिक प्रभावी काम करू शकतील. पालकांनीही डोळस बनायला हवे. आपल्या आसपास कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर त्याला हेरून त्याच्यावर कारवाई होईल हे पाहायला हवे. असे झाले तर कोणीही मुलांवर वक्रदृष्टीने पाहणार नाही. आपल्या मुलांच्या सान्निध्यात कोण असतो, त्यांचे मित्र कोण, त्यांचे येणे-जाणे कोणाबरोबर असते, त्यांची ऊठबस कशी असते यावरही बारीक लक्ष असायला हवे. आपल्यासमोर मुलांचे सुरक्षित भवितव्य कसे राहील हा प्रश्‍न राहता कामा नये. आपण, साऱ्या समाजाने मुलांच्या रक्षणासाठी सज्ज राहायला हवे. आपण सुसंस्कृत आहोत. मुले ही आपले तसेच देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे मुलांना जपायला हवे, त्यांना सांभाळायला हवे. येथे पालकांची मोठी जबाबदारी आहे. आपण पालक म्हणून कमी पडणार नाही आणि मुलांना ती एकटी आहेत असे वाटणार नाही, यासाठी पालकांनी कसोशीने प्रयत्न करायला हवेत. युवा पिढी सशक्त आणि सुदृढ बनायला हवी यासाठीचे पोषक वातावरण तयार करण्याची जबाबदारी समाजाचीही आहे. केवळ पालकांनीच त्यासाठी प्रयत्न करून चालणार नाही. मुलांना मुक्त वातावरणात आणि निर्भिडपणे समाजात वावरण्यासाठीचे सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी सरकारनेही पावले उचलायला हवीत. तसे झाले तर कोवळी मुले मोकळा श्‍वास घेऊ शकतील.

संबंधित बातम्या