‘दो गज दूरी’तला घरचा गणपती

सुहासिनी प्रभुगांवकर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

घरचा गणपती हे गोव्याचे वैशिष्ट्य आणि या वैशिष्ट्यालाच यंदा अधिक महत्त्व आले आहे. कोरोनाच्या सावटातही गजाननाच्या स्वागतासाठी गोमंतकीय सज्ज झाले आहेत. ज्येष्ठ घरी असतील त्या कुटुंबात फेब्रुवारी २०२१ सालातील गणेशजयंतीचा मुहुर्त पकडण्यास हरकत नसल्याचा सल्ला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिला तो थोडा विलंबानेच.

सुहासिनी प्रभुगांवकर

गणेशचतुर्थी, गोमंतकीयांची `चवथ` म्हणजे आनंदाचे भरते. काय करायचे नाही ते सांगूच नका... फक्त आणखी किती, कसे करावे ते सांगा हेच शब्द. आठ दहा दिवसांपासून खरेदीची धावपळ, घराघरांतून करंजा तळल्याचा दरवळ, हरितालिकेच्या आदल्या रात्री जागून केलेली सजावट, बांधलेली माटोळी, उरलेले काम हरितालिकेदिवशी संध्याकाळी, तोपर्यंत बाप्पा तोंडावर टोपरे घालून घरी येऊन कोपऱ्यात विराजमान झालेले. दुसऱ्या दिवशी पहाटे फटाक्यांच्या आवाजात गणपतीबाप्पा मखरात पाटावर स्थानापन्न होईपर्यंतच नव्हे तर विसर्जनावेळी बाप्पा मोरया म्हणेपर्यंत उसंत नाहीच.
घरचा गणपती हे गोव्याचे वैशिष्ट्य आणि या वैशिष्ट्यालाच यंदा अधिक महत्त्व आले आहे. कोरोनाच्या सावटातही गजाननाच्या स्वागतासाठी गोमंतकीय सज्ज झाले आहेत. ज्येष्ठ घरी असतील त्या कुटुंबात फेब्रुवारी २०२१ सालातील गणेशजयंतीचा मुहुर्त पकडण्यास हरकत नसल्याचा सल्ला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिला तो थोडा विलंबानेच. प्रत्येक समाजाच्या स्वामींनी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून गणेशचतुर्थीसाठी फेब्रुवारीच्या मुहुर्तासाठी मानसिकता घडवली आहे. फेब्रुवारीत गणेशचतुर्थी करणारे नक्कीच असतील पण भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा मुहुर्त पाळणारेही आहेत.
घरी चतुर्थीचा आनंद लुटा, मोदक करंज्यांचे सेवनही करा, पातोळ्या, खतखतेही खायलाच हवे, आरत्याही व्हायलाच हव्या. परंतु सगळे करताना एकमेकांपासून दोन मीटरचे अंतर ठेवून उभे राहा, बसा आणि हो... मास्कही घाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही ‘दो गज दूरी’चे महत्त्व कथन केले आहे आणि तिचे पालन गणेशचतुर्थीत शिस्तीने केल्यास नंतर आपल्यावर पश्चातापाची पाळी येणार नाही.
मास्क घातला आणि दो गज दूरीला टांग दिली, गर्दी केली, दाटीवाटीने उभे राहिल्यास, बसल्यास आपत्ती ओढवू शकते. त्याचा अनुभव माजी आमदार जुझे फिलीप डिसोझा यांच्यासारख्या नेत्यांनी घेतला आहे. सगळ्या नियमांचे पालन करूनही करोनाशी त्यांना दोन हात करावे लागले ते त्यांच्या भावाच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीमुळे हे त्यांना सांगण्याचे काम डॉक्टरांनी केले आहे का माहिती नाही, पण गर्दीतली धक्काबुक्की, ढकलाढकली, माणसांची दाटी कोरोनाला आमंत्रण असल्याचे दावे शास्त्रज्ञही करू लागले आहेत. त्यामुळे गणेशाच्या पूजनापासून विसर्जनापर्यंत ‘दो गज दूरी’ मंत्राचा सातत्याने जप करायला हवा, विसर नकोच.
‘दो गज दूरी’ बरोबरच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ घरात असतील आणि त्यांना गावी जायचे असेल तर त्यांनी प्रवास टाळावा, त्यांनी शहरातील घरी सुरक्षित राहाणे योग्य असल्याचा संदेश गोवा वैद्यकीय महाविद्यालय, इस्पितळाच्या प्रिवेंटिव अँड सोशल मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. जगदिश काकोडकर यांनी पोचवण्यास सांगितला आहे. तोच नियम गरोदर महिला, लहान मुलांसाठीही लागू आहे. गणेश दर्शनासाठी किंवा विनाकारण गरजेशिवाय घरातून बाहेर पडू नये व घरातही सातत्याने मास्कचा वापर करणे उत्तम ही त्यांची विनंती. मास्क गळ्यात घालू नये. तो तोंड, नाक नीट झाकेल असा असावा म्हणजे तो घालणारा व इतरही सुरक्षित राहतील.
कोरोना आल्यानंतर पुन्हा पुन्हा हात धुण्याची सवय जडली आहेच ती चतुर्थीतही ठेवायला हवी. शिंकणे, खोकणे हातात नको. हाताच्या दुमडलेल्या कोपरात करावे. डोळे, नाक, तोंडाला हात लावू नये. आजारी असलेल्या व्यक्तींच्या निकट जाणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणावर जाऊ नये, अत्यावश्यक असल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळून किमान वेळ गर्दीत घालवावा हे नव्याने सांगण्याची गरज नाही पण आठवण हवी.
लक्षात ठेवा, काळजी घ्या, स्वतःला सांभाळल्यास यंदाही चतुर्थीत आनंद मनमुरादपणे घेता येईल. भटकणे, फिरण्यावर बंदी असल्यामुळे घरातच अंताक्षरीचा फड रंगवणे शक्य असेल तर त्यात रममाण व्हा, पत्ते खेळा, कॅरम खेळावे. आई-बाबांना मुलांनी कामात मदतही करावी, गप्पा गोष्टींतून नवे विश्व उलगडावे. चला तर वेलकम होम गणेशा...
‘दो गज दूरी’ घरातल्या बैठकीच्या खोलीपासून स्वयंपाक घरापर्यंत पाळायलाच हवी. स्वयंपाक करताना महिलांच्या आधाराला पुरुष येऊ शकतात पण दोन हात दूर राहूनच त्यांनी काम करावे, शेकहँड नकोच, नमस्ते हवे.

 

संबंधित बातम्या