गोव्याच्या राजकारणाचे काही खरे नाही!

Shambhu Bhavu Bandekar
शुक्रवार, 10 जुलै 2020

इतिहासाचा मागोवा घेताना आपल्या लक्षात एक गोष्ट प्रकर्षाने येते ती म्हणजे देशभरातील गोवा हे एक असे राज्य आहे की, पक्षांतराच्या राजकारणाची कीड फार पूर्वीपासून येथील राजकारणात पाय पसरून आहे. याला जसे नवे आमदार बळी पडलेले आहेत तसेच जुने-जाणते मंत्रिपदावर आरूढ झालेले, सत्ता-संपत्तीत आकंठ बुडालेलेही आहेत.

लेखक - शंभू भाऊ बांदेकर

गोव्यातील एखाद्या सर्वसामान्य माणसापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत साऱ्यांनी गोव्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाही असे टाहो फोडून सांगितले, तरी खरी गोष्ट आता सर्वांनाच कळून चुकली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपणा सर्वांना कोरोना विषाणूच्या भयानेच दिवस काढायचे आहेत. आणि अर्थातच स्वतःची, कुटुंबियांची आणि हितसंबंधितांची अधिक कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. सरकारकडून जी निर्धास्तता व भरवसा मिळायला हवा होता तो आज मिळालेला नाही. त्यामुळे ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ हा मंत्र जपतच आपल्याला पुढचे दिवस देवावरच भरवसा ठेवून काढावे लागणार आहेत. कारण आमचे गोवा सरकार कोरोनाच्या महामारीवर उपाय योजणार की गोव्यातील पक्षांतराच्या महासंकटाच्या महमारीवरून आपले सत्तेचे तारू योग्य अशा वारुवर स्वार होऊन तडिपार नेणार यातच सध्या जास्त मश्‍गूल आहे, असे वाटते.
सर्वोच्च न्यायालयाचा मणिपूर राज्याच्या विधानसभेचा निर्णय आल्यापासून गोव्यातही राजकीय खलबते पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. कारण मणिपूर विधानसभेबाबत जो निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, तो आपल्या गोवा विधानसभेलाही लागू पडणारा आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधून फुटून गेलेले दहा आमदार व मगो पक्षातून फुटून गेलेले दोन आमदार अशा बाराही आमदारांना आपले लवकरच बारा वाजतील अशी मनोमन खात्री पटलेली दिसते त्यामुळे `तेलही गेले तूपही गेले, हाती धुपाटणे आले’ अशा मानसिक नैराश्यात त्यांचे जगणे सुरू आहे.
भाजपमध्ये जाण्यासाठी गोवा फॉरवर्डचे दोन आमदार विनोद पालयेकर व जयेश साळगावकर बाशिंग बांधून उभे आहेत. ही गुप्त बातमी अवघ्या दोन दिवसांत बाहेर आली व मग सगळे पितळ उघडे पडले. कॉंग्रेसमधून व मगोमधून फुटून गेलेल्या आमदारांवर जी टांगती तलवार आहे, त्याच तलवारीच्या धारेवरून तुमचा राजकीय प्रवास सुरू होईल असे ठामपणे गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी ठणकावून सांगताच अर्थातच दोघांचेही धाबे दणाणले नसते तरच नवल! त्यामुळे सध्यातरी त्यांचे आमदारकीचे राजीनामे किंवा त्यांचे पक्षांतर हा फुसका बार ठरणार आहे, असे मानले जात आहे.
इतिहासाचा मागोवा घेताना आपल्या लक्षात एक गोष्ट प्रकर्षाने येते ती म्हणजे देशभरातील गोवा हे एक असे राज्य आहे की, पक्षांतराच्या राजकारणाची कीड फार पूर्वीपासून येथील राजकारणात पाय पसरून आहे. याला जसे नवे आमदार बळी पडलेले आहेत तसेच जुने-जाणते मंत्रिपदावर आरूढ झालेले, सत्ता-संपत्तीत आकंठ बुडालेलेही आहेत. या सर्वांमागे फक्त दोनच गोष्टी प्रामुख्याने आहेत. या दोन गोष्टी म्हणजे सत्तेची खुर्ची आणि संपत्तीची वारेमाप हाव! या दोन्हींच्या बळावर कार्यकर्ते सांभाळता येतात ही रणनीती ते पक्की करतात व जनतेची माकडचेष्टा करत आपण इथून-तिथे, तिथून-इथे माकडउड्या मारीत रहातात, मग हे नेते काय किंवा त्यांचे कार्यकर्ते काय त्यांना एकदा उष्ट्या पत्रावळीची चव वाटायला लागली की मग ताजे अन्न त्यांना गोड लागत नाही. अशावेळी सूज्ञ माणसाला एकच वाटते की, जोपर्यंत यांच्या मानेभोवती अपात्रतेचा विळखा उत्तमप्रकारे आवळला जाणार नाही, तोपर्यंत यांच्या माकडचेष्टा व माकडउड्या तशाच चालू रहाणार आहेत व छोट्या-मोठ्या कामात समाधान मानणारे कार्यकर्तेही त्यांना मिळत जाणार आहेत किंवा मतदारांना वेठीस धरणारे त्यांचे एजंट त्यांचे काम सोपे करणार आहेत. आणि म्हणून एक गोष्ट प्रामाणिकपणे वाटते की जोपर्यंत कुठल्याही राज्यातील किंवा केंद्रातील पक्षांतर पूर्णतः बंद होणार नाही तोपर्यंत कुठल्याही राज्याच्या राजकारणातील किंवा देशातील राजकारणात खऱ्या अर्थाने बदल होणार नाही. सुधारणा होणार नाही. मुख्य म्हणजे आमदारकीचा राजीनामा देऊन सहीसलामत सत्ता-संपत्तीचे राजकारण करणाऱ्यांकडून जोपर्यंत सारा खर्च सव्याज वसूल केला जात नाही आणि जोपर्यंत जनताजनार्दनाचा विश्वासघात केल्याप्रकरणी पूर्ण पाच वर्षे पुढील निवडणुकीत बंदी घातली जात नाही तोपर्यंत ही धरसोडीची पक्षांतरे घडतच राहतील व सत्ता व संपत्ती-ऐश्‍वर्याच्या जोरावर राजकारणी इतरांना नीतिमत्तेचे डोस पाजवित राहतील.
येथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे सुरुवातीच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा सर्वत्र पसरविणारा भारतीय जनता पक्ष आता ना केंद्रात राहिला आहे कि ना अनेक राज्यांमध्येही राहिला आहे आणि अर्थातच गोवाही त्याला अपवाद नाही. आता हेच पहाना साळगावचे आमदार जयेश साळगावकर भाजपच्या उंबरठ्यावर उभे राहिले तेव्हा तेथील माजी भाजपा आमदार दिलीप परुळेकरच नाराज झाले असे नाही. तर त्या मतदारसंघातील भाजपा कर्यकर्तेही नैराश्याच्या गर्तेत लोटले गेले. शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर जेव्हा भाजपाचे दार ठोठावू लागले तेव्हा भाजपाचे तेथील माजी आमदार दयानंद मांद्रेकरच निर्दयानंद बनले नाहीत, तर इतकी वर्षे त्यांना व पर्यायाने भाजपाला साथ देणारे कार्यकर्तेही दिङमूढ झाले. या साऱ्यांना वाटत असावे की आमचा भाजपा आता तत्त्वनिष्ठ राहिला नसून खुर्चीच्या सत्तेच्या राजकारणासाठी तत्त्वच्यूत बनू पाहत आहे. आतापर्यंत कम्युनिस्ट पक्षाचा अपवाद वगळता साऱ्या पक्षांनी जे केले, करत आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता भाजपा आपली वाटचाल करू लागला आहे. यामुळे भाजपा खऱ्या अर्थाने ‘बळकट’ होईल की त्यांचे ‘बळ’ ‘कट’ होईल याचा गंभीरपणे विचार करणे हे त्यांच्या हिताचे ठरणार आहे. मुळात भक्कम राजकीय पाठबळ असूनही येथील भाजपा हे सारे कशासाठी करत आहे? अशामुळे स्थिर असलेला भाजपा व त्या पक्षाचे मंत्रिमंडळ अस्थिरतेकडे तर कूच करत नाही ना? हा लाख मोलाचा प्रश्न आहे. कारण आतापर्यंतचा गोव्याच्या राजकारणाचा इतिहास तपासून पाहिला तर येथील राजकारणाचे काही खरे नाही हे पटू लागते. ऐन विधानसभेच्या अधिवेशन काळात काय होईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहण्यासारखी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, हे नाकारून चालणार नाही.

संपादन हेमा फडते

 

 

 

संबंधित बातम्या