तरंग

Avit Bagle
गुरुवार, 9 जुलै 2020

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत संघ चालक सुभाष भास्कर वेलिंगकर आता एका नव्या भूमिकेत शिरण्यासाठी सज्ज झाले आहेत. ती भूमिका स्वतःच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केली आहे. भारत माता की जय या संघटनेने (ज्याची स्थापना संघ सोडल्यावर समांतर संघ म्हणून वेलिंगकर यांनीच केली आहे) ही दिलेली जबाबदारी, असे वेलिंगकर यांचे म्हणणे आहे.

समाजकारण नि राजकारण मिश्रित वाट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत संघ चालक सुभाष भास्कर वेलिंगकर आता एका नव्या भूमिकेत शिरण्यासाठी सज्ज झाले आहेत. ती भूमिका स्वतःच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केली आहे. भारत माता की जय या संघटनेने (ज्याची स्थापना संघ सोडल्यावर समांतर संघ म्हणून वेलिंगकर यांनीच केली आहे) ही दिलेली जबाबदारी, असे वेलिंगकर यांचे म्हणणे आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंच, गोवा सुरक्षा मंच या मंचांवरून आपण जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी करू याचा जाब जनतेला वेलिंगकर देतीलच, अशी अपेक्षा करून त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या मुद्यांकडे लक्ष देऊया. त्यांनी सांगितले, की गोव्यातील हिंदू विशेषतः परराज्यातून गोव्यात स्थायिक झालेला हिंदू संकटात आहे. परप्रांतीय हटाव म्हटले जाते तेव्हा केवळ हिंदूनाच लक्ष्य केले जाते. या साऱ्याविरोधात आवाज उठवण्यासाठी हिंदू संस्था संघटनांचे संघटन आवश्यक आहे. सवयीप्रमाणे, वेलिंगकर यासाठी झोकून देऊन कामही करतील पण प्रश्न आहे तो एकंदरीत सामाजिक विश्वासार्हतेचा.
भारतीय भाषा सुरक्षा मंचावेळी मराठी आणि कोकणीचा पुरस्कार एकाचवेळी केल्याने समाजातील एक मोठा वर्ग त्यांच्यापासून दुरावला आहे. त्यामुळे चारित्र्य स्वच्छ असूनही ते नको त्यांच्या संगतीत आहेत म्हणून त्यांना गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार म्हणून मतदान न करणारे अनेक होते हे आता तरी वेलिंगकर यांनी जाणून घेतले पाहिजे. मराठीसोबत कोकणी किंवा कोकणीसोबत मराठी असे तळ्यात-मळ्यात करत राहिल्यास हेतू कितीही प्रामाणिक असला तरी वेलिंगकर यांना अपेक्षित असलेल्यांचा पाठिंबा मिळणार नाही हे त्यांनी आतातरी ओळखले पाहिजे. त्यांनी कोणती तरी एक पताका खांद्यावर घ्यावी. मराठी विरुद्ध कोकणी हा वाद संपलेला नाही आणि तो संपणारही नाही, तो उफाळून येत नाही हेच सत्य आहे.
हे झाले त्यांनी कोणाला सोबत घ्यायचे आहे याविषयी. मात्र मूळ विषय आहे तो वेलिंगकर यांनी धार्मिक सलोख्याबाबत मांडलेल्या मुद्याचा. त्यांनी राज्यात कोविड टाळेबंदीपूर्वी झालेल्या नागरिकत्व कायदा दुरुस्ती विरोधात झालेल्या आंदोलनाचा हवाला देत अराष्ट्रीय, दहशतवादी तत्त्वे गोव्यात शिरल्याचा दावा केला आहे. त्यात तथ्य आहे. राज्यात बांगलादेशी पकडले गेले, गोवा देशापासून तोडण्यासाठी याचिकेवर हजारोजण सह्या करतात त्यावेळी या शक्तींनी केव्हाच शिरकाव केला आहे हे स्पष्ट होते. मात्र त्यांचा विरोध करण्यासाठी केवळ हिंदूंचे संघटन हा युक्तिवाद पटण्यसारखा नाही. हिंदू सहिष्णू होते व आहेत. त्यामुळे गोव्यात ख्रिस्त्यांनी केलेले अत्याचार सोसूनही त्याविषयी कटुता आजच्या हिंदू पिढीत नाही. मात्र त्यांची ही सहिष्णुता म्हणजे दुर्बलता असे पाहिले जात आहे. त्याविरुद्ध संघटन करून सामाजिक शांततेस म्हणजेच त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास धार्मिक सलोख्यास तडा जाणार नाही याची दक्षता कोण घेणार? खरेच धार्मिक सलोखा आहे म्हणजे मूग गिळून हिंदू गप्प आहेत हे वास्तव आहे का? हेही तपासले पाहिजे. मात्र राजकीय भूमिकेतून माघार घेत सामाजिक भूमिकेत शिरण्याच्या वेलिंगकर यांच्या भूमिकेला आणखीन काही पदर आहेत का हेही तपासले पाहिजे. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल, असो.
मुळात गोमंतकीय समाज एकजिनसी होता, देशभरात धार्मिक सलोखा म्हणून ज्याचा उदोउदो केला जातो तसा तो नाही हे आधी मान्य केले पाहिजे. गोवा मुक्तीनंतर कुडचड्यातील अलीकडच्या काळातील एखाद दुसऱ्या दंगलीचा अपवाद वगळल्यास धार्मिक दंगली उसळल्या नाहीत तरी धार्मिक तेढ, तिटकारा नाही असे म्हणणे चुकीचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे दुसऱ्या धर्मात काय चालले आहे यात डोकावण्याची वृत्ती कमी झाल्यामुळे आपोआपच त्या जीवनशैलीला धार्मिक सलोख्याचा मुलामा चढवला गेला आहे इतकेच. या साऱ्याची बिजे थेट गोवा मुक्तीनंतर रुजली गेली आहेत. डिसेंबर १९६३ मध्ये म्हणजे गोवा मुक्तीनंतर दोन वर्षांनी पहिल्या गोवा, दमण व दीव विधानसभेसाठी निवडणूक झाली. त्या आधी प्रथम युनायटेड गोअन्सच्या झेंड्याखाली पोर्तुगीज राजवटीत ज्यांचे हितसंबंध उत्तम प्रकारे सांभाळले जात होते, तो वर्ग आणि विलीनीकरणाच्या संभाव्यतेचा धसका घेतलेले इतर सगळे एकवटलेले होते. त्याविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून विलीनीकरणाचा पुरस्कार करणारे महाराष्ट्रवादी गोमंतकच्या झेंड्याखाली एकवटले होते. ही गोव्यातील लोकांमध्ये धार्मिक तत्त्वावर पडलेली फूट नव्हती. दोन्ही पक्ष शिष्टाचाराच्या मर्यादा, काही अपवाद सोडल्यास, ओलांडण्याचे टाळत असत. मगो पक्षाचा विजय आणि दयानंद बांदोडकर मुख्यमंत्री झाले याबाबत एका वर्गामध्ये राग व असूया दोन्ही होती.
वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत पॉप्युलर फ्रंटसोबत चर्चने एकत्रित मंचावर येऊ नये, असे आवाहन केले आहे. चर्च पूर्वी शैक्षणिक क्षेत्रात होती. गोवा मुक्तीनंतर चर्चचे कार्य फक्त शिक्षण क्षेत्रापुरतेच मर्यादित राहिले नाही. चर्च मगो पक्षाची व बांदोडकर सरकारची मुख्य विरोधक म्हणून राजकारणात अप्रत्यक्षपणे वावरू लागली. मगो सरकारने लागू केलेल्या जमीन सुधारणांच्या विरुद्ध कार्य करू लागली. वस्तुतः कूळ व मुंडकार कायद्यांचा फायदा हिंदूंबरोबर कूळ मुंडकार म्हणून वेठबिगारी करणाऱ्या ख्रिस्ती बांधवांनाही मिळाला होता. नंतर बाणावलीतून मगोच्या उमेदवारीवर एक ख्रिस्ती युवक मगोचा उमेदवार म्हणून उभा राहिला आणि निवडून आला. तो चर्चच्या जमीनसुधारणांस विरोध करण्याच्या भूमिकेचा परिणाम म्हणून. मगोची जागा नंतर भाजपने घेतली. मात्र चर्चची भूमिका कायम राहिली. मध्यंतरी त्यांनी जुळवून घेतल्यासारखे केले असले तरी त्यांचे खरे रूप नंतर प्रकट झाले होतेच. त्यामुळे सामाजात पडलेली दरी रुंदावतच गेली आहे हे निखळ सत्य आहे.
गोव्याच्या मुक्तिलढ्यात सर्व जाती, धर्माच्या राष्ट्रीय वृत्तीच्या लोकांचा सहभाग होता व त्यात ख्रिस्ती लोकांची संख्या लक्षणीय होती हे खरे असले तरी कॅथोलिक चर्चच्या प्रभावामुळे संपूर्ण ख्रिस्ती वर्ग गोव्याच्या मुक्तीस अनुकूल नव्हता, असे सांगितले जाते. कॅथॉलिक चर्च संघटनेची भूमिका तर पोर्तुगीज राजवटीस समर्थन देण्यासारखी राहिली होती असा संशय घेण्यास जागा घेणारी होती. भारत सरकारने चौदा वर्षे वाट पाहून अखेर गोवा मुक्त करण्यासाठी लष्करी कारवाई केली. गोव्याच्या मुक्तीनंतर कॅथॉलिक समाज युनायटेड गोअन्स या राजकीय संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आला. भाऊसाहेब बांदोडकर यांनी चर्चचा हा डाव उघडकीस आणला. त्यांची ही मुलाखत ब्लिट्‌झ या इंग्रजी साप्ताहिकाच्या २४ मार्च १९६४ च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. त्याचा संदर्भ देऊन तत्कालीन पत्रकार किचनेर डिकॉस्ता यांनी भाऊसाहेबांना लिहिलेले पत्र सरकार दप्तरी आजही आहे. या मुलाखतीवरून लोकसभेत गदारोळ माजला होता. किचनेर यांनी या पत्रात The catholic against the 20th century हे अॅव्हरो मॅनहॅटन या लेखकाचे पुस्तक वाचा असा सल्ला संदर्भादाखल दिला आहे. पुरुषोत्तम काकोडकर यांच्या काळात कॅथोलिक चर्चशी काँग्रेसने हातमिळवणी केली होती. त्यानंतर आजतागायत चर्चने काँग्रेसला पूरक अशी मतदार साक्षरता भूमिका घेतली आहे हे सर्वश्रुत आहे. त्यानंतरही राजकारणात फारसा बदल झालेला नाही. मगोची पिछेहाट आणि भाजपचा उदय याला वेलिंगकर स्वतः साक्षीदार आहेत. त्यांच्याच म्हणण्यानुसार त्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे वेलिंगकर यांना हिंदू संघटनांकडे लक्ष देतानाच या विरोधातील प्रवृत्तीच्या पाळामुळांकडे दुर्लक्षही करता येणारे नाही.

संबंधित बातम्या