बोध बिहारचा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

मंगळवारी बिहारमध्येही मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर यशाचा आलेख अक्षरशः कधी इकडे तर कधी तिकडे असा हिंदकळत होता. सत्ता राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे कायम राहणार, की  ‘महागठबंधन’ ती हिसकावून घेणार, याचा फैसला मंगळवारी उशिरापर्यंत तरी झालेला नव्हता. कमालीच्या चुरशीचा टी ट्‌वेंटी सामना पाहावा, अशी बहुतेक राजकीय  निरीक्षकांची अवस्था झाली होती

मेरिकेचा अध्यक्ष कोण होणार, याबाबत जगभरात निर्माण झालेले कमालीचे कुतूहल आता शमले असले, तरी कोट्यवधी भारतीयांना उत्सुकता होती ती बिहारमधील निकालांची. उत्तर भागाच्या पट्ट्यातील हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राज्य. त्यामुळे तिथे जनमताचा प्रवाह कुणीकडे वाहतो, याला कमालीचे महत्त्व प्राप्त होते. मुख्यमंत्री नितिशकुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांपुढे तुलनेने नवख्या तेजस्वी यादव यांच्यातील लढतीत कोण बाजी मारते,

याविषयी औत्सुक्‍य निर्माण होणे स्वाभाविकच होते. पण मंगळवारी बिहारमध्येही मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर यशाचा आलेख अक्षरशः कधी इकडे तर कधी तिकडे असा हिंदकळत होता. सत्ता राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे कायम राहणार, की  ‘महागठबंधन’ ती हिसकावून घेणार, याचा फैसला मंगळवारी उशिरापर्यंत तरी झालेला नव्हता. कमालीच्या चुरशीचा टी ट्‌वेंटी सामना पाहावा, अशी बहुतेक राजकीय  निरीक्षकांची अवस्था झाली होती. तरीही लोकमताचा कल काही गोष्टी स्पष्टपणे समोर आणत आहे, आणि त्यांची दखल घ्यायला हवी. एकेकाळी लालूप्रसाद यादव, रामविलास पास्वान आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाची फळी बिहारच्या राजकारणात कार्यरत होती. आता नवे नेतृत्व उदयास येत आहे. या निवडणुकीने तेजस्वी यांच्या रूपाने नवा चेहरा बिहारच्या राजकारणात आला.

‘महागठबंधन’चे नेतृत्व तर त्यांनी केलेच; पण जवळजवळ एकहाती प्रचारमोहीम राबवित आणि तरुणांच्या रोजगाराचा प्रश्‍न लावून धरत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. विरोधात थेट नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यासारखे दिग्गज नेते असताना त्यांनी जे काही कमावले ते नोंद घेण्याजोगे आहे, यात शंका नाही. राष्ट्रवाद, राममंदिर असे विषय आणून लोकांच्या भावनांना हात घालण्याचा अस्मिताबाजीचा प्रयोग याही निवडणुकीत भाजपने मुक्त हस्ते केला, तर तेजस्वी यादव यांनी सारा प्रचार रोजगारसंधी आणि विकासाचे प्रश्‍न यांवर केंद्रित केला. लोकांच्या जिव्हाळ्याचे आर्थिक प्रश्‍न प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्याचा तेजस्वी यादव यांचा प्रयत्न हे निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

बिहारमधील सत्ताधारी आघाडीचा विचार केला तर  संयुक्त जनता दल हा त्याचा मुख्य घटकपक्ष. भाजप हा राज्यात तरी या पक्षाचे बोट धरून जास्तीत जास्त पाय रोवण्याच्या  प्रयत्नात होता. परंतु गेल्या वर्षभरात नितीशकुमार यांच्या करिष्म्याचे तेज फिके होऊ लागले होते आणि त्याचवेळी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर भिस्त ठेवत भाजप आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात होता. हा अंतर्गत समतोल अशा रीतीने बदलत असल्याचे ‘एनडीए’मधील जागावाटपाच्या वेळीच स्पष्ट झाले होते. या दोन्ही पक्षांनी जागांचे वाटप जवळजवळ ५०-५० टक्के केले, ही बाब बोलकी होती. त्या दिशेने होत असलेल्या बदलावर बिहारच्या जनतेने या निवडणुकीत शिक्कामोर्तब केले आहे.  पुढच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. पंधरा वर्षे नितिशकुमार यांनी सत्ता उपभोगली. प्रस्थापितविरोधी जनभावनेचा घटक त्यांच्यापुढे आव्हान निर्माण करणार होता, हे उघड आहे. पण सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांना त्याचा फटका न बसता संयुक्त जनता दलाला जास्त प्रमाणात बसल्याचे दिसते. भाजपने या बाबतीत केलेल्या धूर्त व्यूहरचना हा भाग त्याला कारणीभूत असू शकेल आणि त्याचबरोबर मोदींचा करिष्मा हा घटकही परिणामकारक ठरला असणार. काँग्रेसला याही निवडणुकीत बिहारमध्ये आपला प्रभाव वाढवता आला नाही. जागांच्या हिशेबातही आणि प्रतिमानिर्मितीच्या बाबतीतही. या पक्षाचे आमदार प्रसंगी कोणत्याही मांडवात जाऊन दाखल होऊ शकतात, अशी प्रतिमा निर्माण होणे हे कशाचे लक्षण आहे?  कसेही फुटू शकतात, अशी चर्चा होण्यापर्यंत या पक्षाची घसरण झाली असून हे अधःपतन कठोर आत्मपरीक्षणाची गरज दर्शविणारे आहे.

बिहारने दिलेला हा कौल  संपूर्ण देशाच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचाच आहे. नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री म्हणून भाजपने प्रोजेक्‍ट केले असले आणि तशी वेळ आल्यास तो शब्द पाळला जाण्याची शक्‍यता असली तरी सर्वाधिक जागा मिळविल्याने भाजपच्या बिहारमधील महत्त्वाकांक्षांना अधिकच धुमारे फुटणार, हे नक्की. शिवाय महाराष्ट्रात दुधाने तोंड पोळले असल्याने बिहारमधील ताक फुंकून पिण्याची काळजी भाजपनेते घेतीलच! तरीदेखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची या राज्यातील समीकरणेही बदलण्याची शक्‍यता आहे. आता लागोपाठ पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि भाजपने पश्‍चिम बंगाल हे आपले लक्ष्य असल्याचे पूर्वीच स्पष्ट केले आहे. भाजपचे प्रवक्‍ते चर्चांमध्ये भूतकाळाचे कितीही दाखले देत असले, तरी अमित शहा मात्र बिहारमध्ये या निवडणुकीचा शेवटचा अंक रंगत असतानाच प. बंगालमध्ये जाऊन पोहोचले होते! पक्ष म्हणून विचार करता भारतीय जनता पक्षाने आपला प्रभाव वाढवला आहे, हे स्पष्टच दिसते.त्यामुळेच आता पश्‍चिम बंगाल जिंकलेच पाहिजे, या हिरीरीने हा पक्ष त्या राज्यात कामाला लागलेला दिसतो. शिवाय तामिळनाडूतही ते पाय रोवण्याचा प्रयत्न करतील.

संबंधित बातम्या