टंगळ-मंगळ: पैसा..पैसा..!

विजय कापडी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

पैशाचं एक असं असतं की, पैसा कुणाच्याच मागं धावताना दिसत नाही. उलट इतर सारेच पैशाच्या मागं धावताना दिसतात. पण, म्हणून काही पैसा धावणाऱ्याच्या हातात सहजासहजी येतो थोडाच? त्याच्या मागं धावणाऱ्यांना पैसा चकवाच अधिक प्रमाणात देताना दिसतो.

बाप भला ना भैय्या भैय्या, सबसे बडा रुपैया’ म्हणतात ते काही खोटे नाही. जगात पैसा हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि पैशांसमोर सगळं काही कुचकामी आहे, असं मानणाऱ्याचा फार मोठा वर्ग केवळ आपल्याकडंच नाही, तर संपूर्ण जगात आहे, असं विधान करायला फार मोठं धाडस लागणारच नाही. कारण, ते एक पूर्ण सत्यच म्हणायला हवं. पैशाचं एक असं असतं की, पैसा कुणाच्याच मागं धावताना दिसत नाही. उलट इतर सारेच पैशाच्या मागं धावताना दिसतात. पण, म्हणून काही पैसा धावणाऱ्याच्या हातात सहजासहजी येतो थोडाच? त्याच्या मागं धावणाऱ्यांना पैसा चकवाच अधिक प्रमाणात देताना दिसतो.

पैशाचं एक रोखठोक म्हणणं आहे बऱ्यापैकी मेहनत करा, डोक्यातला मेंदू चांगल्या कामी खर्ची घाला, योग्य ते जमेल ते शिक्षण घ्या. एवढं केलंत तर मी तुमचाच आहे. तुमच्या पायाशी लोटांगण घालायलाही तयार आहे. पण ग्यानबाची म्हणतात ती मेख इथंच तर आहे. बऱ्याच जणांचं असं एक मत आहे की. पैशाच्या प्राप्तीसाठी घाम गळावा लागला, मेंदू तासायला घ्यावा लागला, तर त्यात मजा ती काय राहिली? काही न करता म्हणजे हातावर हात आणि पायावर पाय ठेवून बसलेल्या स्थितीत पैसा आपसूकच चालून आला, तर त्याची मजा काही औरच. पण, अशी मजा सहजासहजी चाखायला मिळाली असती, तर आणखी काय हवं होतं? हां. आता जन्मतःच तोंडात चांदीचा वा सोन्याचा चमचा आपसूकच उगवला, तर गोष्ट वेगळी. राजघराण्यांत जन्माला आलेले काही अल्प असेही असतात. पण, आपसूक मिळालेली संपत्ती टिकवून ठेवण्याचं महाकठीण कामाचं काय? अहो, संपत्ती म्हटली की तिच्यावर डोळा ठेवून असणारे काय कमी असतात काय?

पैसा कमावण्याची वेगळी क्लुप्ती लढवणारेही काही कमी नसतात. त्यांच म्हणणं असतं की, ‘पराया माल अपना’. दुसऱ्याला चुना लावून म्हणा वा टोपी घालून त्याच्या खिशातला पैसा आपल्या खिशात अलगद येऊन पडेल, याची चोख व्यवस्था करणारेही महाभाग असतात. भागिदारीच्या व्यवसायात एकाचा पैसा असतो आणि दुसऱ्याची असते व्यवसाय चालवण्याची केवळ कल्पना. ही कल्पना पूर्णत्त्‍वास गेलेली दिसते, त्यावेळी एकच घडते. पहिल्याचा पैसा दुसऱ्याच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात त्यांना जसजसे यश मिळत जाते, तसतसे ते निर्ढावतात. काहीसे बेफिकिर बनतात आणि एखाद्या गाफीलक्षणी पकडले जातात. अशा घोरप्रसंगी त्यांचे हाल खायला कुत्रादेखील तयार नसतो. ‘पाब्लिक’ नावाचा एक सदा त्रासलेला, हैराण झालेला वर्ग अशा भुरट्या चोरांची अशी काही घुलाई करायला घेतो की, त्यांच्या मारापुढे पोलिस कोठडीतला मार म्हणजे ‘किस झाडकी पत्तीच!’ मुंबईतल्या लोकलगाडीत चोर सापडला तर तो मार तर खातोच पण पुढचे स्टेशन येता येता त्याच्या अंगावरचे कपडे काढून त्याला पृथ्वीतलावर बालावस्थेत जन्माला येताना जी स्थिती असते त्या पूर्वपदी आणून ठेवतात. काहीजण बड्या गुन्हेगाराचे हस्तक म्हणा वा चमचे होणे पसंत करतात. त्यानं फेकलेल्या तुकड्यांवर जगणं त्यांना आवडतं. इतरही अवैध मार्ग सांगता येतील. पण, त्यातला एक मार्ग म्हणजे नोटांचा छापखानाच सुरू करायला घेणं. हुबेहुब खऱ्या नोटांसारख्याच दिसणाऱ्या नोटा तयार करणे, हा त्यांच्या हातांचा मळच असतो. अल्पावधीत तयार होणाऱ्या या बनावट नोटा बाजारात खपवायला घेणे, ही या व्यवहारातली सर्वांत मोठी डोकेदुखीच. पण, आपल्याकडं असेही काही असतात जे या बनावट नोटा खपवतात आणि थोडाफार पैसाही कमावतात. आपल्या या छोट्याशा गोवा नावाच्या राज्यात काहीही चालते वा चालू शकते, या समजाच्या आधारे गेल्या काही दिवसांत बनावट नोटांनी भरलेली बॅग घेऊन पाचजणांची एक टोळी आपल्याकडं उतरली. सहजासहजी कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांनाही आणले आणि बनावट नोटांच्या आधारे ‘जिवाचा गोवा’ करू पाहिला. पण, हायरे त्यांच्या कर्मा! विचारे ? पकडले गेले सध्या पोलिस कोठडीची हवा खात आहेत! पैशांचा हव्‍यास वाईट म्‍हणतात, तो उगाच नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या