वर्णद्वेषाबरोबरच जातीपातीच्या भिंती..!

dainik gomantak
मंगळवार, 16 जून 2020
वर्णभेदाचा फटका हा केवळ पाश्‍चात्य देशांनाच बसला आहे असे नव्हे, तर आपल्या देशाचे उच्चतम कामगिरी बाळगणाऱ्या खेळाडूंनाही काही देशांकडून या वर्णद्वेषाच्या टोचक्‍या टिपणीला सामोरे जावे लागले आहे. माणसाची मानसिकता कशी आहे, त्यावरच हे अवलंबून आहे.

टिप्पणी
...
नरेंद्र तारी

......
माणूस प्रगत होत चालला तरी जातीपातीच्या आणि वर्णद्वेषाच्या भिंती काही ढासळून पडलेल्या नाहीत. या जातीपाती आणि वर्णद्वेषाच्या आडून समाजकारण करून कोण राजकारणी आपली पोळी भाजून घेतो, हे लपून राहत नाही, पण कळत असले तरी वळत नाही, अशी आजची स्थिती आहे. जातीपातीचे आणि वर्णद्वेषाचे राजकारण करून माणसालाच एकमेकांविरुद्ध भडकवून टाकणारी विषवल्लीच आधी खुडली पाहिजे.

पाश्‍चात्य देशात गौरवर्णीयांविरुद्ध कृष्णवर्णीय असे युद्ध कायम आहे. अधूनमधून ते उसळी घेते. शतके लोटली तरी हे युद्ध काही शमलेले नाही. कोणत्या त्या कोणत्या घटनांमुळे या उचनिचतेच्या भिंतीआडून एकमेकांचा बळी घेण्याइतपत परिस्थिती उद्‌भवते. अधूनमधून कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचारामुळे पाश्‍चात्य देशात दंगली उफाळून येतात. नुकतीच अमेरिकेत एका गौरवर्णीय अधिकाऱ्याने कृष्णवर्णीय व्यक्तीला ठार मारल्याची घटना घडल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला. कोरोनाशी लढा देण्यासाठी अमेरिका धडपडत असताना आता वर्णद्वेषाच्या लढ्याची तीव्र झळ अमेरिकेला बसली आहे. सद्यस्थितीत ही झळ काही अंशी कमी झाली असली तरी वर्णद्वेषाचे हे वादळ कधीही उफाळून येऊ शकते, अशी तेथील स्थिती आहे. अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीयाची हत्या गौरवर्णीय पोलिसाकडून घडल्याने वर्णद्वेषाचा भडका उडणे साहजिक आहे. या वर्णद्वेषाच्या भडक्‍यात इतर देशातील कृष्णवर्णीयांनीही उडी मारली. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना पाठिंबा देण्याच्या या कृतीचे समर्थनच होईल. मात्र, वर्णद्वेषाच्या भडक्‍याची झळ इतर देशांना बसता कामा नये याकडे कटाक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. कारण आंदोलनांच्या काळात सर्वांत जास्त होरपळला जातो तो सर्वसामान्य माणूस.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच नवनवीन संशोधन करून जगाच्या साधनसुविधेत नव्याची भर ही अमेरिकेकडूनच जास्त प्रमाणात घातली गेली आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. नाविन्याचा शोध घेताना अमेरिकेच्या या यशात केवळ गौरवर्णीय आहेत, असे कुणीही म्हणणार नाही. कारण गौरवर्णीयांबरोबरच कृष्णवर्णीयांच्या तेजबुद्धीचा वापर अमेरिकेच्या प्रगतीत होतो, ही बाबही कुणी नाकारू शकत नाही. तरीपण काळ बदलला तरी अमेरिकेची वर्णद्वेषाची किनार काही बदललेली नाही. मुळात अमेरिकेतील गौरवर्णीयांकडून कृष्णवर्णीय ‘टार्गेट’ केला जातोय, संधी मिळेल तेव्हा कृष्णवर्णीयाला हिणवले जाते, आपल्यावर जाणून बुजून अन्याय होतोय, याचे शल्य कृष्णवर्णीयाच्या मनात आहे. त्यामुळेच तर कृष्णवर्णीयांवर अन्याय झाल्यास अमेरिकेबरोबरच इतर कृष्णवर्णीय राष्ट्रांतही त्याचे पडसाद उमटतात. बराक ओबामासारखा राष्ट्राध्यक्ष होऊनही अमेरिकेतील ही दुष्ट रीत काही बदललेली नाही.
कोरोनाचे वाढते संक्रमण आणि पटापट लोकांचे बळी जाण्याचे दुष्टचक्र सबंध जगाला सतावत आहे. या दुष्टचक्रातून कुणीही सुटू शकलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर जाती, धर्माच्या आणि वर्णभेदाच्या नावावर जर हिंसा जन्म घेत असेल, तर ही बाब अश्‍लाघ्य अशीच आहे. मुळात कृष्णवर्णीयाचा बळी गौरवर्णीय पोलिसाने घेण्याच्या कृतीचे कुणीही समर्थन करणार नाही. उलट अशा पोलिसाला सजा ही व्हायलाच हवी, पण आपल्या एका कृतीमुळे एखादा देश किंबहुना सबंध जग वेठीस धरले जात असेल, तर आपण नेमका किती मोठा गुन्हा केला आहे, हे या लोकांना कळले पाहिजे. चुकीची पुनरावृत्ती होता कामा नये, याकडे हा कटाक्ष असायला हवा. कोण उच्च आणि कोण नीच हे ठरवण्याचा अधिकार मुळी माणसाला कुणी दिला, हा खरा प्रश्‍न आहे. जाती धर्माच्या आणि वर्णभेदाच्या भिंती आपणच तर तयार केल्या आहेत. पूर्वीच्या राजेरजवाड्यांच्या जमान्यात अशाप्रकारचा वर्णभेद आणि जातीभेद करण्यात आला. कुणी कुठले काम करावे, हे त्यावेळी ठरवण्यात आले. समाज व्यवस्था ठीक रहावी आणि सृष्टीचे चक्र फिरताना त्यात कोणत्याही प्रकारची आडकाठी येऊ नये यासाठी अशाप्रकारचे हे जाती जातीत विभाजन करण्यात आले. मात्र, काळ कुणाला थांबत नाही. जातीनुसार वाटून दिलेल्या कामांची आता अदलाबदल झाली आहे. त्यामुळे खालच्या जातीला दिलेल्या कामाचा पट्टा आता उच्च जातीच्या लोकांकडून वापरला जातो, फक्त त्याला बिझनेस असे गोंडस नाव देऊन..!
वर्णभेदाचा फटका हा केवळ पाश्‍चात्य देशांनाच बसला आहे असे नव्हे, तर आपल्या देशाचे उच्चतम कामगिरी बाळगणाऱ्या खेळाडूंनाही काही देशांकडून या वर्णद्वेषाच्या टोचक्‍या टिपणीला सामोरे जावे लागले आहे. माणसाची मानसिकता कशी आहे, त्यावरच हे अवलंबून आहे. मनात जर एखाद्या जातीधर्माबद्दल किंवा वर्णाबद्दल अढी असेल तर ती जाणारच नाही. संधी साधून ही अढी व्यक्त होण्याची शक्‍यता असते आणि त्यानुसार मग पुढील परिणामांना सामोरे जावे लागते ते भलत्यानाच. अशा प्रकरणांवरून एखादे आंदोलन छेडले गेले, तर मग मागच्या काळात मला कसा त्रास सहन करावा लागला, याची उगाळणी होत राहते. मागच्या काळात भारतात ज्याप्रमाणे ‘मी टू’चे प्रकरण उद्‌भवले, त्यावेळी कितीतरी विनयभंगाची प्रकरणे समोर आली. या ‘मी टू’च्या मानसिक वणव्यात कितीतरी जण होरपळले गेले. स्वतःला रामाचा अवतार म्हणवून समाजात मिरवणाऱ्यांवरही ‘मी टू’चे आरोप झाले, त्यावेळेला कोण कुठल्या थराचा याचा उलगडा झाला. त्यामुळेच तर वर्ण कसा आहे, जात कोणती आहे, हे या ठिकाणी दुय्यम ठरले. माणसाच्या मनातच जर कुठल्याही बाबत खोट असेल तर चांगले ते निष्पन्न होणारच नाही, जे ‘मी टू’ या प्रकरणात आरोप झालेल्यांच्याबाबतीत झाले ते..!
जाती धर्माच्या नावावर आज राजकारण खेळले जाते. आरक्षणाचा मुद्दा हा जातीमुळे प्रकर्षाने समोर आला आहे. विद्वत्ता असूनही जातीचा मुद्दा आड येत असल्याने बऱ्याचदा विद्वानांवरही अन्याय झाला आहे. आता आपल्या देशातील राजकारणच पाहा. जातीच्या भिंती आजही आपल्या देशात भक्कमपणे उभ्या असल्याने या भिंतीच्या आड राहून कोण राजकारणी आपली पोळी कशाप्रकारे भाजून घेतो, हे नव्याने सांगण्याची गरज आहे काय? गोव्यात त्यामानाने परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, देशातील इतर काही राज्यातील जातपातीचे समाजकारण आणि राजकारण हे विद्‍ध्वंसक कृत्यापर्यंत येऊ शकते, हे आतापर्यंतच्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. देशातील बहुतांश राज्यात उचनिचतेच्या भिंती काही घटकांनी अजूनही जपून ठेवल्या आहेत. या भिंतींना राजकारणाचा मुलामा चढवून लाभ उठवणारा एक घातक घटक देशात कार्यरत आहे. त्यामुळे उचनिचतेच्या या भिंती काही ढासळून पडत नाहीत आणि नजीकच्या काळात पडणारही नाही.
त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे ज्याच्या खिशात पैसा आहे, तो राजा ठरला आहे. जातीपातीच्या भिंती ढासळून टाकण्यासाठी पैसा पुढाकार घेत असला तरी अजून मानसिकता बदललेली नाही. चार विचार चांगले असले आणि एक विचार जर नासका असेल तर या चारही चांगल्या विचारांवर हा नासका विचार विजय मिळवतो. हीच मानसिकता पार बदलून टाकण्याची आज खरी गरज आहे. कोण कुठल्या वर्णाचा, कोण कुठल्या जातीचा हे पाहण्याअगोदर कोण किती मनाने चांगला आहे, कुणाकडे किती विद्वत्ता आहे, समाजाला एकसंध ठेवण्यासाठी कुणाचा किती उपयोग होऊ शकतो, याला प्राधान्य दिले पाहिजे. जातीपातीच्या वरवंट्याखाली एखादा विद्वान भरडत जात असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेवटी राष्ट्र निर्मितीसाठी सर्वांनी संघटीतपणे पुढे जाण्याची गरज आहे. कायदे करून अशाप्रकारच्या भिंती पडणार नाहीत. कायदे हे हवेतच, पण खरे म्हणजे एकमेकांबद्दलची जातीपातीच्या राजकारणातील असुया दूर करण्यासाठी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. समाजाला एकसंध करण्यासाठी जुन्या चालीरीती या मोडीत तर काढल्याच पाहिजेत, पण समाजातील प्रत्येक घटकाने आपसातील भेद मिटवून सामंजस्याचे नवे पर्व सुरू करणे ही खरी काळाची गरज आहे.

संबंधित बातम्या